Saturday, March 25, 2017

थेट काळजातून

लुटले ज्यांनी मजला, ते माझेच यार होते ।
समजले ज्यांना ईमानदार, तेच बेईमान फार होते ॥

यारहो अद्याप तरी, सोडली ना मी ईमानी ।
माझ्याच तत्वांशी मी, केली ना बेईमानी ॥

आजही तसाच आहे , जसा होतो मी काल ।
चालतो तसाच अजुनी, ना बदलली मी चाल ॥

# वास्तव.....
*✍शशि........*

शशिच्या लेखणीतून

*✍ शशिच्या लेखनीतुन...*

आज एखादी गोष्ट हातुन निसटली म्हणुन वाईट वाटु देऊ नका, कदाचित उद्या काही अप्रतिम मिळणार असेल म्हणुन आज हे चांगलं तुमच्या हातुन गेलं आहे......
-------------------------------------
आज नियतिनं काही दिलं नाही म्हणजे तुम्ही त्या लायकीचे नाही असं नाही कदाचित तुमची लायकी त्यापेक्षा जास्त असेल म्हणुन तुम्हाला ती साधी गोष्ट मिळाली नाही...
-------------------------------------
माणुस कालही तोच होता आजही  तोच आहे , आपल्या गरजा बदलल्या की आपलं त्याच्याविषयीचं मत बदलतं.... खरच माणसाची भुक बदलली की भुमिका बदलते....
--------------------------------------
एखाद्या बद्दल चांगलं वा वाईट मत बनवण्या अगोदर त्या पुर्णपणे समजुन घ्या... केवळ तुमच्या उपयोगितेवर एखाद्याला चांगलं वा वाईट घोषित करु नका...
--------------------------------------
माणुस सिंहासनावर बसला काय किंवा जमिनीवर त्याच्या विचारांनी आकाश भेदलं पाहिजे... नाहीतर केवळ तुमच्या पदाशी प्रेम करणारेच तुम्हाला जास्त भेटतील ... विचारांशी ईमान राखणारे नाही....
------------------------------------
एखादी गोष्ट दिसते तितकी सोपी नसते अन् वाटते तितकी अवघडही.... ती कशी आहे ते अनुभवातुनच कळते...
-------------------------------------
तुमच्या असण्याने फरक नाही पडला तरी नसण्याने माञ नक्कीच फरक पडायला हवा...
-------------------------------------
वस्तु असो अथवा व्यक्ति किंमत गरज पडल्यावरच कळते...
-------------------------------------
जे समजायला अवघड जातं ना ... तेच अर्थपूर्ण असतं मग ते पुस्तक असो किंवा मस्तक....
-------------------------------------
एखाद्या लेखकाची वाक्ये समजायला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा जास्त वेळ विचार करुन त्यानं ती मांडलेली असतात......

*# असच काहितरी ......*
*# शशिच्या मनातले.....*

असच काहितरी

खर तर माणसाचही असच असतं काही सुंदर प्रसूत होणार असलं की वेदना होतातच, अगदी असह्य अशा वेदना पण म्हणुन वाईट वाटु द्यायचं नाही. थकायचं नाही ... मला होणारा ञास इतरांना होत नाही, सारे जग सुखात आहे माझ्याच वाट्याला ह्या वेदना का आल्यात असही वाटतं बर्याचदा पण सुंदर, पविञ्य मांगल्याचा उदयही आपल्याच कुशीत होणार आहे हे विसरून कसं चालेल .... म्हणुन आपल्या वाट्याला आलेली दुःख ही क्षणाची आहे थोड्या वेळापुरतं ती भांबावुन सोडतील आपल्याला , अगदी नको वाटेल तो ञास , पण ते सहन केलं तर उद्याची सुंदर उत्पति आपल्यापोटीच होणार हे नक्की.....

शेवटी काय तर सोन्यासारखं पिक जेंव्हा मातीतुन वर येतं तेंव्हा ते मातीला काही कमी ञास देतं असेल का.... तिचं पोट फाडुन ते वर डोकावतं तेंव्हा ते पाहुन आपण आनंदाने डोलावत असतो पण ती वेदना फक्त मातीनेच सहन केलेली असते .... म्हणुन सार्या जगाला न होणार्या वेदना फक्त मातीच सहन करते कारण सोनं प्रसुत करण्याची ताकद फक्त तिच्यातच आहे.....

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही चांगल्या गोष्टी आपल्या हातुन घडणार असल्या की तत्पुर्वी वेदना होणारच, ञास सहन करावा लागणारच .... एकदा का यशाचा मोती बाहेर आला कि शिंपल्याच्या वेदना गोड वाटायला लागतात ....

म्हणुन माणसात सहनशीलता असावी वेदना सहन करण्याची मग ती आतली असो की बाहेरची ...

*वेदनेची माय झाल्याशिवाय प्रसुत होणार्या यशाच्या बाळाचा बाप कसं होता येईल....*

*✍शशि.....*

समाजसेवा

त्याने समोरच्या भिकार्याचा हात झिडकारला जोरात
चल हो बाजुला मला घाई आहे
खेकसुन त्याच्यावर तो पुढे निघाला
स्टेशनच्या बाहेर फाटक्या कपड्यातलं भारताच भविष्य त्याच्या समोर हात पसरवतं होतं
त्यान तिकडतर लक्षच दिलं नाही
कारण तो घाईत होता....
मामु जल्दी करो म्हणत रिक्षावाल्या आजोबा वरही तो जोरातच बोलला जरा
कारण तो आज तोर्यातच होता
कारण आज त्याची मुलाखत होती
मुलाखतीतला पहिला प्रश्न,
आपल्याला अधिकारी का व्हायचय...
मला समाजसेवा करायचीय, याचं पाठ केलेलं उत्तर...
पॅनेलही खुष झालं, त्याच सलेक्शनही केलं
परतीच्या वाटेवर त्याला दिवसभराचा प्रवास आठवत होता
तो त्याला परत पाठवत होता
पण तो भिकारी , ते पोर, तो बाबा
परत परत सारं सांगत होता
तुझी समाजसेवेची व्याख्या काय?
एवढेच उत्तर मागत होता......

# होय असही घडतं बर्याचदा.....

✍शशि...( मनातले मांडताना...)

शिवजयंतीविशेष

राजे तुमच्याच महाराष्ट्रात हल्ली तुम्ही दोन दोनदा जन्माला येता.... पण फक्त जयंतीपुरतेच.....
तुम्हाला उरावर घेऊन मिरवणारे मी पाहतो उघड्या डोळ्यांनी पण तुम्हाला उरात ठेऊन जगताना नाही दिसत कुणी...
तुमचा अभिमान आहेच इथल्या प्रत्येकाला कारण प्रत्येक जण वारसदार आहे नात्याने पण विचाराने माञ नाही म्हणता येणार ....
आजही तुमच्या नावावर फक्त इथे राजकारणच छान जमतं कारण जातीवादाला तुमच नाव पुरुन ऊरतं.... पण राजे जातीपलिकडे अजुन आम्हाला जाता येत नाही....
आम्ही तुम्हाला तसबिरीत पाहुन थोडे झुकतो खरे पण तुमच्या विचारापासुन हुकतोच थोडे...
नाही नाही वाटत लाज आम्हाला आमच्या वागण्याची कारण आम्ही तुमचे भक्त ....
खर तर इथच चुकलो आम्ही  .. तुम्हाला केले देव अन् झालो  तुमचे भक्त ... सळसळते आमुचे रक्त पण डाॅल्बीच्या समोरच फक्त , राजे खरच,

एकदा या हो फिरुन, आणि हो आता थोडे होऊन या सक्त
तेवढेच उरलय आता फक्त....

आणि हो प्रश्न तुमच्या जयंतीचा ति कितीदा ही केली तरी काहीच फरक पडणार नाही कारण .... गांधीची देवाणघेवाण करुन सह्याद्रीची माती अंगावर घेणारा गुलाल अंगावर घेतोय हल्ली ....
जो पर्यंत तुम्ही इथल्या प्रत्येकाच्या काळजात जन्म घेत नाहित तोपर्यंत तुमची जयंती फक्त वर्तमानपञातिल बातमीच बनुन राहिल ........

मी सत्य बोलतो म्हणुन काहींना हे झोंबेलही पण माझ्या लेखनीने ही तुमचाच वारसा घेतला तिला बेईमानी कशी करता येईल .... अगदी स्वतःच्या चुकांही भिडस्तपणे मांडते ती अन् जाब विचारते मलाही.....

राजे ऊरात पेरतोय जिजाऊंचे संस्कार ... आता शिवबा जन्मेलच काळजात
तेंव्हा तोपर्यंत अभिवादन नंतर मीच तुमचा अंश असेल........

*✍शशि.....*

होळी

होळी.....🎨

सण होळीचा होळीचा
लावू ऐकमेका रंग ।
प्रेमरंगात सारेच
आज होऊया रं दंग ॥

नको घाबरु कशाला
गाठ यशाचा कळसं ।
भर उन्हाळ्यात कसा
बघं फुलतो पळसं ॥

बेरंग ज्यांची जिंदगानी
तया करुया रंगीत ।
बोलु तयांशी ही थोडे
ऐकु त्यांचेही संगीत ॥

जाळु अंहकार आज
करु दुर्गुणांची होळी ।
करु उधळण प्रेमाची
भरु आनंदाने झोळी ॥

अशा न्यार्याच पद्धती
असे करुनं उत्सव ।
जगु असेकाही जणु
आयुष्यच महोत्सव ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*

असच काहितरी

होय मी दुःख मांडतो कारण तेच वास्तव आहे .... कल्पनेतला गोड गुलाबी सुंगंध तुमचं मन भरत असेल पण रिकाम्या पोटांच काय....? त्यांची प्रश्न भेडसावतात माझ्या लेखनीला ...?
मग ती कशा लिहणार गोष्टी तलम रेशमी कापडाची जर तिने फक्त सतरा जागी शिवलेली चिंधीच जास्त जवळुन पाहिलेली आहे... तिन फाटलेला सदरा अन् घामान काळा खाप झालेला रानातल्या बापाचा रुमालच पाहिलाय तर ती कशा लिहिल गोष्टी तुमच्या सो साॅफ्ट कपड्यांची, तिन राकेलावर जळणारी चिमणी पाहिलीय अधिक जवळुन म्हणुन तर तुमच्या दिव्यांच्या जगमगाटात दिपतात तिचे डोळे, तिनं ढेकळांना सारुन झोपणारी माय पाहिलीय कुशीत शिरुन , मग कसं शक्य आहे तिला मऊदार गालिछांवर कविता करणं....?

पण म्हणजे तिला विकासावर, आधुनिकतेवर व्यक्त व्हायचं नाही असही नाही बरं .......

*✍शशि.....*
*📞९१३०६१०८३४*

माईंच्या भाषणातील शब्दमोती

आज ञिमुर्ति फाऊँडेशनच्या सत्कार समारंभी आदरणीय डाॅ. सौ. सिंधुताई सपकाळ ( माई ) यांचे भाषण ऐकले ......
माईंच्या भाषणातील काही काळजाला भिडलेली वाक्ये....

> बाहेरची दिवे विझतातच म्हणुन काळीज पेटलं पाहिजे तेंव्हा कुठे रस्ता सापडतो.

> काट्यांना फक्त टोचायच माहित असतं त्यांना वेदनेची भाषा कळत नाही.

> आई ही सायकलच्या मागच्या चाकासारखी असते रे, जिच्या नशिबी सारा भार असतो.

> वेळप्रसंगी गाणं म्हणुन खाणं मिळावावं लागलं.

> माझ्या लाडक्या लेकींनो जरा अंगभर कपडे घाला , हि पाश्चात्य संस्कृति आपली नाही रे.
तुम्हाला पाहुन समोरच्याला मादि नाहि माय आठवली पाहिजे.

> स्वतः मरणारी सिंधुताई मरणार्यांसाठी जगाला शिकली म्हणुन जगाला परिचित झाली.

माई खरच तुमचं जगणं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे.....
लाख लाख सलाम 🙏🙏

आत्मचिंतन

शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले होते किमान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका ...........//
घरातला गणेशोत्सव चौकात गेला पण चौकातले शिवराय अजुन आमच्या घराघरात पोहचले नाहित हिच ह्या मातीची खंत आहे...

स्वतःला मावळे, शिवभक्त म्हणवणार्यांनो जरा स्वतःला बघा, डाॅल्बीच्या तालावर नाचणं म्हणजे शिवराय समजणं नव्हे तर बाहेर डाॅल्बी वाजत असताना आत शिवराय वाचणं म्हणजे शिवराय समजणं होय ......

स्वतःला शिवभक्त म्हणत शेजारच्या पोरीकडे काय भारी माल आहे असं जेंव्हा म्हणतोस ना, तेंव्हा खर तर तुझ्या धमन्यातलं रक्त बदलय असं समज .....
स्वतःला शिवभक्त म्हणत सहज इथल्या गडकिल्यांवर जेंव्हा तु आपलं अन् आपल्या प्रियसीच नाव कोरतोस ना,तेंव्हाच खर तर तुझ्या धमन्यातलं रक्त बदललय असं समज ......

स्वतःला शिवभक्त म्हणतं जेंव्हा जातीवादाचा गोष्टी करतोस अन् जातीचा माज सांगतोस, तेंव्हाच खर तर तुझं रक्त बदललय असं समज ......

स्वतःला शिवभक्त म्हणत जेंव्हा अंगाला अंगारा फासतोस अन् दिवसातुन सतरा वेळा नुसतं कर्मकांड करतोस तेंव्हाच खर तर तुझ्या धमन्यातलं रक्त बदललय असं समज .......

तेंव्हा एकदा आत्मचिंतन कर, स्वाभिमानी महाराजांचा वारसदार मग का शे-सव्वाश्यासाठी कुणाचेही पाय चाटतोस ....
गळा फाटोस्तर सायबांनाच्या नावाने ओरडतोस .........

*विचार कर ....... पटलं तर स्वीकार कर नाहीतर धिक्कार कर पण ह्याशिवाय समाजाला मिळायचे नाही आकार अन् व्हायचे नाही सुराज्याचे स्वप्नही साकार ...........*

*#आत्मचिंतन*
*#शशिच्या मनातले*

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*

शिवबाराजा

सुमारे चारशे वर्षापुर्वी या महाराष्ट्राच्या मातीला पडलेले स्वप्न, सुभेदाराच्या पोटी जन्माला येऊन सम्राट झालेला , सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला अन् सह्याद्रि एवढीच ऊंची व खोली लाभलेला, शेतकर्यांचा राजा, बहुजनांचा राजा अर्थात माझा शिवबा राजा....

काही माणसं इतिहास वाचतात, काही माणसं इतिहास घडवतातही पण लाखो वर्षापुर्वीचा इतिहास बदलवणारा राजा म्हणजे माझा शिवबा राजा .....

मुठभर मावळ्यासोबत लाखो यवनांशी गाठ घेणारा अन् कधी वेळ आलीच तर गनिमी कावा करत पाठ दाखवुन पळणारा राजा म्हणजे शिवबा राजा.......

इथल्या मातीवर नाहीतर लोकांचा मनावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा शिवबा राजा ......

अशा या युगपुरुषाच्या स्मृतिस विनम्र अभिवादन! !!!

सर्वांना शिवजयंतीच्या खुप खुप शुभेच्छा!!!!!
शिवजयंती नाचुन नाहीतर वाचुन साजरी करा म्हणजे स्वराज्याच सुराज्य व्हायला वेळ नाही लागणार

✍शशिकांत मा. बाबर

ससा

****** *ससा* ******

तु इतक्यात थकलास कसा
तु इतक्यात बसलास कसा
तो बघ पहिल्यासारखा कुठे
आता बसतो का ससा ॥

ससा शहाणा झालाय आता
तोही मध्येच थांबत नाही आता
तु तुझे सातत्य ठेव तसेच कायम
पण ध्यानात राहु इथे गतिचेही नियम ॥

प्राण्यांकडुन तुही घे एवढा वसा
तो बघ पहिल्यासारखा ....
...........

गतीशिवाय नाही प्रगती
ठेव एवढे ध्यानात
ठरवुन टाक एकदाचे
जिंकायचे तुझ्या मनात ॥

एकदा का ठरवलं मनात
मग बघ कोण आडवतो कसा
फक्त चालत राहा हरघडी
सारे पडेल पदरी .....
नको पसरु पसा

तो बघ पहिल्यासारखा .....
.................

ससा भारी का कासव भारी
उगाच डोकं लावून , घेऊ नकोस कष्ट
तुझ्यासाठी महत्वाची सारीच गोष्ट
दोघांकडुनही शिकुन घे
शिकता येईल जेवढं
गति जेवढी महत्वाची महत्वाच सातत्यही तेवढं

म्हणुन सांगतो तुला
थकुन नकोस बसु नकोस
चालत राहता अखंड
गतीही सांभाळ थोडी
तिचेही असतात काही मापदंड ॥

उगाच याला त्याला नाव ठेवण्यात
दुखवु नकोस घसा ......

तो बघ पहिल्यासारखा कुठे
आता बसतो का ससा ..॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*
*www.Shashichyamanatale.blogspot.com*

भिक

*भिक.......*

चार पैशासाठी गड्या तु
खादीचा गोंडा घोळतोस ।
तेंव्हा तुझ्याच हातानं तु
लोकशाहीचा गळा घोटतोस ॥

हिरव्या निळ्या नोटांसाठी
तु कुणालाही देतोस वोट ।
दोन दिसाच्या मस्तीसाठी
तु कुणाचही धरतोस बोट ॥

आज तुझ्यापाशी फकिर होऊन
मागतात जे तुझ मत ।
तेच उद्या गोदामात साठवतील
तुझ्याच हाडाच खत ॥

म्हणुन म्हणतो वेड्या
अशा भिकारड्यांना देऊ नकोस भिक
दोन दिवस मस्तीत अन् मग सस्तीत जगण्यापेक्षा
ताठपणे जगायला शिक ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

व्हॅलेंटाईन

***** *व्हॅलेंटाईन* *****

माझा एक *रोज* तिच्यासाठी
जी मर मरते *रोज* माझ्यासाठी
माझा एक *प्रपोज* त्या बापासाठी
जो राबतो कुठल्याही *परपज* शिवाय माझ्यासाठी ...॥

माझे एक *चाॅकलेट* त्या बापासाठी
जो भिडतो वादळांशी *थेट* फक्त माझ्यासाठी
देईन म्हणतो मायेलाही एक *टेडी*
रानोमाळी माझ्यासाठी राबते जी *वेडी* ...॥

करायचाय तिच्याशी आयुष्याच्या संध्याकाळी
साथ देण्याचा *प्राॅमिस*
जि आठवत राहते क्षणोक्षणी
जिला नेहमीच करतो *मिस* ...॥

कधीतरी संध्याकाळी त्याच्या गालाचा
घ्यायचा अलगद एक *किस*
ज्याचा राबुन राबुन माझ्यासाठी
पडलाय सारा *किस* .....॥

अशा माझ्या माय अन् बापाला
एकदा कडाडुन करायच *हग*
ज्यांनी सोसली माझ्यासाठी धग
अन् दाखवले हे *जग* ....॥

असे निराळे दिस अन् अशी निराळी पद्धत
एकदा तर करुनच *पाहिन*
कारण माझे माय अन् बाप
हेच आहेत माझे *व्हॅलेंटाईन* .....॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*९१३०६२०८३४*
*www.Shashichyamanatale.blogspot.com*

दुनिया

*माय म्हणते दुनिया बदलली....*

माय म्हणते दुनिया बदलली
ते काही खोटं नाई ।
याचा दिसं त्याचा दिस
जगताना नुसतीच घासघीस
आयुष्याचा पुरता पडलाय किस
खरच माणुस माणुस राहिला नाही
माय बोलते दुनिया बदलली
ते काही खोटं नाई .....॥

पोरं घालते शाटकट , मिनीस्कट
कधी ह्येव कट कधी तेव कट
पोरगा काही कमी नसते
ते ही चपटी पिते घटघट
मग बापाची घरी चालु व्हते कटकट
लेकरं मातर सांगुन
ऎकत काहीच नाही
माय म्हणते दुनिया बदलली
ते काही खोटं नाई ......॥

पोरगी फिरते बायफ्रेंडसोबत
काय ते असते म्हणे
लिव इन रिलेशनशिप
जवानीची धुंदीत मग
भरकटते आयुष्याची शिप
जनरेशन गॅप म्हणतं लेकरं
माय बापाले बोलुच देत नाई
माय म्हणते दुनिया बदलली
ते काही खोटं नाही .....॥

ओठावरती मिसुरडंही न फुटलेली पोरं
जवा मारते पिरमाच्या गप्पा
तवा कळते राजाहो,
आपणत पोरीक नुसते बघितले बी
तवा पप्पा द्यायचा पाठीत धप्पा
आता कसे गुलुगुलु मिळुन
खाती पोरंपोरी गोलगप्पा
खरच मला त कळतं नाही
दिसं बदलले का पिस ....
पण दुनिया मातर पहिल्यापेक्षा
आता लईच बदलली हाई
माय म्हणते दुनिया बदलली
ते काही खोटं नाई .....॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*
*बोररांजणी, जि.जालना*

माझाबाप

***** *माझा बाप* *****

बापान कधी परदेश वार्या केल्यात नाईत ना कधी पंढरीच्या वार्या
पांढरीच्या मातीतच तो राबत आलाय आजवर
काळ्याशार मातीची पांढरीच त्याची पंढरी
अन् तिथला तो वारकरी .....

बैलाचा कासरा रुम्हण्याला गुतवुन जवा उभा राहता तो
तवा पाहुन त्याचा तो रंग
तोच वाटु लागतो मला पांडुरंग ...

बापाला कधी सातासमुद्रापार जाता नाही आलं
पण बापाच्या डोळ्यातला समुद्र पाहिला की वाटतं
एकदा घेऊन यावं त्या समुद्रांना इकडं अन् सांगावं
अरे बघा, तुमच्यापेक्षा विशाल तर माझ्या बापाचे डोळे आहेत ........

या त्यात तुम्हीही सामावुन जाल
त्यांच्यात नकळत मग एकरुप व्हाल
तुमच्यापेक्षाही खारट त्याची आसवे
जी जगाला नेहमीच वाटतात फसवे

बाप काही फाॅरेन रिटर्न नाही
ना ही फारच काही शिकलेला
पण आयुष्याला टर्न कसा द्यायचा ते माञ तो चांगलाच शिकलेला .......

म्हणुनच तर जगभर फिरणार्या बापांपेक्षा
जग फिरायला शिकवणारा
अन् वेळ आल्यावर फिरवायला शिकवणारा
माझा बापच मला श्रेष्ठ वाटतो ...........

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

प्रजासत्ताक

***** *प्रजासत्ताक* *****

तो अजुनी राबतोच आहे
शेताच्या बांधावर मरतोच आहे
घाम सिंचुन वाढवतो पिकांना
पण तरी भावासाठी झुरतोच आहे ॥

तो नावान तसा राजा आहेच
कधी बळीराजा कधी मतदार राजा
तरी का कुणास ठाऊक त्याच्या
सातबार्यावर कायमच कर्जाचा बोजा ॥

तो हल्ली भांबावलाच कधी
तर जर्रास घेतो झाडाला टांगुन
कारण त्याचं थोडच ऐकणार असतं
कुणी कितीही मोठ्यानं सांगुन ॥

तो गेल्यावर माञ घरापुढं रांगा लागतात
पांढरपेशे प्राणी येतात घेऊन मगरीचे अश्रु
आम्ही तुमच्या साथ आहोत सांगत
खर तर हिच पिलावळ असते खरी शञु ॥

पण वजनदार खादीपुढं बिचारी जनता
कायमच असते लाचार
म्हणुनच तर लुळीपांगळी होते लोकशाही
अन् फोफावतो भ्रष्टाचार ॥

इंग्रज देशातुन गेले हे फक्त
आम्हाला पुस्तकातच खरं वाटतं
लोकशाहीचं फसवं पुराण
ए. सी. कोचमध्येच बरं वाटतं ॥

शेताच्या बांधावर अजुनही स्वातंञ्याचा
होत नाही कधीच जश्न
कारण स्वातंञ्य कंच्च्या गाढवीणीचं नाव आहे ?
हा माझ्या बा ला पडतोच प्रश्न ॥

लालकिल्ल्यावरून बोलणारा माणुस
असो कुणीही त्याची भाषा तीच असते
दिवसभर देशप्रेमाची नशा
मग वास्तवाचीच झिंग असते ॥

कुणी सांगेल का,तिरंगा विकणार्या बेरंग हातांना
कशाला म्हणायचं प्रजासत्ताक ...?
कदाचित सत्तेसाठी प्रजेचा वापर करायचा ....
हे तर नसेल प्रजासत्ताक असणं .......?
कुणास ठाऊक मी अजुन शोधतोच आहे ..... अर्थ
कारण बापानच तर शिकवलय
द्यायला शेवटपर्यंत .... शर्थ ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*

गझल

*टाळू नकोस मजला......🌹🌹*

तु उगाच अशी आता, टाळू नकोस मजला
वेदनेत विरहाच्या हल्ली, जाळु नकोस मजला ॥

होईल कशी गीणती, सांग तुझी गं पुरी
उगाच गणितातुन तुझ्या, गाळू नकोस मजला ॥

घेऊन फोटो कुशीत, घालुन डोके उशीत
साठलेलो नयनात मी, ढाळू नकोस मजला ॥

कळते का सांग तुला, माझ्या कागदांची भाषा
नुसतेच काळजात तुझिया, पाळु नकोस मजला ॥

घे गंध फुलांचा , अन् हो बेधुंद तु आता
नुसतेच गजर्यात तुझ्या, माळु नकोस मजला ॥

असुनी नजरे समोर, टाळू नकोस मजला
गेल्यावरी दुर मग, डोळ्यातुन गाळू नकोस मजला ॥

तु उगाच अशी आता, टाळू नकोस मजला
वेदनेत विरहाच्या आता, जाळु नकोस मजला ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

गळफास

*गळफास बोलला फांदीला*

गळफास बोलला फांदीला
का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला
आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं
भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं
मग अाज कसा आला ह्यो ताफा
भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा
मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला
कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला
गळफास लागला विचारू फांदीला............
........................................

वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं
ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं
कुणीच काही बोलत नाही....
कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला
मलाही आता याचा भार तोलत नाही
कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय
पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय
........................................

सुकलेली, पानं झडलेली फांदी
मग गळा दाटुन लागली सांगायला
मला काही हे नवं नाही बाबा,
माझ्या खालचा जवा करपुन जातो माल
तवा असच होतं सारं, जे झालं काल
कोण देईल उत्तरे लाखो हुंदक्यांची
पुसलेल्या कुंकवांची कोण घेईल जबाबदारी
किड्यामुंग्यांसारखी माणसं मरायला लागली
यापरिस बरी असते महामारी ...............
........................................

तु काय विचारतोस ह्या फांदीला
चल दोघं मिळुन आता विचारु
एकदाचं नोटेवरल्या गांधीला
सांदीला पडलेला दोर
कुठवर असा लटकत राहणार
बापु तुमच्याच देशात तुमचीच लेकरं
कुठवर मरत राहणार...........
........................................

डोळ्यावरचे हात काढुन , बापु माकडांनाही हे बघु द्या
कानांनी किंकाळ्या ऎकुन , तोडांनी काही बोलु द्या
तुमची खादी घालणारे , बापु इथं साधी भाषा बोलतच नाही
अन् त्यांचे जड जड शब्द , आम्हाला काही तोलतच नाही
नाहीतर बापु या देशात माती राहिल पण शेती नाही
अन् राहिलीच शेती तरी शेतकरी नाही....

........................................


*कवि:- शशिकांत मा. बाबर*
*संपर्क :- ९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

कळकळ

*कळकळ....*

उरी अंधार पाळुन
दिस जाताया ढळुन ।
मनं बसते गळुन
जनं बघते छळुन ....॥

होतो निखळ निर्मळ
कसा दाटला चिखल ।
विचारांची दलं दलं
मनी तीच मग सलं ॥

होतो झरा खळंखळं
होती जरा पळंपळं..।
आता सल भळंभळं
नाही कुणा कळंकळं ...॥

जावे बदलुनं सारे
हाती घेऊयातं वारे ।
आपल्यासाठी आपणच
आता देऊयातं नारे ...॥

नको इरषा कशाची
नको कशाची आसक्ती ।
सदा हातुन माझ्या रे
व्हावी माणुसकीची भक्ती ॥

यावा दिस लवकर
दुर व्हावी मरगळं ...।
उजेडात रातरीच्या
माझी मलाच कळकळं ..॥

*✍शशि.....*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

एक कविता

*-------- एक कविता ---------*

करावी म्हणतो एक कविता
तुझ्या सुंदर दिसण्यावर
तुझ्या निखळ हसण्यावर
कधी तुझ्या नसण्यावर
कधी तुझ्या असण्यावर..॥

करावी म्हणतो एक कविता
कधी तुझ्या चालीवर
कधी कानातल्या बालीवर
कधी गुलाबी गालावर
कधी तुझ्या तालावर ...॥

करावी म्हणतो एक कविता
तुझ्या लाल ओठावर
हाती दिलेल्या बोटावर
तुझ्या गोड लाजण्यावर
विषय आपला गाजण्यावर ॥

करावी म्हणतो एक कविता
कधी तुझ्या रुसण्यावर
काहीच न बोलण्यावर
तरी माझ्या फसण्यावर ...॥

बघेल मला जमलं तर
सौंदर्य शब्दात मांडायला
उगाच तुझ्याशी भांडायला
बनवेल एक कविता
अन् होईल सारा रिता .......
................कागदावर ...॥

*✍शशि.........*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

साविञीबाई

*सविञीबाई.......*

खरच तुम्हीच विद्येच्या देवता
कारण समाजाचा एवढा विरोध
सारा अन्याय, अत्याचार
अगदी शेणदेखिल झेललत तुम्ही
आणी हे सारं कुणासाठी
फक्त आणि फक्त समाजासाठी
मुलींच्या शिक्षणासाठी
मग यापेक्षा मोठं कुठलं देवत्व असेल
म्हणुन तुम्हीच आहात
विद्येची खरी देवता.....

पण आम्ही अजुनी पुजतो
तीच सरस्वती
हाती वीणा घेणारी देखणी
आम्ही विसरतो तेंव्हा तुम्हाला
तुम्ही झेललेली शेण माती
अन्  हाती देलेली लेखणी
त्याच जिवावर झालेत जे शिक्षित
तेच गाऊ लागतात गुणगान सरस्वतीच
तेंव्हा साविञी राहतेच उपेक्षित ...........

म्हणुनच माझ्या लेखणीन
फक्त एवढच कराव....
गुण साविञीचं गावं.....
भलेही कुणी म्हणेल
नीतिभ्रष्ट नाहितर नास्तिक
मला माञ प्यारी मातीतली बाराखडी
नाही दारावरले स्वस्तिक ...........

म्हणुन साविञीबाई,
प्रत्येक बाईत
माझ्या आईत
सार्या ताईत
सार्याच्यामध्ये असलेल्या
एका साविञीला
माझा शतशः नमन....
भलेही काहीही म्हणो जन ..........

*✍शशि...........*
*📞९१३०६२०८४४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

कॅलेंडर

*कॅलेंडर..........*

पाहिलं तर बारा पान फक्त
सरली आजची एकदाची
सोळाव सालं होतं हे
धोक्याचे मोक्याचं सारच
भरभरुन जगलोय ही बारा पानं
उद्या भिताडावर लटकेल
नवं कॅलेंडर
नव्या पानांबरोबर नव्या संकल्पांसह
नव्या सालाच स्वागत करायलाच हवं.....

तसं ह्या बारा पानात
बरेच काहि दडुन राहिलय
खुप काही नवीन शिकलो
खुप काही नवं जगलो
जे टोचलं जे बोचलं
ते तसच सोडुन
जुने मार्ग मोडुन
नव्या वाटेवर चालायचय
दिल्या घेतल्या वचनांना जागायचय ........

ही बारा पानं म्हणजे आयुष्याच्या डायरीतल एक पानच...
ती सारी कोरी पान केलीत काळी ....
आयुष्यातल्या घटनांनी
कुठे मनाजोगतं सारं
कुठे उगाच काहितरी
पण भरवलय आयुष्याच पान.....
आता नवं पान उद्या उगवत्या सुर्याबरोबर हातात येईल
ते भरायचय
अलगद धरायचय
सोळाव सारायचय
सतरातल्या खतर्यांसाठी
पुरुन उरायचय ......
या नव्या कॅलेंडर बरोबर
नवे संकल्प नव्या आशा
अन् शोधायच्यात नव्या दिशा..........
त्या दिशेचा शोध घेण्यासाठी.......
सर्वांनाच शुभेच्छा....🌹🌹

*नववर्षाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा........💐💐*
*या वर्षातला प्रत्येक क्षण भरभरुन जगता यावा... हिच ईश्वर चरणी प्रार्थना*

*✍शशि........*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*