Saturday, March 25, 2017

प्रजासत्ताक

***** *प्रजासत्ताक* *****

तो अजुनी राबतोच आहे
शेताच्या बांधावर मरतोच आहे
घाम सिंचुन वाढवतो पिकांना
पण तरी भावासाठी झुरतोच आहे ॥

तो नावान तसा राजा आहेच
कधी बळीराजा कधी मतदार राजा
तरी का कुणास ठाऊक त्याच्या
सातबार्यावर कायमच कर्जाचा बोजा ॥

तो हल्ली भांबावलाच कधी
तर जर्रास घेतो झाडाला टांगुन
कारण त्याचं थोडच ऐकणार असतं
कुणी कितीही मोठ्यानं सांगुन ॥

तो गेल्यावर माञ घरापुढं रांगा लागतात
पांढरपेशे प्राणी येतात घेऊन मगरीचे अश्रु
आम्ही तुमच्या साथ आहोत सांगत
खर तर हिच पिलावळ असते खरी शञु ॥

पण वजनदार खादीपुढं बिचारी जनता
कायमच असते लाचार
म्हणुनच तर लुळीपांगळी होते लोकशाही
अन् फोफावतो भ्रष्टाचार ॥

इंग्रज देशातुन गेले हे फक्त
आम्हाला पुस्तकातच खरं वाटतं
लोकशाहीचं फसवं पुराण
ए. सी. कोचमध्येच बरं वाटतं ॥

शेताच्या बांधावर अजुनही स्वातंञ्याचा
होत नाही कधीच जश्न
कारण स्वातंञ्य कंच्च्या गाढवीणीचं नाव आहे ?
हा माझ्या बा ला पडतोच प्रश्न ॥

लालकिल्ल्यावरून बोलणारा माणुस
असो कुणीही त्याची भाषा तीच असते
दिवसभर देशप्रेमाची नशा
मग वास्तवाचीच झिंग असते ॥

कुणी सांगेल का,तिरंगा विकणार्या बेरंग हातांना
कशाला म्हणायचं प्रजासत्ताक ...?
कदाचित सत्तेसाठी प्रजेचा वापर करायचा ....
हे तर नसेल प्रजासत्ताक असणं .......?
कुणास ठाऊक मी अजुन शोधतोच आहे ..... अर्थ
कारण बापानच तर शिकवलय
द्यायला शेवटपर्यंत .... शर्थ ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*

No comments: