प्रिय भीमा
कसा आहेस ? कुठे आहेस ? असे प्रश्न मला विचारायचे नाहीत..मला माहीत आहे की तु इथेच आमच्या आसपास आहेस...फक्त जरासा अस्वस्थ आहेस.. मग कशासाठी हा लेखनप्रपंच..? तर तुझ्या बर्थ डे चे तसे निमित्त...पण तुझ्याशी बोललं पाहिजे असं बरेच दिवस झाले वाटत होते..आज मुहूर्त लागला (अरे साॅरी.. मुहूर्तावर तुझा विश्वास नव्हताच..पण आम्ही अजुन नाही सोडु शकलो पंचांग ...असो.)
तर पञास कारण की, आज तुझी जयंती.. आमच्या भाषेत बर्थ डे, मग काय ? आमच्या नाक्यावरच्या टपोरी मिञाचा जरी बर्थ डे असला तरी 'बर्थ डे आहे भावाचा' म्हणत आम्ही डिजे लावतोच..तु तर राडा बाॅय...कसाला राडा घातलेला आहेस तु...परके असो नाही तर आपले.. सगळ्यांच्याच विरुद्ध तुला वेळोवेळी लढावे लागले अन् तु खंबीरपणे लढलास देखील...आम्ही तर वाचुनच थक्क होतो...तु ते जगला आहेस..मग काय विषय आहे का ? भावा तुझा बर्थ डे पण जोरात डिजे लावुन झालाच पाहिजे ...नाही, तु नाही म्हणु नकोस..आम्ही डिजेही लावणार अन् बेधुंद होऊन नाचणारही भावा... आता नाचणार म्हणजे लगेच दारु पिऊच असं नाही...नाही म्हणजे आमच्यापैकी काहींचे पाय त्याशिवाय हालतच नाहीत मग त्याला ईलाज नसतो बघ....पण मी तुझ्या बावीस प्रतिज्ञा नीट वाचल्यात...अन् माझ्या पक्क लक्षात आहे रे भावा..तु प्रतिज्ञा दिली होतीस आम्हाला मद्यपान न करण्याची..पण तुझ्याच बर्थ डे दिवशी नेमकी तिचा विसर पडतो बघ आम्हाला...जाऊ दे...पण आम्ही तुझा बर्थ डे करणारच ! तु तुझ्या ज्ञानाने साऱ्या जगात ज्ञानाचा झेंडा लावलास..आम्ही ज्ञानाच्या झेंड्याचं बघु नंतर पण तुझा बर्थ डे म्हटल्यावर तुझा झेंडा माञ अवश्य जागोजागी लावुच !
भीमा, तुला जगानं कोणत्या कोणत्या साच्यात बसवुन बघितलं...कुणी तुला दलिताचा कैवारी म्हटलं, कुणी तुला स्ञियांचा तारणहार म्हटलं ... कुणी तुला बहुजनांचा नेता म्हटलं..कुणी तुला राजकारणी...कुणी ज्ञानाचा धनी..कुणी वकील...कुणी अर्थशास्ञज्ञ..कुणी अजुन काही...पण भीमा तु ह्या कुठल्याच एका साच्यात मावला नाहीस..मावणार ही नाहीस रे भावा...तु विस्तीर्ण आभाळ...आम्ही तुला ढग समजण्याची चुक करत आलो...पण आता कुठे उमजाय लागलय बघ जरा जरा... तु म्हणाला होतास 'शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा'...अरे पण इथं आम्हाला शिकताना संघर्ष करावा लागतो...आमच्या संघटना स्थापन झाल्या पण त्याच्यातही अंतर्गतच संघर्ष जास्त... तुझ्या वाक्याचा नीट अर्थ आम्हाला कळलाच नाही रे अजुन...जरा समजावुन सांग ना प्लिज.
भीमा, तु एका सुभेदाराचा मुलगा होतास, मग तुलाही एखादा जहागिरदार, वतनदार व्हावं असं का नाही वाटलं रे ? उलट तु तर म्हणालास, "महारवतन म्हणजे महारांच्या दारावरचा शेवगा". तुला तर आमच्या सारख्या एसी अभ्यासिकाही उपलब्ध नव्हत्या...तरी एवढा अभ्यास कसा काय केलास बाबा ? किती त्या पदव्या ? कित्येकांचा अर्थ तर आम्हाला अजुनही कळत नाही...आम्ही आपलं मुक्त विद्यापीठातुन डिगरी घेतो..मग अधिकारी व्हायचं म्हणुन एमपीएससी/युपीएससी करायला पुण्याला/दिल्लीला जातो...मान्य आमच्या वाट्याला कुठला सयाजीराव किंवा कुठला शाहू महाराज नाही येत, पण आम्ही मायचं सोनंनाणं..वेळ पडली तर कधी आहे तेवढं रान..ज्यात बापानं जीवाचं रान केलेलं असतं, ते गहाण ठेवुन पैसे जमवतो... तु म्हणायचा ना रे, शासनकर्ती जमात व्हा..आम्ही शासनात जायला अजुनही घाबरतो..तो आपला प्रांतच नाही म्हणत शासनाला फार फार तर टपरीवर शिव्या देत बसु शकतो..पण म्हणुन मग आम्ही शासन नाही तर किमान प्रशासनात जाण्यासाठी प्रयत्न करतो...तरी सगळ्यांच्याच नशिबी कुठं असते बाबा सरकारी नोकरी...(नशिबावर तुझा विश्वास नाही हे मला नको सांगुस आता) आम्ही पाच लोकं तयारीला पुण्यात गेलो..पहिल्या वर्षी कुणीच पास झालं नाही...मग आमच्यातले दोन-तीन जण पुढची पुर्व परिक्षा पास झाले, आम्ही काय जल्लोष केला होता म्हणुन सांगु...तुझ्या पीएचडीचा पण तुला तेवढा आनंद नसल झाला बघ..येवढं आम्ही पुर्व पास होऊन झालो होतो...अन् याच जल्लोषात आम्ही आमची मेन्स घातली रे... पुढे आम्ही दरवर्षी पुर्व पास व्हायचो अन् बापाला सांगायचो यंदा कलेक्टर होणारच...असे पाच-सहा वर्ष गेले...आम्ही कलेक्टर तर सोड कंडक्टर पण नाही होऊ शकलो...काय करावं..? आमचं काय चुकतं, भीमा ?
भीमा, तु अभ्यास केला, तु राजकारण केले, तु शोध लावले, तु संविधान लिहिलस, तु माणसांसाठी जगलास..अन् माणसाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकारही मिळवुन दिलास... दलित शब्दाला प्रतिशब्द दिला तेंव्हा तु म्हणाला होतास नामांतराने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत...अरे पण सध्यातर आमचे सगळे प्रश्न सोडुन (सोडवुन नाही..) आम्ही खुशाल नामांतर करतोय..सगळीकडेच... असो. तु मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यापेक्षा जास्त तु माणसातल्या माणसाशी माणसासारखे वागण्यासाठी सर्वांना तयार केलेस...संविधानात मुलभूत हक्क बहाल करताना तु कुठलाच भेदभाव केला नाहीस...तेवढं एक बरंच झालं...तरी तु फक्त दलितांचाच कसा झालास रे ? तु तर रिजर्व्ह बँकेची स्थापना साऱ्या देशासाठीच निर्माण करण्याची शिफारस केली होतीस ना. तु संविधान लिहिले ते ही सगळ्या भारतीयांसाठी. तु तर कायम म्हणायचास, " मी प्रथमतः अन् अंतिमतः भारतीय आहे." मग तु तरीही साऱ्या भारतीयांचा कसा नाही झालास भावा ?
भीमा, तु मनुस्मृति जाळलीस, तु ब्राह्मणविरोधी झालास...पण तुझा विरोध ब्राह्मणाला नाही तर ब्राह्मण्याला होता हे काही अजुनही नीट आम्हाला कळत नाहिये बघ.. तु दलितांसाठी लढलास, तु कामगारांसाठी लढलास, तु महिलांच्या हक्कासाठी लढलास, तु संबंध मानवजातीसाठी अन् मानवमुक्तीसाठी लढलास भावा...अरे, भीमा तुझ्या कतृत्वाला सीमा च नाही बाबा. तु कायद्याचं बोलायचास, आमच्या फायद्याचं बोलायचास...आता तुझ्या नावानं मत मागायला पुढारी येतात आमच्या वाडी/वस्तीत ...पण ते ना कायद्याचं बोलत्यात ना आमच्या फायद्याचं... त्यांची बी चुक नाही म्हणा... पावशेर मटण अन् बाटलीसाठी आम्हीच आमचं अमुल्य मत असं शे पन्नास रुपड्याला इकत असतोय बघ..आम्हीच नीट शिकलो नाही...जे शिकले ते परत महारवाड्यात फिरले नाही...शिकुन मोठी झालेली माणसं आम्हाला ईसरुन गेली... तु आरक्षणाचा हात तात्पुरता हात दिला होतास आम्हाला पण आम्ही अजुनही तिथंच आहोत...आम्ही आरक्षणातून बाहेर पडायला हवे होतो, पण उलट अजुन बाहेरचे पण आरक्षणात ओढले गेले...तात्पुरत्या कुबड्यांचा वापर करताना पाय निकामी तर झाले नाहीत ना आमचे ? खरंच काही कळत नाय रे ...? तुच सांग बाबा.
तुला वाटत असेल तुझ्या बर्थ डे जल्लोषात मी हे काय माझं रडगाणं सांगतोय...पण भावा, आमच्या सारख्या कित्येकांच्या मनात अजुनही बरीच खदखद आहे... कधी वाटतं आम्ही चुकलो...कधी वाटतं आपल्याला चुक काय बरोबर काय हेच कळु दिलं नाही कधी कुणी... तुझ्यासारख्या विस्तिर्ण आभाळात मी म्हणजे भरटकलेल्या तारकासमान....ना कुठली दिशा ना कुठला मुक्काम...घडताना भरकटणारा मी...मला दिशा दाखव ...मला ताकद दे, ह्या मानसिकतेतुन बाहेर पडण्याची..आधी मला बदलण्याची अन् मग माझं जग बदलण्याची...!
8 comments:
अप्रतिम लेख...
जय भीम.....!
Meaningful👌
धन्यवाद !
धन्यवाद !
सत्य परिस्थिती ची जाणीव करून देऊन गांभीर्याने विचार करावयास भाग पाडणारा लेख...
धन्यवाद !
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत आणि आजचा भारत यातील फरक स्पष्ट करणारा लेख...
धन्यवाद डाॅक्टर
Post a Comment