प्रिय अरविंद काका,
तसं तुमच्याशी प्रत्यक्ष बोलावं असं खुपदा वाटलं, गोष्ट छोटी डोंगराएवढी बघितल्यावर तर खुप जास्त वाटलं...ही डोंगराएवढी गोष्ट लिहिणारा माणुसही पर्वतासारखा उंचच असला पाहिजे, यावर माझा विश्वास बसला होता...तेंव्हाच वाटलेले की अशा माणसाला भेटलं पाहिजे ...पण काही जमलेच नाही...अभ्यास, परिक्षा हे सगळं सोडुन एखाद्या लेखकाला भेटतो म्हटलं तर कसं पटलं असतं ना घरच्यांना ?..नाही तसं त्यांनी मला बरच फिरु दिलंय...वक्तृत्वस्पर्धेनिमित्त फिरलोय बराच शाळा/काॅलेजमध्ये असताना...पण आपली भेट राहिलीच...तसा मीही मराठवाड्यातलाच, जालन्याचा... बोररांजणी या खेडेगावातला.... आता जरा शाळा, काॅलेज सुटलय....जवळपास सगळेच करतात तशी इंजिनिरिंग करुन मी परत एमपीएससी केली... मागच्यावर्षीच नायब तहसीलदार झालो अन् यंदा नुकताच क्लास १ अधिकारी झालोय... तुम्हाला लवकरच भेटेलही... पण हे सगळं असु द्या...मी कुठे माझी कर्मकहाणी सांगत बसु तुम्हाला.
आजच्या ह्या माझ्या पञास कारण की, तुमचे 'पञास कारण की' हे पुस्तक आजच वाचुन झाले...पुस्तक तसे जुने पण पुस्तक प्रकाशित झाले तेंव्हा आम्ही इंजिनियरिंगच्या काॅलेजात पुस्तकांपेक्षा चेहरेच जास्त वाचायचो....मग पुस्तकं जरा राहिलीच वाचायची...पण ह्या चेहरेवाचण्याने एक बरं झालं..चेहऱ्यावरच्या कविता वाचतानाच पुस्तकातल्या कवितेचा नादही तेंव्हाच लागला .... पण हे पुस्तक वाचले नसले तरी आधीच 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात सागर कारंडे यांच्याकडुन ऐकले होतेच...ते ऐकताना कधी अलगद चेहऱ्यावर हसु उमटायचे तरी कधी डोळ्यात आसु दाटायचे...भारी वाटायचे खुप...किती मार्मिकपणे सगळं मांडलय वगैरे हे जरी खुप कळत नसलं तरी ऐकलेले कानातुन थेट काळजापर्यंत पोहचायचे हे खरे... तुम्ही म्हणता तसे हल्ली व्हाॅटस अप, फेसबुक अन् इन्स्टाग्रामच्या जमान्यात पञ कोण पाठवतं...पण हे पुस्तक वाचुन मला वाटलं की तुम्हालाच पञ पाठवुया...तसं आता हे पञही पोस्टातुन नाहीच पोहचायचं तुमच्यापर्यंत...पण...लिहुन बघितलं..कशातुन आलं यापेक्षा काय आलं हेच बघा तुम्हीही...तसं आमच्या पिढीला पञाची सवयच नाही...वाटले तेंव्हा वाटले ते मॅसेज करुन सांगायचे...अगदी क्षणात भेट व्हावी, अशा अत्याधुनिक युगात आम्ही वावरतोय...कम्प्यूटर वगैरे ठिक आहे पण आता ए आई (आईला आवाज नाही दिला मी...ए आई म्हणजे आर्टिफिशीयल इंटेलिजन्स..)कृञिम बुद्धिमत्तेचा जमाना आलाय...त्यामुळे पञ वगैरे हे कालबाह्यच संकल्पना आमच्यासाठी...जमाना कृञिम बुद्धिमत्तेचा अन् पञ लिहायला लागते नैसर्गिक बुद्धीमत्ता मग आपोआपच पञव्यवहार मागेच पडणार ना ? असो.
तर काका, तुम्ही पुस्तकाच्या प्रस्तावनेत पञाचे महत्व अन् जगातील प्रसिद्ध पञव्यवहाराची काही उदाहरणं देखिल दिलीत. मी काॅलेजात असताना मला बाकीचे फार कळत नव्हते पण प्रेमाचे सञ सुरु करण्यासाठी पञ हेच उत्तम माध्यम आहे असं मलाबी वाटायचं...पण काय वाटतय यापेक्षा कुणाला वाटतय हे महत्वाचं ना...नाहितर काय?...काय बोलतय यापेक्षा कोण बोलतय याला जास्त महत्व आहे ना आपल्याकडे...म्हणजे मोठ्या माणसांची साधी वाक्यही सुभाषितासम वाटतात अन् लहानग्यांनी (फक्त वयानेच लहान नाही बरका ...) कितीही तात्विक विधान केलंतरी त्याकडे कुणाचं लक्ष जातंच कुठं...हे असं तुमच्या आधीच्या पिढ्यांपासुन चालत आलय...अन् आमच्या नंतरच्या पिढ्यांपर्यंत चालतच राहिल वाटतय..तर तुम्ही ह्या पुस्तकात लिहिलेली पञ खरच जाम खतरनाक आवडली आपल्याला...महाराजांपासुन किशोरकुमार, नागराज अण्णा, दिपीकाताई, दादा कोंडके ह्या कलाकारांसह आठवलेसाहेब, सरदेसाई साहेब अशा राजकीय व्यक्ती, सोशिक स्ञिया, तरुण मिञ, गोंविदा, दहिहंडीआयोजक या व अशा इतर बऱ्याच वेगवेगळ्या घटकांशी पञांतुन संवाद साधला आहे...संवादच काय कुठे कुठे मिश्किलपणे वादही घातलाय.. काही पञ तात्कालिक परिस्थितीशी निगडीत आहेत..पण बरीच पञे ही समकालिनच वाटतात...आजही ती पाठवली तरी वाचणाराला जुनी लिहिलेली आहेत असं वाटणार नाही मुळीच..अगदीच साधी सोपी अन् थेट मनाला स्पर्शुन जाणारी भाषा...प्रत्येक पञात प्रेमाचा ओलावा..काळजी...माया...आपुलकी...सगळं काही सापडतं.... काही ठिकाणी उपहासातुन निर्माण झालेला विनोद आपोआप हसायला भाग पाडतो...पण नुसतं हसवणं अन् रडवणं एवढ्यासाठीच काही हे सगळं लिहीलं नाही तुम्ही, याचीही जाणिव झालीच वाचताना...काही ओळींवर रेंगाळलो…काही ओळी परत परत वाचल्या...काही ठिकाणी आत्मचिंतन करु लागलो..अन् काही ठिकाणी आपण ज्या व्यवस्थेचा भाग झालोय त्याव्यवस्थेकडुन आपण नक्कीच लोकांचं जगणं सुकर करु शकतो...अन् त्यासाठीच प्रशासकीय सेवेत आपण आलोय याची जाणिव अजुन घट्ट झाली....
काका, तुम्ही खुप वेगवेगळ्या विषयांना ह्या पुस्तकात हात घातलाय..सगळ्याच गोष्टिंचा इथे उल्लेख मी केला नाही.. विविध समस्या, विविध अडचणी यांच्यावर तुम्ही मार्मिकपणे बोट ठेवलय..एका पञात तुम्ही म्हटलात,"डास चावल्यानं मलेरिया होतो, पण म्हणुन डास मारत बसणं हा उपाय असतो का ? नाही. ज्या घाणीमुळे, ज्या डबक्यामुळे डास होतात, ती स्वच्छ केली पाहिजेत.त्याप्रमाणे आतातरी आपण मलेरिया घालवण्यासाठी डास मारण्यावरचे उपाय सोडुन डास पैदा करणारी डबकी घालवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे..तसे उपाय करण्याची जबाबदारी तुमची पुढची पिढी म्हणुन आता आम्हीच स्विकारली पाहिजे..ती आम्ही स्विकारतो.... तुम्ही निवांत रहा...लेखक आहात..दररोजच्या घडामोडी पाहुन निवांत राहणं तुम्हाला अवघड जाईल..पण बघा...प्रयत्न करा...आणि हो...आशिर्वाद द्या, डबकी साफ करण्यासाठी...!!
तुमचाच
शशिकांत बाबर
(परि. नायब तहसीलदार)
No comments:
Post a Comment