Friday, July 11, 2025

Book Review : उसवण (देवीदास सौदागर)


आमच्याकाळात हे असं नव्हतं, ते तसं नव्हतं, असं आपण आपल्या आई वडिलांकडून ऐकत आलोय. कधी कधी वाटतं, खरंच इतकं वेगळं असेल का तेंव्हाच जग ? पण जेंव्हा स्वतःला अनुभव येतो तेंव्हा लक्षात येतं जग खरंच बदललय...बदलत चाललय... आपल्या लहानपणी आपण बघितलेलं जग आता तसं राहिलं नाही. कित्येक गोष्टी बदलल्या आहेत अन बदललेल्या जगात जगणं सुद्धा बदलत चाललय. दूध जसं दूधवाला देतो तसं कपडे दुकानवाला देतो हे सामान्य ज्ञान असलेल्या पिढीला दूधवाला दूध कुठून आणतो आणि दुकानवाला कपडे कुठून आणतो याची माहिती घेण्याची गरजच उरलेली नाही, अशी परिस्थिती. रेडिमेड कपडे वाढले तसे कपडे शिवणारे कमी व्हायला लागले. अगदी शहरातच नाही तर गावातही रेडिमेड कपड्यांचीच चलती आहे. रेडिमेड कपड्यांची फॅशन शिंप्यांचं शोषण करु लागलीये. हाच धागा धरून आपल्या सभोवतालचं वास्तव बघून देवीदास सौदागर यांनी 'उसवण' ही कादंबरी शिवली आहे. कादंबरीचा नायक 'विठू' हा साधा, भोळा, आपलं काम इमाने इतबारे करणारा गावातला टेलर. त्याच्या फाटलेल्या आयुष्याची ही कथा. ही विठू इतकीच बदलत चाललेल्या गावाची सुद्धा कथा आहे. लोकं रेडिमेड कापडं वापरायला लागल्याने कापडं शिवून घालणारे फार कमी झाले. याचाच परिणाम टेलरिंग करणाऱ्यांवर होतो. पहिल्यासारखं उत्पन्न मिळेनासं होतं. घर गरिबीच्या खाईत ढकललं जातं. शेवटी पर्याय नाही म्हणून व्यवसायच बंद करावा लागतो. अशी सगळी ही कहाणी. ह्या कहाणीत फक्त विठू नाही. यात नवऱ्याच्या फाटक्या संसारातही त्याची खंबीरपणे साथ देणाऱ्या बायकांचे प्रतिनिधित्व करणारी 'गंगा' आहे. विद्यार्थ्यांनी गरिबीमुळे मागं राहू नये यासाठी तळमळणाऱ्या गुरुजींचं प्रतिनिधित्व करणारे 'साळुंखे सर' आहेत. वणव्यात गारव्यासारख्या मित्रांचं प्रतिनिधित्व करणारा 'जगू' आहे. गावातल्या धनिक पण बेमूर्वत माणसांचे प्रतिनिधित्व करणारा 'भीमा' आहे. चंगळवादी संस्कृतीचा शिकार ठरलेला 'देवबा' आहे. गावातले वरिष्ठ तात्या, बापू आहेत. एकूणच सारा गाव गोतावळा कहाणीत आहे. या सगळ्यांना घेत कहाणी गावातलं राजकारण, भांडण-तंडे, तरुणांची अवस्था यासारख्या विषयावर सुद्धा भाष्य करते. ग्रामीण जीवनातल्या उसवत चाललेल्या घडीचं अचूक वर्णन यात वाचायला मिळतं. कादंबरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला विचारमग्न करते.

"अलीकडच्या काळात जगणं चिरडलं गेलं.

सांडलेल्या रक्ताची किंमत उरली नाही.

माणसाला पर्याय उभे राहिले. 

ही साधीसुधी गोष्ट नाही.

याचं गांभीर्य तुम्हाला आताच कळणार नाही."

ह्या ओळी कादंबरीत वेड्याच्या नोंदी म्हणून सापडतात मात्र त्या अतिशय समर्पकपणे बदलत्या काळचं वर्णन करत आपल्याला शहाणं करू पाहतात. अतिशय छोटी, ओघवत्या मराठवाडी भाषेतली, फाटलेल्या आयुष्याला मेहनतीच्या धाग्यांनी शिवू पाहणाऱ्या विठोबा शिंप्याची ही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कहाणी सर्वांनी आवर्जून वाचावी अशी.

___________________________

कादंबरी : उसवण

लेखक : देवीदास सौदागर

#असंच_काहीतरी  #Book_Review

भरकटलेले पार्थ


 

आणीबाणी

 


Saturday, May 17, 2025

टेक-ज्योतिषी आणि आपण


आपकी जन्मतारीख बतायेगी की आपकी शादी कब होगी ? कौन होगा आपका लाइफ पार्टनर ? कब लगेगी आपको नौकरी ? या व अशा प्रश्नांनी सुरू होणाऱ्या जाहिरातींचं पेव सध्या सोशल मीडिया विशेषतः युट्युबवर फुटलेलं दिसतं. ही आधुनिक अंधश्रद्धा, हा आधुनिक दैववाद, शिकल्या सवरलेल्या आणि समाज माध्यमांवरती वावर असणाऱ्या तरुण-तरुणींना आकर्षित करू पाहतोय. काही प्रसिद्ध कलाकार, काही सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएन्सर) हे देखील अशा ॲप्लिकेशनची जाहिरात करताना दिसतात. AstroTalk, InstaAstro, Melooha, AstroYogi, AnytimeAstro, AstroSage Kundli ही त्यातली काही नावं. हे सगळे ॲप आपल्याला ज्योतिषाशी मेसेजच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी देतात. यातले बहुतेक ॲप, 'पहिली चॅट फ्री', अशा लोभसवाण्या जाहिरातीतून ग्राहकांना आकर्षित करतात. एकदा ॲप सुरू केले की मग पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये किंवा यापेक्षाही अधिक प्रति मिनिट दराने चॅटिंग सुरू होते. एखादा बुवा बाबा जसं दर्शन फुकट देतो परंतु नंतर दक्षिणा गोळा करतो, अगदी तसंच हे आधुनिक मोबाईल बाबा/बाई करतात. 

एखाद्या देवी देवतांना नवस बोलणं किंवा बाबाबुवाचा अंगारा लावणं किंवा कोंबडं, बकरं कापणं ह्या प्राचीन अंधश्रद्धेप्रमाणेच या ॲप्लिकेशन सुद्धा अंधश्रद्धाच आहेत. भूतकाळाचा अभिमान आणि भविष्याचं आकर्षण हा मानवी स्वभाव धर्म. आपल्याला आपलं भविष्य माहित नसतं आणि नेमकं त्याच कुतूहलातून आपण आपलं भविष्य सांगणाऱ्या वेगवेगळ्या बाबाबुवांसमोर हात जोडून उभे राहतो. फार पूर्वी हात बघून, कुंडली बघून नशीब सांगणारे, पोपटाद्वारे नशीब सांगणारे, असे ज्योतिषी आजूबाजूला दिसायचे. काळ बदलला. जग विज्ञानवादी झालं. कुंडलीतल्या मंगळाचा विचार न करता आकाशातल्या मंगळाचा विचार करून आपण मंगळयान अवकाशात पाठवलं. तरी सुद्धा आपण भविष्यवाणी सांगणाऱ्या अशा ज्योतिष्यांना मात्र कुठेही पाठवू शकलेलो नाहीत. ते इथेच आहेत, आपल्या आजूबाजूला. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त ज्योतिषी नव्हे तर एआय ज्योतिषी अशा रूपाने ते आता पुढे येतायत. 

आपलं भविष्य, आपला जन्म कधी झाला ? कुठे झाला ? यावर कधीच अवलंबून नसतं. ते पूर्णतः आपल्या कर्मावर अवलंबून असतं. याचं भान जर आपल्याला असेल, तर अशा आधुनिक बुवा बाबांपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. ह्या ॲप्लिकेशन मध्ये भविष्य सांगणाऱ्या व्यक्तींना आपलं भविष्य काय आहे ते माहित नाही, पण त्यांचं भविष्य हे अशा भविष्य सांगण्यातच आहे, हे पक्कं माहिती असतं. आपलं भविष्य सांगत सांगत ते त्यांचं भविष्य सुरक्षित करतात. बऱ्याच दिवसांपासून मला ह्यांना तपासायचे होतेच. मग मागील आठवड्यात मी ह्या आधुनिक ज्योतिषांना तपासण्यासाठी माझं लग्न कधी होणार ? असा मेसेज एका ॲपद्वारे केला आणि बघतो तर काय, चक्क या प्रश्नाचं उत्तर क्षणात यांनी 2026 मध्ये आपल्या लग्नाचे योग आहेत, असं देऊन टाकलं. खरंतर माझं लग्न मागीलवर्षीच म्हणजे 2024 मध्येच झालंय. या साध्या प्रश्नातून नक्की कोणत्या प्रकारचं आणि कुणाचं भविष्य हे सगळे सांगतात यावर शंका येते. 

ह्या अशा भविष्य सांगणाऱ्यांपासून दूर राहण्यासाठी अगदी संत साहित्यापासून कवी, गझलकार या सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. भूत-भविष्य सांगणार्‍या लोकांनी जगरूढीसाठी दुकान घातलेले आहे. बाजार मांडलेला आहे. त्यांच्या आहारी जाणे म्हणजे ईश्वरापासून दूर जाणे होय. तेव्हा भविष्य जाणून घेण्याचा अट्टाहास कशासाठी? जे काही व्हायचे ते प्रारब्धानुरुप होईल. अशा मतितार्थाने तुकोबा आपल्या अभंगात म्हणतात,

भूत भविष्य कळों यावें वर्तमान ।
हें तों भाग्यहीन त्याची जोडी ।।1।।

आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते ।
होणार ते होते प्रारब्धेंची ।।2।।

जगरूढीसाठी घातले दुकान ।
जातो नारायण अंतरूनि ।।3।।

तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा ।
थोरली ती पीडा रिद्धि सिद्धी ।।4।।

भविष्य हा पोटार्थी धंदा आणि भविष्य सांगून सामान्य माणसांना दैववादी बनविण्याचा हा खोटारडा व्यवसाय तुकारामांना अमान्य आहे.

"हाथों की लकीरों पे मत जा ऐ ग़ालिब,
नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते ।"

असं म्हणणारा गालिब असो, नाहीतर 

 "नको नको ज्योतिषा 
 माझ्या दारी नको येऊ 
 माझे दैव मला कळे
 माझा हात नको पाहू" 

असं म्हणणाऱ्या बहिणाबाई असोत. या सर्वांचा उद्देश एकच समाजाला दैववादी न बनवता कर्मवादी बनवण्याचे. आपल्याला कर्मवीर बनवण्याचे.

भारतात दर मिनिटाला अंदाजे 600 बालक जन्माला येतात. आता आपली जन्मतारीख अन वेळ जर आपलं भविष्य ठरवणार असेल, तर ह्या 600 बालकांचं भविष्य सारखंच असलं पाहिजे. असं होतं का ? अर्थातच नाही.... कुणी रस्त्याच्या कडेला जन्म घेतो, कुणी सरकारी दवाखान्यात, कुणी खाजगी दवाखान्यात तर कुणी घरीच. आपल्या जन्माची ठिकाणं जशी वेगवेगळी असतात, तशीच आपली नशीबं देखील. एवढच कशाला, दवाखान्यात आजूबाजूला असलेली दोन बालके सुध्दा भविष्यात सारखीच नसतात. सांगण्याचा उद्देश एवढाच की ह्या अशा ज्योतिष्यांच्या नादी लागण्यात काहीही उपयोग नाही. 

मी नववीला असताना एकानं सांगितलं होतं, तू दहावी पास होणार नाही मात्र दहावीला मी पहिल्या क्रमांकाने पास होऊन त्याच व्यक्तीला पेढे द्यायला गेलो. पुढे बारावीला गेल्यानंतर एकाने सांगितलं, दहावीला भरपूर मार्क्स असणारी मुलं बारावीला नीट पास सुद्धा होऊ शकत नाहीत. मी चांगल्या मार्काने पास होऊन, अगदी गणितात 100 पैकी 100 गुण मिळवून त्याचं गणित खोटं ठरवलं. एवढंच कशाला हस्ताक्षरावरून भविष्य सांगणाऱ्या एकाने मी इंजिनिअरिंगला असताना माझं स्वप्न (अधिकारी होण्याचं) गाठण्यासाठी मला पुष्कळ वर्ष लागतील, अशी भविष्यवाणी केली होती. इंजीनियरिंग संपल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन मी त्याचीही भविष्यवाणी खोटी ठरवली. हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच, हातावरच्या रेषा नव्हे तर हातातले पुस्तक आपले भविष्य घडवत असते, हा माझा स्वानुभव. कदाचित म्हणूनच बशीर बद्र देखील म्हणतात की, 

कभी मैं अपने हाथों की 
लकीरों से नहीं उलझा
मुझे मालूम है क़िस्मत का 
लिक्खा भी बदलता है ||

आपणही असंच ह्या सगळ्या आधुनिक ज्योतिषांमध्ये न अडकता आपल्या कर्मावर, आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. आपल्या हातातला मोबाईल जाऊन, हातात पुस्तक आलं तर आपल्याला आपलं भविष्य विचारण्याची गरज पडणार नाही, उलट आपलं भविष्य आपणच घडवू शकू. या देशाला भविष्य विचारणाऱ्या नाही, तर भविष्य घडवणाऱ्या पिढीची गरज आहे. त्यासाठी ह्या आपल्या पिढीने अशा आधुनिक टेक-ज्योतिषांपासून दूर राहण्याची गरज आहे. दैववादी नाहीतर कर्मवादी बनण्याची गरज आहे.

Wednesday, May 14, 2025

आता थांबायचं नाय

 


एखाद्या सिनेमाबद्दल लिहावं वाटणं तसं फार दुर्मिळच. दुर्मिळ यासाठी की मी काही चित्रपट समीक्षक नाही किंबहुना कसलाच समीक्षक नाही. फार पूर्वी स्लॅम बुक या मराठी चित्रपटाबद्दल लिहिलं होतं त्यानंतर सत्यशोधक या चित्रपटाच्या निमित्ताने काही मनातलं कागदावर उतरवलं होतं, त्यानंतर आता परत एक अप्रतिम सिनेमा पाहण्यात आला आणि साहजिकच काही लिहावंसं वाटलं. आजूबाजूच्या अवास्तव, रोमँटिसिझम जपणाऱ्या काळात अस्सल, दर्जेदार आणि वास्तववादी कथा पडद्यावर साकारणं तसं जिकिरीचं आणि हल्ली दुर्मिळ काम, परंतु 'आता थांबायचं नाही' या सिनेमाच्या रूपात दिग्दर्शकांनी हे जिकिरीचं काम अतिशय अप्रतिम पद्धतीने पार पाडलय. कथा, संवाद, संगीत, अभिनय साऱ्याच पातळीवर सिनेमा परिपूर्ण भासतो. बीएमसीचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांच्या दृढ निश्चयातून रात्र शाळेसारख्या उपक्रमामधून शिकणाऱ्या सफाई कामगारांची ही कथा. 2016 साली बीएमसीचे एकूण 23 चतुर्थ श्रेणी कर्मचारी दहावी पास झाले. हिच गोष्ट या सिनेमाच्या निमित्ताने रंगीत पडद्यावर आली आहे. परंतु ही फक्त सफाई कामगारांची कथा नाही तर त्यांची व्यथा देखील आहे. अल्प पगारात काम करणारा शिक्षक, सुरक्षा साधनांशिवाय काम करणारे सफाई कामगार, घर चालवण्यासाठी तीन-तीन शिफ्ट मध्ये काम करणारा मुंबईतला माणूस, अशा सगळ्यांच्या वेदनेकडे हा सिनेमा अंगुलीनिर्देश करतो. एखादा अधिकारी ठरवून बदल कसा करू शकतो याचं उदाहरण यात बघायला मिळतं. अतिशय छोट्या छोट्या प्रसंगातून महत्त्वाच्या बाबींवर मार्मिक पद्धतीने भाष्य सिनेमात केलं गेलंय. सिनेमा हसवतो, रडवतो, समजावतो अन प्रेरितही करतो. अतिशय अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांना उपलब्ध करून देणाऱ्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन तथा आभार.

#Movie #Review #MarathiMovie 

Tuesday, May 6, 2025

कातरवेळी

नेमक्या निरोपाच्या वेळी, दाटतात ओळी

 कंठात माझिया सये, या अशा कातरवेळी  

~ शशिच्या मनातले 



Monday, March 17, 2025

Book Review : सीतायन (डॉ. तारा भवाळकर)


सीता ही पतिव्रता म्हणून भारतीय स्त्री समोर कायम आदर्श बनून राहिलेली आहे. येथील प्रत्येक अडल्या-नडलेल्या स्त्रीला आजही आपण सीतेची उपमा देत असतो. सीता ही सोशिकतेचं मूर्तीमंत प्रतीक, सहनशील स्त्रीयांची प्रतिनिधी अशी आपण ऐकलेली, वाचलेली आहे. आपल्या लहानपणी आपण बघितलेल्या, ऐकलेल्या रामायणात राम हा केंद्रबिंदू तर सीता ही रामायणाचे कारण अशीच रंगवलेली दिसते. खरंतर वाल्मिकी रामायण व त्यानंतर लोकपरंपरेतील अनेक सीता-राम कथा यात बरेच भेद सापडतात. लोकपरंपरेतील स्त्री रचित रामकथा या खरंतर राम कथा असण्यापेक्षा सीताकथा आहेत आणि म्हणूनच त्यांना रामायण म्हणण्याऐवजी सीतायन म्हणणे जास्त योग्य होईल, अशी भूमिका लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर आपल्या समोर मांडतात. त्यांचे सीतायन हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे फक्त सीतेची व्यथा आणि कथा नसून सीतेच्या वेदनेचा आणि विद्रोहाचा वेगवेगळ्या लोक रामायणात सापडलेला सूर आहे. हे पुस्तक एक लेखसंग्रह आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात राम सीता विविध ओव्यातून, गाण्यातून, कथातून वेगवेगळ्या लोकसमूहाने मांडलेल्या आहेत. या सर्व लोकपरंपरेतील सीता-राम कथा व त्यावरील विवेचन, विश्लेषण या पुस्तकातील विविध लेखात आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील तथ्यांशी न जुळणारे बरेच तथ्य यात सापडतात. खरंतर राम कथा ही भारतीय परंपरेतील एक मिथक आहे, असेही म्हटले जाते. मात्र ते मिथक असो वा सत्य त्यातील मानवीमूल्ये जी मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत ती नक्कीच आपण स्वीकारू शकतो. या पुस्तकात मुख्य चर्चा ही सीतेच्या वनवासाबद्दल आपल्याला वाचायला मिळते . सीतेचा एक वनवास जो रामासोबत तिला भोगाव लागला, तो आपण बघितलेला वाचलेला आणि ऐकलेला आहे, मात्र तिचा दुसरा वनवास जो रामाशिवाय होता तो मात्र आपल्याला फारसा परिचयाचा नाही. त्या दुसऱ्या वनवासाचे कारण वेगवेगळ्या लोककथांमध्ये वेगवेगळे आहे. काही ठिकाणी धोब्याची कथा आहे, तर काही ठिकाणी कैकयीला जबाबदार धरलेय तर काही ठिकाणी सीतेची नणंद व रामाची सावत्र बहिण कुकवा हिला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. जबाबदार कुणीही असो आणि कारण काहीही असो, मात्र सीतेच्या वाट्याला सदा सर्वदा सासुरवास, छळ आलेला आहे. भारतीय स्त्री मनाला कदाचित सीतेच्या याच व्यथेमुळे सीता जवळची वाटत असावी. त्यामुळे जात्यावरच्या ओव्या गाताना बाया म्हणत राहतात,

सीतेला सासुरवास केला ग केसी केसी

वाटून दिला तिने सयांना देसोदेशी

किंवा 

सीतेला सासुरवास झाला ग परोपरी 

वाटून दिला तिने सयांना घरोघरी 

सीतेला सासुरवास झाला ग बहु बहू 

वाटून दिला तिने सयांना गहू गहू 


अशाप्रकारे जात्यावरच्या ओव्यांमध्ये सीता उमटते. सीतेचा त्रास, वनवास बघून भारतीय स्त्री मन आपलं दुःख हलकं करतं. रामाने तिला वनवासाला पाठवलं. असं असलं तरी रामाचं देवपण खुजं न करता स्त्रिया सीतेचं दुःख मांडताना म्हणतात,

सीता नारीला वनवास, तुमची आमची काय कथा 

देव माणसाच्या घरी कलियुग शिरला होता 


रामाचं देवपण खुजं न करता लोकरामायणातली सीता प्रत्येक स्त्रीच्या जीवाची सखी झाली आहे. सीतेच स्थान रामापेक्षा या स्त्रियांना काकणभर उंचावरचं वाटतं आणि म्हणूनच त्या म्हणतात,

राम म्हणू राम, न्हाई सीताच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलाचा


या पुस्तकात लेखिकेच्या भाव विश्वातील राम, लोक मानसातील राम, सीतेचे दोन वनवास, रामाची अ-काल दुर्गापूजा, स्फूटओवितील सीतायन, अंकुश पुराण, मूळ कन्नडातील चित्रपट रामायण, (बंगालीतील) चंद्रावती रामायण, दशरथ जातक आणि आदिवासींचे सीतायन, असे विविध लेख आहेत. विविध लोककथांमध्ये कमी अधिक फरकाने रामकथेत सीतेचा वनवास आलेला आहे. सीता ही नक्की कोण होती तिचे माता-पिता कोण होते या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्टपणे कुणाकडे सापडत नाहीत. याचं कारणच हे आहे की वाल्मिकी रामायण व इतर सर्व रामायणं यांच्यात एकवाक्यता नाही. काही लोककथांमध्ये सीता रावणाची मुलगी, तर काही लोककथांमध्ये सीता रामाची बहिण असाही उल्लेख सापडतो अर्थात हे सर्व ऐकायला बरं वाटत नसलं तरी तत्कालीन परिस्थितीचा विचार केल्यास काही बाबी पटायला सोप्या जातात. मुळात रामायण हा आपल्या सबंध भारतीय जनांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, मात्र रामायणाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा रामायण सीतेमुळे घडलं असंच आपण ऐकतो, पण या पुस्तकातलं विवेचन वाचल्यानंतर आपण विचार करू लागतो की खरंच रामायण सीतेमुळे घडलं की आपली बुद्धी न चालवता दुसऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रामा मुळं ? खरंतर रामायण कुणामुळे घडलं हा मूळ प्रश्न नाहीच. खरा प्रश्न हा आहे की भारतीय सीतेचा वनवास कधी संपणार ? भारतातील सीतांची वेदना कधी संपणार ? "नुसता रावण संपून चालणार नाही तर निष्करूण पद्धतीने सीतेचा विचार करणारा रामही संपला पाहिजे आणि भवभूतीच्या उत्तर रामचरितामधला करुणांकित राम जागा झाला पाहिजे",असं जे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे म्हणतात ते अगदी योग्य असल्याचं आपल्याही मनाला पटतं. पुस्तकाच्या शेवटी बंगालीतील चंद्रावती रामायणाच्या संहितेचा मराठी अनुवाद देखील आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकात भरपूर वैचारिक मंथन आहे. प्रत्येक बाब वाचताना आपण विचार मग्न होतो. नवीन काहीतरी सापडल्याचा आनंद होतो, मात्र सीतेचं सनातन दुःख संपत नसल्याखंत ही वाटू लागते. प्रत्येक विचारी माणसानं वाचायलाच हवं असं डॉ. तारा भवाळकर यांचं 'सीतायन' हे पुस्तक वाचून समृद्ध झाल्याची भावना मनात येते. सीता-राम कथेचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठी आणि लोककथांमधील रामायण समजून घेण्यासाठी हे 'सीतायन' नक्की वाचा.

पुस्तकाचे नाव : सीतायन 

लेखिका : डॉ. तारा भवाळकर 

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन 


#असंच_काहीतरी 

#Book_Review

Book Review : स्टॉप ओव्हरथिंकिंग (निक ट्रेटन)


आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणात अति विचाराने पछाडलेले असतो. कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात अति विचाराचे प्रसंग येतात त्यातून अस्वस्थता (Anxiety) जाणवते. विचारांची न तुटणारी साखळी आपल्या मनात वारंवार तयार होत राहते. जे अस्तित्वात नाही, जे वर्तमानात नाही, जे भविष्यात होईल याची खात्री देखील नाही, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत बसतो. एवढेच नाही तर हे सगळं कसं थांबवायचं याचा ही विचार आपण सर्वजण करतो. खरंतर अति विचार कसे थांबवायचे याचा सतत विचार करत राहणं, हाही अतिविचाराचाच एक भाग म्हणता येईल कारण आपण इथे प्रत्यक्ष उपाय न अवलंबता फक्त विचार आणि विचारच करत राहतो. ह्या विचाराला कृतीची जोड मिळावी, उपाय अवलंबता यावेत आणि ह्या सगळ्या विचारांच्या साखरदंडातून स्वतःला मुक्त करता यावं, यासाठी इंग्रजी लेखक निक ट्रेटन याने लिहिलेलं "स्टॉप ओव्हरथिंकिंग" हे पुस्तक आपली मदत करू शकतं. या पुस्तकात अस्वस्थतेची कारणे आणि अस्वस्थता व अतिविचार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. उदाहरणार्थ या पुस्तकात तणाव टाळण्यासाठी चार A टेक्निक्स चा उल्लेख येतो हे. चार A म्हणजे Avoid, Alter, Accept आणि Adapt हे होय. यासोबतच आपली वेळ ऊर्जा याचं व्यवस्थापन कसं करावं ? क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी काय करावे ? स्वतःशी सकारात्मक स्वसंवाद कसा साधावा ? आणि एकूणच आपल्या भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ? या सगळ्यांवर या पुस्तकात सहज सोप्या शब्दात चर्चा केलेली आहे. सेल्फ हेल्प गटातील हे पुस्तक आपली निश्चित मदत करू शकते. फक्त ते वाचून बाजूला ठेवलं तर उपयोग नाही. वाचलेल्या बाबी आयुष्यात अवलंबण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपली फार मोठी मदत या पुस्तकाच्या रूपाने आपण स्वतःच करू शकतो.

पुस्तकाचे नाव : स्टॉप ओव्हरथिंकिंग 

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस 

लेखक : निक ट्रेटन 

अनुवाद : अवंती वर्तक 


#असंच_काहीतरी 

#Book_Review

Tuesday, March 11, 2025

जागतिक महिला दिन विशेष




जागतिक महिला दिनाच्या औचित्त्याने नगरपंचायत मारेगाव तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन


मारेगाव नगरपंचायती द्वारे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन नगरपंचायत सभागृहात करण्यात आले. दुपारी तीन वाजता वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. पहिला गट आठवी ते बारावीचे विद्यार्थी तर दुसरा गट हा 18 वर्षावरील महिलांसाठी खुला होता. स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी व महिला यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेचे विषय होते : 

1) स्त्री पुरुष समानता स्वप्न की वास्तव?

2) महिलांसाठीचे सुरक्षा कायदे पुरेसे आहेत का ? 

सहभागी विद्यार्थी व महिलांनी दिलेल्या विषयावर आपली मते मांडली. ह्या स्पर्धेचे परीक्षण मा. मुख्याधिकारी श्री शशिकांत बाबर (म.श.प्र.से.) व युवा वक्ता प्रतिक्षा गुरनुले यांनी केले. या स्पर्धेनंतर चार वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेमध्ये शहरातील महिलांनी भाग घेतला. आपल्या घरून बनवून आणलेल्या रुचकर पदार्थांचे सुशोभीकरणासह प्रदर्शन स्पर्धेत करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण माजी नगराध्यक्ष इंदुताई किनेकर व सौ. अंजली बाबर यांनी केले. या दोन्हीही स्पर्धेनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम संध्याकाळी साडेपाच वाजता पार पडला. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी सौ. किरणताई देरकर (अध्यक्ष - एकवीरा महिला ग्रामीण पतसंस्था) या प्रमुख पाहुण्या तर मार्गदर्शक म्हणून डॉ. सपना केलोदे या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमास मा. नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, माजी नगराध्यक्ष इंदुताई किनेकर व रेखाताई मडावी आणि माझी महिला व बालकल्याण सभापती सौ. अरुणाताई खंडाळकर इत्यादी मान्यवरही उपस्थित होते. दोन्हीही स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी नगरपंचायत च्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या उस्फुर्त प्रयत्नातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. नगरपंचायत शहरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करत राहील. अशा सर्व कार्यक्रमास नागरिकांनी प्रतिसाद देत जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. शशिकांत शांताबाई मारोती बाबर यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.

#मारेगाव 
#नगरपंचायत
#maregaon_diaries 

Saturday, February 15, 2025

Book Review : नेमका हात कुणाचा (सागर काकडे)


दिली सुपारी त्यांनी माझ्या देहाची दलालांना,

माझ्या कवितेचा खून त्यांना परवडणारा नव्हता !  

अशा शब्दात आपली कविता ही किती अपरवडनीय आहे असे सांगणारा कवी म्हणजे सागर रामचंद्र काकडे. या कवीचा कवितासंग्रह - नेमका हात कोणाचा ? नुकताच वाचनात आला. या कवितासंग्रहातील कविता ह्या मुक्तछंदातील आहेत. कविता मुक्त असतील मात्र त्यातील शब्द आपल्याला बांधून ठेवतात, विचार करायला लावतात. अगदी थोडक्यात सांगायचं तर कवितासंग्रहातील कविता प्रेम, प्रणय, निषेध, विरह, विरोध आणि विद्रोह इथपर्यंत जाऊन पोहचतात आणि फक्त त्या पोहोचत नाहीत तर आपल्यालाही घेऊन जातात. 'बांगडी' ह्या कवितेत कवी म्हणतो,

बांगडी नसते गर्विष्ठ 

नसते जरा ही तकलादु 

बांगडी जाहीरपणे बोलत नाही काही 

तिच्यातच सामावलेली असते 

अख्खी बाई 

बाईच्या बांगडीचा इतका खोलवर विचार या कवितेत आपल्याला सापडतो. कवी फक्त प्रेमाची गाणी गात नाही तर व्यवस्थेने दिलेला त्रास सुद्धा त्याच्या ध्यानी आहे आणि म्हणूनच 'जाहिरात' या कवितेत कवी शेवट करताना असे म्हणतो,

बटव्यात शेवटची उरलेली

तंबाखू मळत 

सारी स्वप्न तळहातावर चोळत 

तो घराकडे निघतो 

रोज माणसांना 

चुना लावणाऱ्या व्यवस्थेला शिव्या देत

यात फक्त अगतिकता नाही व्यवस्थेविरुद्धचा विरोध आहे, विद्रोह आहे. इंडिया आणि भारत यातल्या अंतरावर चर्चा होत राहते मात्र फक्त चर्चेतून प्रश्न सुटला नाही म्हणूनच त्यावर वारंवार लिहिलं जातं, बोललं जातं. त्याच अंतरावर इंडिया आणि भारत ही कशी दोन भिन्न टोकं आहेत आणि त्या दोन टोकावर असणाऱ्या माणसांचं जग सुद्धा वेगवेगळं आहे, हे मांडताना 'भिन्न टोक' नावाच्या कवितेत कवी असं म्हणतो,

पब मधल्या चांदण्या 

कितीही सुंदर भासत असल्या तरी 

अप्सरा वगैरे नकली असतो इंद्र 

नोकरी टिकवण्यासाठी

प्रत्येकाच्या मानेला सुरा लावून 

उभा असतो लाचार चंद्र 

आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाताना काही गोष्टी आपल्या सोबतच घडतात असं जेव्हा वाटतं तेव्हा लेखक, कवी त्यांच्या कलाकृतीत असं काही लिहून जातात की असं जाणवतं, आपण एकटे नाही, हे दुःख, ह्या वेदना, हा त्रास आपल्यासारखाच कित्येकांच्या वाट्याला आलेला असतो किंवा येणार असतो आणि हे वास्तव आहे हे आपण स्वीकारायला लागतो कारण वास्तवाच्या विस्तवाचा कितीही त्रास होत असला तरी ते स्वीकारण्याशिवाय माणसाच्या जवळ दुसरा उपाय नाही. अशाच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना रेखाटताना 'किती भयानक असतं ना' या कवितेत कवी म्हणतो,

ज्यांच्यासाठी आपण 

मरून गेलेलो असतो 

त्यांच्यासाठीच आपल्याला 

जगावसं वाटतं 

कीती भयानक असतं ना 

मानवी जीवनाची ही वास्तव बाजू मांडताना कवी आयुष्याकडे किती परखड भूमिकेतून बघतो हे समजतं. सामाजिक बाबींकडे लक्ष वेधताना बाईला उंबऱ्याच्या आत राहायला शिकवणाऱ्या संस्कृतीचा कवी आपल्या कवितेत वेध घेतो आणि 'चेला' या कवितेत असे म्हणतो,

बाई बाई असते सांगणारा उंबरा 

संस्कृतीचा चेला 

उंबऱ्याला संस्कृतीचा चेला मानतो कवी.

समाजातील परिस्थितीच भान असणं हे कुठल्याही साहित्य कृतीसाठी अत्यंत आवश्यक असतं तेच समाज भान ठेवून समाजातील दुर्लक्षित, नजरेआड राहिलेल्या बाबींकडे लक्ष वेधण्याचे काम साहित्यिक करत असतात. या कवितासंग्रहातील 'देणं घेणं' या कवितेत कवीने इंद्रायणीच्या पाण्यात डुबकी मारून भक्तांनी देवाच्या नावाने टाकलेले किंवा कोणीतरी सरणाची राख पाण्यात सोडताना टाकलेले पैसे जमा करणाऱ्या पोराचं लक्ष हे जागतिकीकरणावर किंवा इतर कुठल्याही गोष्टीवर नसतं तर ते त्याच्या भुकेवर असतं हे ठासून सांगितले आहे. जगभर वाढत जाणारी कट्टरता, धर्मांधता, पसरणारा आतंकवाद, दहशतवाद या बाबींचे वर्णन करून कवी थांबत नाही तर त्यावर उपाय सुद्धा सुचवण्याचं काम तो करतो. 'कट्टरता' या कवितेत कवी म्हणतो,

माणूस सिरयात मरू दे 

नाहीतर तुझ्या एरियात 

मालेगावात मरू दे 

किंवा भीमा कोरेगावात 

जात पात धर्म यापेक्षा 

एका माणसाचा जीव सुद्धा मोलाचा असतो

मित्रा त्या जीवासाठी आपण 

समतेचा वारं पसरवायला हवं 

हेच समतेचे वार पसरवण्याचं काम कवी आपल्या कवितेतून करतो आहे. हे काम इतकं सोपं नाही. शब्दांचे शिलेदार राजरोस मारले जातायत, शब्द शस्त्रापेक्षाही असहनीय होतायत आणि म्हणूनच शब्दांची पालखी वाहणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घातल्या जातायत. कदाचित हीच भीती या ही कवीच्या मनात असावी मात्र त्या भीतीने घाबरून न जाता उलट कवी आपल्या कवितेत असं म्हणतो,

अरे धार लावली आता होऊ द्या ना घनघोर युद्ध 

तुमच्या गोळ्या आणि माझे शब्द 

म्हणजेच शत्रूच्या, धर्मांधांच्या गोळ्यांपेक्षाही आपले शब्द धारदार आहेत, शक्तिमान आहेत, याची खात्री कवीला पटलेली आहे आणि म्हणूनच कवी आव्हान देतो की,

माझ्यातला छत्रपती एकदा अजमावूनच बघा

नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा.

अशाप्रकारे , या कवितासंग्रहात विविध कविता विविध अंगी विचारांना जाग करणाऱ्या आहेत. तेव्हा आपल्याला जाग यायला हवी असं वाटणाऱ्या प्रत्येकानं हा कवितासंग्रह वाचायला हवा. समाजातील नको असणाऱ्या घटनांमागे नेमका हात कोणाचा याचा विचार करायला हवा. इतकी उत्तम कलाकृती वाचकांना उपलब्ध करून देण्यामागे असणाऱ्या नेमक्या हाताचे म्हणजेच कवीचे विशेष आभार.

Sunday, February 9, 2025

गांधी


मारून तू मेला नाहीस 

गोळ्या घालून तू संपला नाहीस

मग बदनाम करण्याचं कारस्थान रचलं 

तरी तुझं मनोबल नाही खचलं 

तू चिडत नाहीस, तू रडत नाहीस, 

हसत राहतोस

तुझ्या अहिंसेला भ्याड म्हटलं तरी 

तुझ्या सत्याला गाड म्हटलं तरी

तुला गाडलं तरी तू उगवून येतोस

हसऱ्या चेहऱ्यानं सारं बघून घेतोस 

तुझ्या चेहऱ्यावरचं मोनालिसासारखं हास्य 

मोनालिसासारखंच गूढ 

ना हास्य उलगडतं, ना गांधी ...........


#शशिच्या_मनातले 

#असंच_काहीतरी

Tuesday, January 21, 2025

Book Review : ओह माय गोडसे (विनायक होगाडे)

 


गांधी हा चेष्टेचा, हेटाळणीचा विषय व्हावा इतकं असं गांधीकडून काय चुकलं की गांधी समजून घेताना आपलंच काही चुकलं ? अर्थात गांधीचं चुकलं नसेल त्यापेक्षा अधिक आपलंच चुकलंय....कथा, कादंबऱ्या अन नाटकं म्हणजेचं इतिहास समजणाऱ्या अन व्हाट्सअँप , फेसबुक ह्या विद्यापीठात शिकणाऱ्यांना गांधी हा पाकिस्तानचा कैवारी, देशाचे तुकडे पाडणारा, फाळणीचे कारण, भगतसिंग यांचा फासी पासून बचाव न करणारा, अर्धनग्न फकीर किंवा अजून बरंच काही वाटत असतो... संबंध आयुष्य सत्य अन अहिंसा ह्या विचारांचा जागर करणारा, कधीही कुणाचा विरोध न करणारा गांधी उभा केला जातो कधी आंबेडकर तर कधी नेताजी यांच्या विरुद्ध तर कधी चक्क आधुनिकतेच्याही विरुद्ध.... एक मात्र खरं... गांधी काही केल्या संपत नाही... गांधी कितीदाही मारला तरी मरत नाही... गांधी पुरून उरतो साऱ्यांनाच...अन म्हणून गांधी वर कितीही लिहिलं तरी गांधी अनाकलनीयच ठरतो... गांधीजी वरती अनेक पुस्तकं लिहिली गेली, सिनेमे झाले, नाटकं झाली... काहींनी समज दिली तर काहींनी गैरसमज निर्माण केले...विनायक होगाडे लिखित ओह माय गोडसे हे असेच एक अत्यंत सुंदर गांधीजी बद्दलचे गैरसमज दूर करणारे पुस्तक...मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक बघून नथुराम बनलेल्या एकावर मानसोपचार तज्ञ उपचार करताना नाटक रचतात अन गांधीजी बद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात... अशी एकंदरीत कथा आहे... पुस्तकाचे विशेष म्हणजे हे पुस्तक हा इतिहास नाही, ऐतिहासिक दस्ताऐवज नाही असे स्पष्टीकरण लेखकाने सुरवातीलाच दिले आहे... तरीही गांधीजी मजबुरी का नाही तर मजबुती का नाम आहे हे या पुस्तकाच्या वाचनातून सहज लक्षात येते..... पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आहे... प्रसंग अत्यंत रोचक पद्धतीने उभे केलेले आहेत... एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेवूच वाटणार नाही असं एका बैठकीत वाचून पूर्ण होणारं अत्यंत सुंदर पुस्तक म्हणजे ओह माय गोडसे... हे वाचल्यावर आपसूकच तोंडी शब्द येतात - ओह माय गॉड ! व्हॉट अ बुक !


#असंच_काहीतरी 

#Book_Review