Sunday, January 14, 2024

निमित्त : सत्यशोधक (सिनेमा)

 

प्रत्येक समाजसुधारक हा त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे अपत्य असतो...फुले हे देखील त्याला अपवाद नव्हते...मागासलेला, अज्ञानात खितपत पडलेला, मनुस्मृति ला प्रमाण मानणारा, बुद्धीप्रामाण्यपेक्षा ग्रंथप्रामाण्याला महत्व देणारा अन् सगळे असुनही हे सगळे चुकीचे आहे हे माहीत नसणारा भारतीय समाज ही अगदी विसाव्या शतकापर्यंतची परिस्थिती होती....बाहेरुन आलेल्या इंग्रजांनी, पाश्चात्य शिक्षणाने आपल्याला या चुकांची जाणिव करुन दिली, अर्थात् यात त्यांना भारतीयांचा पुळका होता असे मुळीच नाही तर त्यात त्यांचे हित होतेच...त्यांना रंगाने भारतीय पण संस्कृतीने पाश्चात्य समाज घडवुन आपल्या देशातील उत्पादनांसाठी ग्राहक तयार करायचे होते....पण एकमात्र चांगले झाले, त्यामुळे समाजसुधारकांची एक मोठी फळीच निर्माण झाली....ह्या सर्वच समाजसुधारकांनी तत्कालिन समाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला....आपण त्यांच्या प्रयत्नांचे ऋणी आहोत..त्यांचे कष्ट, त्याग, संघर्ष हे प्रेरणादायी आहेतच....पण आजचा समाज तसा राहिला नाही, त्यामुळे आज जर हेच इतिहासातले समाजसुधारक वर्तमानात असते तर त्यांचे वर्तन निश्चित वेगळे असते, याचे भान असायला हवे...आगरकर म्हणायचे पाश्चिमात्यांचे अनुकरण करा, अंधानुकरण नको...आगरकांचे हे शब्द आजही तितकेच लागू होतात...फक्त आता पाश्चिमात्याच्या ठिकाणी सिनेमातल्यांचे असे म्हणावे लागेल. कारण दोन तासाचा सिनेमा बघुन आपल्या मनात येणारे असंख्य विचार आपल्याला एकाच वेळी महात्मा फुले व्हायला हवं असं सांगतात तर दुसरीकडे कृष्णराव भालेकरांची दिवाळखोरी व्यवहाराची आकडेमोड डोक्यात जागी करते...डोक्यात काहीच स्पष्ट नसते तरी आपण फुले किती भारी होते असं म्हणुन त्यांना टोकाचं देवत्व बहाल करतो अन् संपलेल्या पाॅर्पकाॅर्नसोबत आपल्यातले फुले सिनेमाघराच्या पायरीवरच सोडुन निघुन येतो..थोडक्यात सिनेमातुन मिळालेली प्रेरणा घरी येईपर्यंतही टिकत नाही...टिकलीच तर त्यात फक्त काहीतरी करायला हवं..हाच विचार सतत पिंगा घालत असतो..नक्की काय करावं ? आज समाजाला कशाची आवश्यकता आहे ? अन् मुळ प्रश्न म्हणजे कसं करावं ? या प्रश्नांचा आपण फारसा विचारच करत नाही. 

आता थोडक्यात सत्यशोधक महात्मा फुले यांच्याविषयी समजुन घेऊया -

फुले हे पुरोगामी विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते...त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था, धर्मातील कर्मकांड, समाजातील स्त्रीची अवस्था, कुप्रथा, परंपरा ह्या सगळ्यांवर आसुड उगारला...ब्राह्मणीव्यवस्थेचे कसब लोकांना दाखवुन सलामी ठोकत गुलामी करणाऱ्यांना इशारा दिला..... शेतकरी हा कसा प्रस्थापित राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील पुढाऱ्यांकडून दुर्लक्षीत राहिला हे दाखवुन दिले...धर्मातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत सार्वजनिक सत्यधर्म निर्माण केला...हे सगळे करताना एक मात्र खरे की फुले हतबल झाले नाहीत...उठतो अन् आता समाजसुधारणा करतो...खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा असा आव न आणता समाजसुधारणा करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ कमावले, राजकीय लढ्यापेक्षा सामाजिक लढा महत्वाचा आहे हे अधोरेखित करताना राजकीय पद (पुण्याचे नगरसेवक) भुषवुन प्राधिकार मिळवले....वस्ताद लहुजी साळवेंच्या तालमीत शरीर बनवले...थोडक्यात शारिरीक, राजकीय, तथा सामाजिक अशा सर्वच स्तरावर स्वतःला सिद्ध केले अन् सोबत समाजसुधारण्याचे कामही...यातुन शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे फुल्यांकडे फक्त मोठ-मोठे विचार नव्हते, तर सोबतच कृतीही तशी होती, विचारांना कृतीशील आधार होता...शाळा चालवायचा विचार होता, पण शाळेत अडचण आली तर दोन हात करण्याची तयारी होती....बालहत्याप्रतिबंधक गृह सुरु करण्याचा विचार होता, सोबतच बालकांना सांभाळण्याची कुवत होती... दलितांना हक्काचे पाणी मिळावे हा विचार होता, तर त्यासाठी स्वतःच्या घरातला हौद खुला करण्याची धमक होती....सामाजिक सुधारणेकरिता आर्थिक पाठबळ हवे, हा विचार होता तर त्यासाठी कंत्राटी काम घेऊन पैसा जमवण्याचे कसब होते...या सगळ्यांच्या मुळाशी असणारी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करायची तर का करायची ? अन् कशी करायची याची स्पष्टता होती..सिनेमात कृष्णराव भालेकर निबंधमालेच्या लेखांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपणही वृत्तपत्र काढावे असा आग्रह धरतात तेंव्ह फुले स्पष्टपणे विचारतात की वृत्तपत्र काढुन काय करायचे ? ज्यांच्यासाठी काढायचे त्यांना ते वाचता येत नाही, अन् ज्यांना वाचता येतं ते आपलं पत्र वाचणार नाहीत...त्यापेक्षा आपण आपली शक्ती लोकांना साक्षर करण्यात वापरु...ही स्पष्टता, असा स्पष्टवक्तेपणा अन् परखडता आपल्यात यावी यासाठी प्रयत्न करायला हवा....हेच ह्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाटले..नव्हे तसे प्रयत्नपुर्वक करण्याचे धाडस ह्या सिनेमाने दिले.


सावधान पुढे धोका आहे 🔇

"सत्यशोधक" सिनेमा पाहुन तुम्हालाही समाजसुधारक व्हावं वाटलं असेल तर थांबा...दिर्घश्वास घ्या अन् एकवेळ स्वतःला विचारा की हे जे समाजसुधारण्याचे, सामाजिक कार्याचे स्वप्न मी पाहतो आहे हे मी कसे पुर्ण करु शकेल ? यासाठी लागणारी विचारातील स्पष्टता माझ्यात आहे का ? असेल तर पुढचा टप्पा म्हणजे ह्या विचारांना सत्यात आणण्यासाठी मी कितीसा सक्षम आहे ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारक असतील तर नक्कीच समाजसुधारण्यासाठी काकणभर का होईना आपण आपलं योगदान नक्की द्यायला हवं....मात्र आपल्याकडे बऱ्याचदा फक्त उद्दात्त विचार असतात, पण त्यासाठी आवश्यक पाठबळ नसते...त्यामुळे आपण विचारक होऊ शकतो मात्र सुधारक नाही....सुधारक होण्यासाठी विचारांना कृतीचं पाठबळ हवं, कृतींना खंबीर आधार हवा ...अन् त्यासाठी समाजसुधारण्या आधी वैयक्तीक बलस्थानं अधिक बळकट करायला हवीत...सुरवात स्वतःत सुधारणा करण्यापासुन व्हायला हवी....समाजसुधारणेची हिच तर पहिली पायरी आहे...नाही का ?


#असंच_काहितरी

Wednesday, January 10, 2024

Book Review : लढणाऱ्यांच्या मुलाखती (उत्तम कांबळे)


आपल्या देशात हिमालया इतक्या उंचीची अन् तितक्याच खोलीची असंख्य माणसं जन्माला आली...सगळीच काही आपल्याला परिचीत असतातच असे नाही, पण आपल्या ऐकण्यात, वाचण्यातही अशी माणसे आली तर त्यांच्याकडुन नक्कीच खुप काही शिकायला मिळतं...जगण्याची नवी दृष्टी मिळते...ह्या माणसांचे आयुष्य, त्यांचे जगणे वाचल्यावर कळते की आयुष्यात किती उंची गाठता येते याला काही मर्यादा नसते....माणुस अमर्याद मोठा होऊ शकतो...फक्त प्रसिद्ध होणं म्हणजे मोठं होणं नाही तर आपल्याला हव्या त्या क्षेत्रात सर्वोत्तम करुन दाखवणं म्हणजे खरंतर मोठं होणं..अशी मोठी माणसं काही सहजासहजी तयार होत नाहीत...परिस्थितीच्या भट्टीत भाजुन निघणारी माणसंच पुढं यशाचा डंका वाजवुन दाखवतात...यशोशिखरावर पोहचल्यावर जो तो कौतुक करु लागतो, पण तिथपर्यंत पोहचताना किती पायवाटा पायाखाली घातल्या, किती काटे रुतले, कितीदा रक्तबंबाळ झालो, कितीदा हताश होऊन क्षणभर थांबलो, अडखळलो, पडलो, रडलो तरी चालत राहिलो, कितीदा उपहास सहन केला हे सगळं कुणाला दिसत नाही...मात्र हे सगळं सहन केल्याशिवाय, लढल्याशिवाय यशोशिखरावर पोहचताही येत नाही....अशा मोठ्या माणसांशी भेटता येणं हे ही भाग्यच...पण जेंव्हा त्यांची भेट अशक्य असते तेंव्हा पुस्तकं घडवतात भेट अशा माणसांची...अन् पुस्तकातुन ही माणसं आपल्याला भेटतात, त्यांचा संघर्ष समजतो, त्यांची लढाई कळते, त्यांच्या वाट्याला आलेल्या खाचखळग्यांना त्यांनी कसं पार केलं, हे सगळं वाचायला मिळतं, तेंव्हा पुस्तकाच्या पानातुन जणु ही माणसंच आपल्याशी बोलत असतात....बरेच काही सांगतात, बरेच काही समजावतात, मनातल्या विचारांना दिशा देण्याचं काम ही करतात...

अशीच तीन मोठी माणसं (लेखकासह चार) लढणाऱ्यांच्या मुलाखती या पुस्तकातुन आपल्याला भेटतात...ह्या देशाला जशी नाथांची परंपरा आहे तशीच अनाथांची पण आहे, अन् त्याच परंपरेतील ज्यांना स्वतःचे नाव, गाव काहीच नव्हते, ज्यांनी स्वतःबद्दल लिहिताना कवितेतही लिहीलय की,


ना घर होते ना गणगोत
चालेल तेवढी पायाखालची जमीन होती
दुकांनाचे आडोसे होते
मोफत नगपालिकेचे फुटपाथ
अशा देण्यात आलेला उठवळ आयुष्याची....

मात्र पुढे ज्यांनी आपले कवितेचे एक गाव नव्हे तर महानगरच वसवले अन् साहित्यक्षेत्रात स्वगःचे नाव अगदी अजरामर करुन ठेवले असे पुस्तकातील पहिले व्यक्ती म्हणजे कविवर्य नारायण गंगाराम सुर्वे...जन्म दिलेले आई, वडील नाही...ज्यांनी सांभाळलं त्यांनीही एका टप्प्यावर आता तु तुझं बघ म्हणुन सोडुन दिलेले..मात्र अशाही परिस्थितीत शिपाई, शिक्षक ते कामगार चळवळीतील लढ्यापर्यंत ते लढत राहिले...कुठलीही तक्रार न करता...लाभलेले आयुष्य मिळालेल्या परिस्थितीत रडत पडत न जगता लढत लढत जगणं त्यांनी मान्य केलं..प्रचंड दर्जेदार लिहिलं, तरीही चांगलं लिहायचं राहुन गेलं इतका विनम्र भाव त्यांच्या ठायी दिसतो...त्यांच्याबद्दल, त्यांच्या कवितेबद्दल, त्यांच्या तत्वप्रणालीबद्दल, कामगार लढ्याबद्दल अन् एकंदरीतच समकालीन परिस्थितीबाबत त्यांना विचारलेले प्रश्न अन् त्याची उत्तरं आपल्याला यात वाचायला मिळतात.

पुस्तकात दुसरी मुलाखत आहे डाॅ. सुनिलकुमार लवटे यांची. सुनिलकुमार लवटे हे देखील कविवर्य नारायण सुर्वे यांच्याच परंपरेतील म्हणजेच अनाथ...पंढरपुरातील बालकाश्रमात वाढलेल्या लवटे यांच्याशी मारलेल्या गप्पा... त्यातुन त्यांचा जीवन संघर्ष व सोबतच त्यांचे अनाथपणा वा अनाथांबद्दलचे विचार, सोबतच कुमारी माता, विवाहपुर्व व विवाहबाह्य संबंध याबाबतचे विचार, हे पुस्तकातील दुसऱ्या टप्प्यावर वाचायला भेटतात.

पुस्तकातील तिसरी मुलाखत आहे डाॅ. रावसाहेब कसबे यांची... फारच वैचारिक व वाचनास प्रवृत्त करणारी....कसबे हे‌ जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यीक, त्यांचे लिखाण व अभ्यास किती अफाट आहे याची जाणिव ह्या मुलाखतीमधुन होते....बुद्ध ते आंबेडकर व्हाया गांधी असा मुलाखतीचा प्रवाह आहे...मुलाखतीत बरीच वैचारिक चर्चा आहे...सामाजिक न्याय ह्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवुन अनेक मुद्द्यांवर ह्यात चर्चा केलेली आहे...लोकशाही, समाजवाद, जागतिकीकरण ह्या विषयांची सर्वांगिण चर्चा आहे...वेळोवेळी रावसाहेबांनी दिलेले अनेक दाखले, उदाहरणं आपल्याला त्यांच्या वाचनाची विस्तीर्ण कक्षा तर दाखवतातच सोबतच आपल्याला अजुन खुप काही वाचायचं बाकी आहे, समजुन घ्यायचं बाकी आहे याचीही जाणिव करुन देतात...निम्म्या पुस्तकात कसबे यांची‌ मुलाखत आहे तर उर्वरीत‌ निम्म्या भागात इतर दोघांची मुलाखत व तत्पुर्वी मुलाखतीबाबतची लेखकाने दिलेली सिद्धांतिक माहिती आहे....

पुर्ण पुस्तक हे एकंदरीत मुलाखत काय असते ? कशी ह्यावी ? याचा वस्तुपाठ तर आहेच, पण लढणाऱ्या माणसांनी लढण्यासाठी दाखवलेली वाट देखील आहे.....अवश्य वाचावे असे.


#असंच_काहितरी
#Book_Review

Wednesday, January 3, 2024

Book Review : गजाआडच्या कविता (संपादन : उत्तम कांबळे)


तुरुंग व त्याविषयीच्या आपल्या कल्पना ह्या बहुधा चिञपट पाहुनच तयार झालेल्या असतात...प्रत्यक्ष तुरुंग काही पाहिला नसेल तरीपण तुरुंगातल्या कैद्याबाबत सर्वसाधारणपणे एक नकारात्मकताच मनात असते...पण प्रत्येकवेळी तुरुंगात असणारा व्यक्ती कट्टर गुन्हेगारच असतो असं नाही...काही क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन गुन्हा घडलेले, काही शिक्षेच्या प्रतिक्षेत असणारे, तर काही सुधारण्यासाठी ठेवलेले...कैद्यांचे बरेच प्रकार असतात...बहुतेकांना नंतर आपल्या चुकीबद्दल कधी ना कधी तरी पश्चाताप होतच असावा...स्वतःविषयी अपराधीपणा वाटत असावा....स्वतःची लाजही वाटत असावी...ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्याही काळजात कोलाहल उभा राहत असेलच, नाही असं नाही....ह्या कोलाहलातुनच मग आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करण्यासाठी त्यातले काही कवितेचा आधार घेतात...पश्चातापाच्या शाईने कविता लिहीली जाते तर कधी कधी आपली फसवणुक होऊन आपण इथे खितपत पडलोय असं वाटल्यावर व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह देखील कवितेचं रुप घेतो....कैदेत असताना येणारी घरची, घरच्यांची आठवण काहींना व्याकुळ करते, त्यातुनही कविता स्फुरते...तर अशा नाना तऱ्हेच्या कैद्यांच्या नाना प्रकारच्या कवितांचे संकलन करुन उत्तम कांबळे यांनी संपादीत केलेला कविता संग्रह म्हणजे गजाआडच्या कविता......स्वातंञ्यालढ्यात अनेक स्वातंञ्यवीरांनी तुरुंगात असामान्य असं साहित्य निर्माण केलय...अर्थात् हे कैदी काही तसे स्वातंत्र्यवीर नाहीत, पण बाहेरच्या जगातील साहित्याशी आपण परिचीत असतो, ह्या अशा प्रकारच्या संग्रहातुन समाजाने गुन्हेगार म्हणुन शिक्का मारलेल्या, नाकारलेल्या लोकांच्या भावना नक्की काय असतात हे कळायला मदत होते...अन् गुन्हेगार हा ही माणुस असतो... त्याच्यातील दुर्गुणांनी सगुणांवर मात केल्यामुळे तो गुन्हेगार ठरतो...पण आपल्या चुकीची शिक्षा भोगताना जर त्याला पश्चाताप होऊन तो परत माणसु म्हणुन जगु इच्छीत असेल तर आपण त्याच्यातले माणुसपण पाहायला हवे, हे ह्या कविता वाचुन वाटत राहते...सगळेच गुन्हेगार सुधरत नाही हे जितकं खरं तितकंच सगळेच गुन्हेगार कायमस्वरुपी गुन्हेगारच राहतात असंही नाही...वैश्विक सुखाचे पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबांनी म्हटलेच आहे की,
" जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।। "

ही माऊलींची अपेक्षा आपणही ठेवायला हरकत नाही....ही अपेक्षा पुर्ण होऊ शकते असा विश्वास ह्या कैद्यांच्या कविता वाचुन वाटते...प्रस्थापितांच्या परिघाबाहेरचं हे साहित्य म्हणजे कैद्यांच्या कविता त्यादृष्टीने नक्कीच वाचनीय आहेत.


#असंच_काहितरी
#Book_Review

सरणाला सरपण देणारी व्यवस्था


आपल्या वसाहतीची नावं भीमनगर, अण्णाभाऊ साठे नगर, फुले नगर अशी ठेवावीत असे शासनाच्या कधीकाळी डोक्यात आले...या नावांमुळे महारवस्ती, मातंगवस्ती, किंवा माळीवाडा अशी जातीवाचक नावं टाळली जातील हे त्या नामांतरामागचं शास्ञ.....पण या नावांमुळे त्या त्या समाजसुधारकांना आपण त्या त्या जातीपुरते बंदीस्त तर करत नाही ना ? हा माञ विचार करण्यासारखा प्रश्न ..पण असे कित्येक प्रश्न जणु निरुत्तरीत राहण्यासाठीच असतात...असो. तर मुळ मुद्दा असा की कितीही नावं बदलली तरी नावावरुन वस्ती कळतेच...अन् वस्तीची जात/धर्म ही कळतो...असेच नावावरुन सहज लक्षात येईल अशा एका शहरातील वस्तीत मागच्या आठवड्यात जाणं झालं ...वस्तीचं नाव इक्बाल नगर...नावावरुन अंदाज आलाच असेल की ही वस्ती मुस्लिम बहुल आहे...शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीसाठी त्या भागात जाणं झालं, नाहीतरी शहरातल्या अशा बऱ्याच वाड्या, वस्त्या असतात जिथं आपण मुद्दाम कधी जातच नाही किंवा तशी काही गरजही पडत नाही....अन् मुळात असं कुणाला तिकडं जाण्याची गरज पडत नाही म्हणुनच त्या वस्त्यांच्या गरजांबद्दल कुणाला मागमुसही लागत नाही....तिथल्या त्यांच्या अडचणींचे स्वरुप आपल्याला आपल्या कार्यालयात बसुन कळणार तरी कसे ? त्यासाठी ह्या भागात जायला हवं, ते तसेच राहतात असं म्हणण्याआधी त्यांना तसं का राहावं लागतं ? याचा विचार करण्याची खरंतर गरज असते....तर ह्या भागातुन फिरताना बरेच काही दिसले...हा भाग म्हणजे जणु शहर सुशोभीकरणाची गंगा जिथे येईपर्यंतच आटली असा भाग...प्रचंड दुर्गंधी, मोडकळीस आलेली घरे, वय झालेल्या म्हाताऱ्यासारखे रस्ते, शाळा, काॅलेजात जाण्याच्या वयात व्यसन करत बसलेली पोरं...तर एकुणच हा परिसर म्हणजे खुला कारावासच वाटावा असा....ह्या भागात नगरपालिकेचे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, हे आरोग्य केंद्र म्हणजे चेहऱ्यावर सुंदरतेचा मुखवटा घातलेल्या माणसासारखं, बाहेरुन रंगरंगोटीचा मुखवटा चढवलेलं...आतुन माञ बंद खोल्या, डाॅक्टर वेळेआधीच फरार झालेले...एक शिपाई तो ही कंटाळवाणा चेहरा करुन बसलेला...आरोग्य केंद्राच्या मागे त्याच्या संरक्षण भिंतीच्या आतच वस्तीतल्या टुकार पोरांनी गँग करुन टाईमपास चालवलेला...भर दिवसा नशा करत बसलेली तरुणाई....हे सगळं चिञ व्यवस्था म्हणुन आपलं अपयश दाखवणारं आहेच, पण नागरीक म्हणुन आपण आपली कर्तव्य विसरत असल्याचंही द्योतक आहे....ही सगळी परिस्थिती बघण्याआधी त्या भागात असणारी माननीय आमदार महोदयांच्या प्रयत्नातुन साकारलेली अतिशय सुंदर अशी स्मशानभुमी बघण्यात आली....स्मशानभुमी इतकी सुंदर व आकर्षक आहे की आपण एखाद्या पर्यटनस्थळी किंवा एखाद्या नयनरम्य उद्यानात आलो आहोत असाच क्षणभर भास व्हावा....ही स्मशानभुमी पाहिल्यावर कुणालाही मरावं वाटेल  इतकी सुरेख सोय केलेली आहे...दहन विधी करायला नेण्यासाठी‌ जो मार्ग आहे त्याच्या दुतर्फा जमिनीवर टापटिप ठेवलेले लाॅन व थोड्या उंचीवर संतांचे पुतळे....एका बाजुला महादेवाची भली मोठी आकर्षण मुर्ती.....विशेष म्हणजे स्मशानभुमीची देखभालही अगदी उत्तम ठेवलेली....

स्मशानभुमी अन् तिच्या आजुबाजुची वस्ती ह्या दोन्हीत मात्र जमीन अस्मानचं अंतर.... एकंदरीत जगण्याची गैरसोय अन् मरणानंतरची सोय असं हे चिञ आहे... विशेष म्हणजे ह्या स्मशानभुमीत एक मोठा बॅनर लावलेला आपल्याला दिसेल ज्यावर दहन विधीसाठी जळतण (सरणासाठीची लाकडं) मोफत दिले जातील, असे लिहीलय... घराला घरपण देणारी माणसं असं ऐकलेलं होतं, इथं आल्यावर सरणाला सरपण देणारी व्यवस्था आपण करुन ठेवलेली आहे, याचा जणु क्षणभर अभिमानही वाटला, पण पुढच्याच क्षणी विचार आला की मेल्यानंतरची सोय आपण मोफत केलीय पण जगण्यासाठीच्या सोयींचं काय ? ह्या भागातल्या स्वच्छतेकडे आपलं लक्ष का जात नाही ? ह्या भागातले तरुण असे भर दिवसा नशा करत का फिरतात ? आपण त्यांच्या हाताला काम का देऊ शकलेलो नाहीत ? वस्तीतले रस्ते असो वा रस्त्यांवरची माणसं, यांचं जगणं देखणं व्हावं म्हणुन आपल्याला काय करता येईल ? ज्या स्मशानभुमीची गरज रोज कदाचित एखाद्याला पडत असेल तिथे ईमानेइतबारे काम करणारा स्वच्छता कर्मचारी आहे, माञ ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज रोज कितीतरी लोकांना पडते त्याची माञ हेळसांड होतेय..आरोग्य केंद्रच आजारी पडलेलं अन् डाॅक्टर मात्र वेळेवर उपलब्ध नाही, वस्तीतल्या पोरांचा अड्डा हे केंद्र झालय.. किती मोठ विनोद आहे की जिवंत माणसापेक्षा मेलेल्या माणसाच्या नशिबी अधिक चांगल्या सोयी आहेत... असो..ह्या सगळ्याचा अर्थ स्मशानभुमी चांगल्या असु नयेत का ? तर असंही नाही... अर्थात् त्या चांगल्याच असाव्यात... त्यामुळे मयताची हेळसांड वाचते... ज्यांना आयुष्यभर अशा सुंदर, सुशोभित ठिकाणी जाता आलं नाही, अशांना मेल्यानंतर का होईना तो प्रवास घडतो... मृताचा सन्मान राखला जातो....शेवटचा प्रवास सुखाचा होतो ... पण ह्या सगळ्यां बरोबर आवश्यक आहे ते म्हणजे जगण्यासाठीच्या सोयी सवलती देणं.. 

आरोग्य केंद्राच्या भिंतींपेक्षा आतले डाॅक्टर अधिक कणखर असणं...नशा करणाऱ्या पोरांना रोजगार देणं, फक्त सरकार किंवा प्रशासनाची सर्व जबाबदारी आहे असं नाही, तर इथं राहणाऱ्या प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखणं... स्वतःला कशाची गरज आहे हे ओळखणं.... मुलां-मुलींना शाळेत पाठवणं... आपल्या आजुबाजुला स्वच्छता राखणं.. रस्ते ही सरकारची मालमत्ता समजुन घर साफ करुन घरातली घाण रस्त्यावर टाकणं हे बंद व्हायला हवं... गटारींच्या स्वच्छतेकडे स्थानिकांनी पुढाकार घेणं...आपल्या समस्या नगरपालिकेच्या लक्षात आणुन देऊन नगरपालिकेला सहकार्य करुन काम करणं...आपलं घर स्वच्छ रहावं म्हणुन जितके प्रयत्न करतो तितकेच प्रयत्न आपला परिसर स्वच्छ राहील यासाठी करणं... तरुणांनी स्वतःला कौशल्य शिक्षण व त्यातुन रोजगार यात स्वतःला गुंतवुन ठेवणं... आरोग्यास घातक असणाऱ्या व्यसनांपासुन दुर राहणं... एक जबाबदार नागरिक बनुन व्यवस्थेला प्रश्न विचारणं.... केवळ तक्रारदार न बनता आपल्या समस्येवर आपणच उपाय सुचवणं...शिक्षण, आरोग्य ह्या मुलभुत क्षेञांकडं लक्ष देणं...आपण स्वतःच स्वतःची माती करुन न घेता सरकार अन् समाज यातील नाती घट्ट करणं.... आरोग्य केंद्रात नशा करत बसुन कुणाचा फायदा होईल का ? उद्या आपल्यापैकीच कुणाला तरी दवाखान्याची गरज पडेल तेंव्हा वेळेवर डाॅक्टर उपलब्ध होतील का ? आपल्या ञासामुळे डाॅक्टर खरच नियमित येतील का ? आले तर पुर्णवेळ केंद्रात थांबतील का ? याचा विचार नक्की करायला हवा...अन्यथा आपणं सरकारला, प्रशासनाला शिव्या श्राप देत राहु माञ स्वतः बेजबाबदारपणे वागत राहु .... तर अशाने आपल्यावर जगणं महाग अन् मरण स्वस्त होत आहे असंच म्हणायची वेळ येईल हे निश्चित... अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वांनीच आपापल्या शहरातल्या अशा वाड्या, वस्त्यांकडे लक्ष देऊयात....अगदी त्या वस्तीने सुद्धा स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे..अपेक्षा करुयात येत्या काळात विकसित भारताच्या स्वप्नपुर्तीत ह्या अशा भागांचा विकास देखील झालेला असेल... फक्त आर्थिक नाहीतर एकंदरीत मानवी विकास.....सर्वसमावेशक, शाश्वत विकास !


#असंच_काहितरी

Tuesday, January 2, 2024

Book Review : जगण्याच्या जळत्या वाटा (उत्तम कांबळे)


शाळेत असताना सकाळ पेपरच्या सप्तरंग पुरवणीतील उत्तम कांबळे सरांचे लेख आवर्जुन वाचलेले.....सरांचे 'फिरस्ती' हे सदर त्यावेळी प्रसिद्ध असलेले....या लेखांचा विषय सामान्य माणुस अन् त्याच्या वाट्याला आलेले आयुष्य हा असायचा, त्यामुळे हे लेख म्हणजे आपल्या आजुबाजुच्या जगाची माहिती देणारे असायचे...वाचताना तंद्री लागायची...एकदा लेख वाचायला सुरु केला की कधी वाचुन झाला कळायचं पण नाही...आपण स्वतः एकच आयुष्य जगु शकतो...पण वाचनातुन आपण इतरांच्या आयुष्यातील घटना, प्रसंगातुन शिकत आपलं आयुष्य समृद्ध करु शकतो...त्याकरीता वाचलं पाहिजे...माझ्याबाबतीत वाचनाविषयीची आवड रक्तातुनच वाहत मागच्या पिढीतुन माझ्यात आली... मी ती आजपर्यंत जिवंत ठेवली आहे अन् जिवंत असेपर्यंत जिवंत राहीलच कारण वाचनाने खुप काही दिलं आहे....आजुबाजुचं आपल्याला दिसणारं जग दिसतं तसंच नसतं, हे वाचनातुन कळालं...इतरांच्या आयुष्यातील दुःख, वेदना अन् संघर्ष वाचुन आयुष्यातील स्वप्नांच्या पाठीमागे धावताना प्रेरणा मिळाली....समाजातील भल्या बुऱ्यांचं दर्शन पुस्तकातुन होत आलं ...माणसं वाचण्यासाठी पुस्तकं वाचणं आवश्यक असतं...खरंतर पुस्तकातुन भेटलेली माणसं प्रत्यक्षात भेटलेल्या माणसांपेक्षा जास्त शिकवुन जातात, आधार देतात, प्रेरणा देतात, कधी हसवतात, तर कधी रडवतात, कधी विचार करायला लावतात, आयुष्याचा अर्थ उलगडुन दाखवतात, माणसांच्या जगण्याच्या तऱ्हा समजु लागतात.....आजुबाजुचं जग नव्या नजरेनं बघण्याची ताकद पुस्तकं देतात...तर हे असे असंख्य फायदे पुस्तकं सर्वांना देतात...वाचक पुस्तकांमध्ये भेद करु शकतो, मला हे वाचायचं ते नको किंवा मी ते नाही वाचणार मला हेच हवं असं वाचक म्हणु शकतो....पुस्तकं माञ तोच संदेश, तोच मार्ग वाचणारा कुणीही असला तरी दाखवत राहतात...म्हणुन पुस्तकं वाचली पाहिजे...पुस्तकंच नाहीतर अगदी वर्तमानपत्र असो वा नियतकालिक जे वाचण्यायोग्य ते सर्व वाचलं पाहिजे...अर्थात् हे सारं मी वाचुनच शिकलो आहे...वाचल्यावरच कळलं की वाचलं पाहिजे, म्हणुन वाचत गेलो अन् अजुनही वाचतो आहे....

तर मुळ विषय आहे सरांच्या 'फिरस्ती'चा ...हे सदर साधारणतः मी आठवी - नववीत असेल तेंव्हा यायचे....आता त्याला जवळपास बारा तेरा वर्ष झाली...बरेच लेख विस्मरणातही गेलेले...पण मागच्या सरत्या वर्षाच्या शेवटी पुण्यात भरलेल्या पुस्तक महोत्सवात (पुस्तक महोत्सवाचा काळ : 16 - 24 डिसेंबर 2023) फिरताना मनोविकास प्रकाशनाच्या स्टाॅलवरती 'निवडक फिरस्ती - जगण्याच्या जळत्या वाटा' ह्या नावाचं उत्तम कांबळे सरांचं पुस्तक दिसलं....पुस्तक बघितल्यावर लक्षात आलं की जे 'फिरस्ती' सदर आपण वाचायचो त्यातीलच लेखांचे सरांनी दोन पुस्तकात रुपांतर केले आहे...त्यातील दुसरा भाग म्हणजे हे 'जगण्याच्या जळत्या वाटा' हे पुस्तक... पुस्तक हातात घेतलं अन् लगेच विकतही घेतलं....विकत घेऊन तसंच ठेवुन देणं शक्य नव्हतं...बऱ्याच पुस्तकांच्या नशिबी हे असं विकत घेतलं जाणं पण लवकर वाचलं न जाणं येतं..ह्या पुस्तकाबाबतीत ते झालं नाही...पुस्तक आणल्यानंतर लगेच वाचायला घेतलं अन् वाचुन काढलं...पुस्तक वाचताना जुन्या 'फिरस्ती' सदराची आवर्जुन आठवण आली....पुस्तकातील लेख अर्थात् अप्रतिम आहेतच...पण महत्वाचं म्हणजे शाळेत असताना ज्यातलं मर्म तेंव्हा कदाचित कळत नव्हतं ते आता समजतय...आपल्या आजुबाजुच्या जगावरचं हे भाष्य आता विचार करायला भाग पाडतय...पुस्तकात चाळीसपेक्षा अधिक लेखांचा संग्रह आहे....प्रत्येक लेख आपल्याला व्यक्ती, घटना, प्रसंग यांची भेट घडवतो...लेखातील व्यक्ती विषयी माहीती मिळण्यासोबतच त्या अनुषंगाने सरांनी त्याबाबतीत केलेलं भाष्य हे फार विचार करायला लावणारं...अंतर्मुख व्हायला लावणारं आहे....आयुष्य म्हणजे एक प्रवास असं आपण ऐकलं, वाचलं आहे...ह्या आयुष्याच्या प्रवासात फिरताना आपल्याही भेटतात अनेक व्यक्ती, अनेक घटना, अनेक प्रसंग आपल्याही वाट्याला येतात...पण आपण कधी त्यावर फारसा विचार करत नाहीत किंवा कधी कधी तर ह्यावर विचार केला पाहिजे हे ही आपल्या ध्यानीमनी येत नाही..अशा व्यक्ती, घटनांवर सरांनी विचार केलाय अन् ते फिरस्तीत मांडुन आपल्यालाही फिरताना डोळे उघडे ठेवुन फिरण्याचा जणु अप्रत्यक्ष पणे कानमंत्रच दिलाय....प्रत्येक लेखामध्ये आपल्याला कुणी ना कुणी भेटतो...ज्याच्या जगण्याच्या वाटेवर काही ना काही अडचण आहे...काही ना काही वेदना आहे....जगताना धावणाऱ्या पृथ्वीसोबत पळणं आहेच, पण पळताना जळणंही वाट्याला यावं असं काहींचं प्राक्तन असतं...ही अशी माणसं जगणं ज्या धीरोदत्तपणे जगतात, ते नेहमीच प्रेरणादायी असतं...अशा अनेक प्रेरणादायी कथा आपल्याला ह्या लेखांमधुन वाचायला मिळतात....ह्या कथांमधुन सरांनी अनेकांच्या दुःखाला वाचा फोडली होती...अनेकांच्या असहायतेला सरांच्या लेखणीने आधार दिला...समाजाने दुर्लक्षित ठेवलेल्या अनेकांकडे ह्या लेखांमुळे समाजाचं लक्ष गेलं...

बालकामगाराची अवस्था असो वा नोकरी करणाऱ्या आई वडिलांच्या बंद दारा आड राहणाऱ्या पोरांची अवस्था असो... बालकांच्या सामाजिक, मानसिक स्थितीवर अचुक भाष्य यातील संबंधीत लेखांमध्ये करण्यात आलेले आहे...खासगी शाळेत मुलांना शिकवण्याचं वाढतं प्रमाण यावर भाष्य करणारा एक लेख यात आहे.. त्याच‌ बरोबर डोनेशन ह्या गोंडस नावाखाली पैसे घेऊन मास्तर करणारी खासगी महाविद्यालयं व तिथली व्यवस्था, त्या व्यवस्थेचे शिकार होणारे अशा एकुण परिस्थितीवर प्रकाश टाकणारा लेखही यात आपल्याला वाचायला मिळतो...आपल्या अपंगत्वावर मात करत वेदनेतुन कवितेचा वेद निर्माण करणारे लक्ष्मण गोळे, घोळाची भाजी विकणारी मावशी, मुक्या-बहिऱ्याला पदरात घेऊन संसार करणारी माता किंवा स्मशानात मृतदेहाला मसाज करणारी सुनिता, अशी नाना प्रकारची माणसं आपल्याला यातील विविध लेखांमध्ये भेटतात...माणुस हे अजब रसायन आहे, अन् प्रत्येकाचे जगणे किती कमालीचे असते याची प्रचिती ह्या लेखांमधुन येते....विविध सामाजिक बाबींवर भाष्य करणारे लेख आपल्याला ह्यात वाचायला मिळतात....जसे, हाॅटेलात वाया जाणारे अन्न, प्रत्येक गोष्ट सरकारची जबाबदारी आहे म्हणत अंग झटकणारे नागरीक, स्वतः खस्ता खाऊन आपल्याला शिकवणाऱ्या आई-वडिलांना सांभाळण्यास नकार देणारे पोर, अध्यात्माच्या आहारी जाऊन विज्ञानाची अवहेलना करत वैद्यकीय उपचार न करणारा वयोवृद्ध, सृजनाची ताकद असलेल्या तरुणाईला हलकट जवानी म्हणणं, देहदान इत्यादी. असे विविधांगी लेख वाचताना पुढच्या लेखाकडे जाण्याआधी मागच्या लेखांमधील गोष्टींवर विचार केल्यास मनात अनेक विचार येत राहतात...आपल्याला विचार करण्यास भाग पाडणारे हे लेख एकवेळ अवश्य वाचायला हवेत..लेख जुने असले तरी यात विविध सामाजिक घडामोडींवर, समाजातील मुल्य व्यवस्थेवर केलेलं भाष्य हे आजही प्रासंगिक आहे....तेंव्हा हा वाचनीय लेख संग्रह आवर्जुन वाचायला हवा....अन् ह्या जगण्याच्या जळत्या वाटा धुंडाळायला हव्यात....आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपलं चालणं सोपं व्हावं म्हणुन....!!!



#असंच_काहितरी
#Book_Review