Tuesday, March 28, 2023

प्रिय अरविंद काका,


प्रिय अरविंद काका,

तसं तुमच्याशी प्रत्यक्ष बोलावं असं खुपदा वाटलं, गोष्ट छोटी डोंगराएवढी बघितल्यावर तर खुप जास्त वाटलं...ही डोंगराएवढी गोष्ट लिहिणारा माणुसही पर्वतासारखा उंचच असला पाहिजे, यावर माझा विश्वास बसला होता...तेंव्हाच वाटलेले की अशा माणसाला भेटलं पाहिजे ...पण काही जमलेच नाही...अभ्यास, परिक्षा हे सगळं सोडुन एखाद्या लेखकाला भेटतो म्हटलं तर कसं पटलं असतं ना घरच्यांना ?..नाही तसं त्यांनी मला बरच फिरु दिलंय...वक्तृत्वस्पर्धेनिमित्त फिरलोय बराच शाळा/काॅलेजमध्ये असताना...पण आपली भेट राहिलीच...तसा मीही मराठवाड्यातलाच, जालन्याचा... बोररांजणी या खेडेगावातला.... आता जरा शाळा, काॅलेज सुटलय....जवळपास सगळेच करतात तशी इंजिनिरिंग करुन मी परत एमपीएससी केली... मागच्यावर्षीच नायब तहसीलदार झालो अन् यंदा नुकताच क्लास १ अधिकारी झालोय... तुम्हाला लवकरच भेटेलही... पण हे सगळं असु द्या...मी कुठे माझी कर्मकहाणी सांगत बसु तुम्हाला.

आजच्या ह्या माझ्या पञास कारण की, तुमचे 'पञास कारण की' हे पुस्तक आजच वाचुन झाले...पुस्तक तसे जुने पण पुस्तक प्रकाशित झाले तेंव्हा आम्ही इंजिनियरिंगच्या काॅलेजात पुस्तकांपेक्षा चेहरेच जास्त वाचायचो....मग पुस्तकं जरा राहिलीच वाचायची...पण ह्या चेहरेवाचण्याने एक बरं झालं..चेहऱ्यावरच्या कविता वाचतानाच पुस्तकातल्या कवितेचा नादही तेंव्हाच लागला .... पण हे पुस्तक वाचले नसले तरी आधीच 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात सागर कारंडे यांच्याकडुन ऐकले होतेच...ते ऐकताना कधी अलगद चेहऱ्यावर हसु उमटायचे तरी कधी डोळ्यात आसु दाटायचे...भारी वाटायचे खुप...किती मार्मिकपणे सगळं मांडलय वगैरे हे जरी खुप कळत नसलं तरी ऐकलेले कानातुन थेट काळजापर्यंत पोहचायचे हे खरे... तुम्ही म्हणता तसे हल्ली व्हाॅटस अप, फेसबुक अन् इन्स्टाग्रामच्या जमान्यात पञ कोण पाठवतं...पण हे पुस्तक वाचुन मला वाटलं की तुम्हालाच पञ पाठवुया...तसं आता हे पञही पोस्टातुन नाहीच पोहचायचं तुमच्यापर्यंत...पण...लिहुन बघितलं..कशातुन आलं यापेक्षा काय आलं हेच बघा तुम्हीही...तसं आमच्या पिढीला पञाची सवयच नाही...वाटले तेंव्हा वाटले ते मॅसेज करुन सांगायचे...अगदी क्षणात भेट व्हावी, अशा अत्याधुनिक युगात आम्ही वावरतोय...कम्प्यूटर वगैरे ठिक आहे पण आता ए आई (आईला आवाज नाही दिला मी...ए आई म्हणजे आर्टिफिशीयल इंटेलिजन्स..)कृञिम बुद्धिमत्तेचा जमाना आलाय...त्यामुळे पञ वगैरे हे कालबाह्यच संकल्पना आमच्यासाठी...जमाना कृञिम बुद्धिमत्तेचा अन् पञ लिहायला लागते नैसर्गिक बुद्धीमत्ता मग आपोआपच पञव्यवहार मागेच पडणार ना ? असो.

तर काका, तुम्ही पुस्तकाच्या प्रस्तावनेत पञाचे महत्व अन् जगातील प्रसिद्ध पञव्यवहाराची काही उदाहरणं देखिल दिलीत. मी काॅलेजात असताना मला बाकीचे फार कळत नव्हते पण प्रेमाचे सञ सुरु करण्यासाठी पञ हेच उत्तम माध्यम आहे असं मलाबी वाटायचं...पण काय वाटतय यापेक्षा कुणाला वाटतय हे महत्वाचं ना...नाहितर काय?...काय बोलतय यापेक्षा कोण बोलतय याला जास्त महत्व आहे ना आपल्याकडे...म्हणजे मोठ्या माणसांची साधी वाक्यही सुभाषितासम वाटतात अन् लहानग्यांनी (फक्त वयानेच लहान नाही बरका ...) कितीही तात्विक विधान केलंतरी त्याकडे कुणाचं लक्ष जातंच कुठं...हे असं तुमच्या आधीच्या पिढ्यांपासुन चालत आलय...अन् आमच्या नंतरच्या पिढ्यांपर्यंत चालतच राहिल वाटतय..तर तुम्ही ह्या पुस्तकात लिहिलेली पञ खरच जाम खतरनाक आवडली आपल्याला...महाराजांपासुन किशोरकुमार, नागराज अण्णा, दिपीकाताई, दादा कोंडके ह्या कलाकारांसह आठवलेसाहेब, सरदेसाई साहेब अशा राजकीय व्यक्ती, सोशिक स्ञिया, तरुण मिञ, गोंविदा, दहिहंडीआयोजक या व अशा इतर‌ बऱ्याच वेगवेगळ्या घटकांशी पञांतुन संवाद साधला आहे...संवादच काय कुठे कुठे मिश्किलपणे वादही घातलाय.. काही पञ तात्कालिक परिस्थितीशी निगडीत आहेत..पण बरीच पञे ही समकालिनच वाटतात...आजही ती पाठवली तरी वाचणाराला जुनी लिहिलेली आहेत असं वाटणार नाही मुळीच..अगदीच साधी सोपी अन् थेट मनाला स्पर्शुन जाणारी भाषा...प्रत्येक पञात‌ प्रेमाचा ओलावा..काळजी...माया...आपुलकी...सगळं काही सापडतं.... काही ठिकाणी उपहासातुन निर्माण झालेला विनोद आपोआप हसायला भाग पाडतो...पण नुसतं हसवणं अन् रडवणं एवढ्यासाठीच काही हे सगळं लिहीलं नाही तुम्ही, याचीही जाणिव झालीच वाचताना...काही ओळींवर रेंगाळलो…काही ओळी परत परत वाचल्या...काही ठिकाणी आत्मचिंतन करु लागलो..अन् काही ठिकाणी आपण ज्या व्यवस्थेचा भाग झालोय त्याव्यवस्थेकडुन आपण नक्कीच लोकांचं जगणं सुकर करु शकतो...अन् त्यासाठीच प्रशासकीय सेवेत आपण आलोय याची जाणिव अजुन घट्ट झाली....

काका, तुम्ही खुप वेगवेगळ्या विषयांना ह्या पुस्तकात हात घातलाय..सगळ्याच गोष्टिंचा इथे उल्लेख मी केला नाही.. विविध समस्या, विविध अडचणी यांच्यावर तुम्ही मार्मिकपणे बोट ठेवलय..एका पञात तुम्ही म्हटलात,"डास चावल्यानं मलेरिया होतो, पण म्हणुन डास मारत बसणं हा उपाय असतो का ? नाही. ज्या घाणीमुळे, ज्या डबक्यामुळे डास होतात, ती स्वच्छ केली पाहिजेत.त्याप्रमाणे आतातरी आपण मलेरिया घालवण्यासाठी डास मारण्यावरचे उपाय सोडुन डास पैदा करणारी डबकी घालवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे..तसे उपाय करण्याची जबाबदारी तुमची पुढची पिढी म्हणुन आता आम्हीच स्विकारली पाहिजे..ती आम्ही स्विकारतो.... तुम्ही निवांत रहा...लेखक आहात..दररोजच्या घडामोडी पाहुन निवांत राहणं तुम्हाला अवघड जाईल..पण बघा...प्रयत्न करा...आणि हो...आशिर्वाद द्या, डबकी साफ करण्यासाठी...!!


तुमचाच 

शशिकांत बाबर

(परि. नायब तहसीलदार)

Monday, March 27, 2023

चालत रहा...चालत रहा...


 

"कधी निराशा खिन्न दाटली

कधी भोवती रान पेटले

परि अचानक वळणावरती

निळेनिळे चांदणे भेटले "

मंगेश पाडगावकरांच्या ह्या ओळी आज वृत्तपञात वाचण्यात आल्या. माणुस म्हणुन जगाताना कायम फुलांचे बगीचेच वाट्याला येतील असे नाही, काट्यांचा मार्ग ही वाट्याला येईलच...कधी काटे अडवत कधी काटे तुडवत..पण जगण्याचा प्रवास थांबता कामा नये...आपण सगळेच ज्या परिस्थितीत आहोत, तिथे आपल्याला रोज कुठुन तरी नकारात्मकता येऊन धडकतेच...कधी तरी कुणी तरी अचानक विचारतो...मग काय ? कधी लागणार निकाल ? मग काय ? राज्यसेवा नाही निघाली का मागची ? अरे पी एस आय ला नव्हता का तु ? मग काय ? कधी सोडायचाय हा नाद ? मग काय यंदा तरी होईल का ? अरे पंचवार्षिक योजना झाली की, अजुन किती ? अरे तुझा तो रुम पार्टनर झाला वाटतं ? मग तु कसा काय राहिला गड्या ? असे एक ना अनेक प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तयारी दरम्यान जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी विचारलेच जातात... कळस म्हणजे हे सगळं विचारणाऱ्याला प परिक्षाचा देखील माहित नसतो..किंवा माहित असेलच तर त्यानेही काही फार दिवे लावलेले नसतात....तरी देखील असे प्रश्न ही नकारात्मकता आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असते...अशावेळी शांतपणे एकच विचार करा..मी माझे प्रामाणिक प्रयत्न करतोय का ? उत्तर जर हो असेल, तर कुणाचीच चिंता न करता आपला अभ्यास आणि आपण यातच गुंतुन रहा...मोबाईलचा वापर कमीत कमी करा...मोबाईलवर दाखवला जाणारा चकमकीत आयुष्याचा चेहरा हा ब्युटीपार्लरमधुन मेक अप करुन बाहेर पडणारा असतो...खरा चेहरा तोच असतो असं‌ नाही.... दिसणारा अन् असणारा यात फरक असतोच... त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात अगदी सोनेरी दिवस आहेत, अन् मीच इथे लोखंडासमान गंजत पडलोय असं वाटु देऊ नका....खरंतर गंजत पडुच नये, कारण गंजण्यापेक्षा झिजणे कधीही चांगले...प्रयत्न करणं म्हणजे झिजणे...प्रयत्न केल्यासारखे दाखवणे पण न करणे म्हणजे गंजणे...आपल्या भोवतीच्या ह्या सगळ्या गदारोळात दुर होऊन पुर्णतः तयारीत गुंतणे ...झिजणे...हाच...हाच एकमेव मार्ग असतो सगळ्या नकारात्मकतेला दुर सारण्याचा....सध्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त अभ्यास आहे..फक्त तेवढाच करा...मंगेश पाडगावकर म्हणतात तसे कधीतरी निराशा दाटेल...कधीतरी भोवतीचे रान पेटेल....फक्त आपण आपल्या आतली मशाल विजू न देता चालत राहिलो, तर येणाऱ्या वळणावरती निळेनिळे यशाचे चांदणे नक्कीच भेटेल...तोपर्यंत... त्या वळणापर्यंत फक्त चालत रहा...चालत रहा....एक सुंदर वळण तुमची वाट पहात आहे...!!


#असंच_काहितरी #MPSC
#Motivation_वगैरे_वगैरे

Sunday, March 26, 2023

Book Review : डियर तुकोबा (विनायक होगाडे)


"तुकोबांच्या भेटी । शेक्सपियर आला । " ही विंदा करंदीकरांची प्रसिद्ध कविता. तुका आकाशाएवढा म्हणतात ते काही उगीच नाही, याची प्रचिती तुकारामांबद्दल काहीही वाचले किंवा ऐकले की आपल्याला येतेच. विंदा करंदीकरांनी इंग्रजीतील महान कवि व नाटकार शेक्सपियर यास तुकोबांच्या भेटीला आपल्या कवितेत आणले होते. त्याच आधारावर तशाच प्रकारचा प्रयत्न आपल्या 'डियर तुकोबा' ह्या पुस्तकात करत महात्मा गांधी, गाडगे महाराज, साने गुरुजी, साॅक्रेटिस, बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, शाहु महाराज, गॅलिलिओ, कर्मवीर भाऊराव व दाभोळकर अशा वेगवेगळ्या प्राचिन ते आधुनिक प्रबोधनकारांना तुकोबांच्या भेटीला आपल्या कवितेत विनायक होगाडे यांनी आणले आहे. विनायक होगाडे हे स्वतः पञकार असल्याने आजच्या पञकारितेचे सारे रंगढंग त्यांना परिचित आहेतच, त्यामुळे याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागात त्यांनी तुकोबावरील 'मिडीया ट्रायल' दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबाने कर्मकांड अन् धर्माच्या नावाकर लोकांना वेडे बनवणाऱ्या संधिसाधुंवर कायमच घणाघात केला होता. त्यांचा हा विद्रोह त्यांचा शब्दांमधुन त्यांच्या कवितेतुन वाहत असायचा, अन् त्यातुनच धर्मपीठाने त्यांना दिलेली गाथा बुडवण्याची शिक्षा व त्यानंतर इंद्रायणीत बुडालेली गाथा लोकगंगेत लोकांच्या मुखातुन कशी तरली याचे अतिशय मार्मिक व लालित्यपुर्ण वर्णन या भागात केले आहे.दरम्यान हे सगळे प्रसंग मांडताना लेखकाने तुकोबांवरचे हे प्रसंग जणु आज, आत्ता आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत, अशा पद्धतीने‌ मांडले आहेत...सध्याच्या काळातील मिडीया, सोशलमिडिया सगळ्यांचीच भुमिका यात कशी राहिली असती, ह्याची आपल्या पुरेपुर कल्पना येते. मग यात एखादा आरोप कुणावर झाला की आरोपी हाच गुन्हेगार आहे अशा प्रकारे होणारे बातम्यांचे वार्तांकन असो किंवा एखाद्या गोष्टीचा सोयिस्कर अन्वयार्थ लावुन प्रेक्षकांसमोर आहे नाही ते चिञ उभे करण्याचे काम असो. सध्यपरिस्थितीत मिडियाचे (काही अपवाद वगळता)हे सगळे उद्योग आपणही बघतोच... अशावेळी लोकांना तुकोबा सांगतात,

"तुका म्हणे नको । आंधळा विश्वास ।
शोधुया सत्यास । विवेकाने ।।"

आणि हेच आपण लक्षात ठेवायला हवे.

दुष्काळानंतर गहाण खतं बुडवण्यापासुन गाथा बुडवण्यापर्यंतच्या प्रसंगाचे वर्णन ह्या भागात अगदी मार्मिकपणे आपल्याला वाचायला मिळते अन् नकळत तुकोबा आपल्या समोर उभे राहतात.शेवटच्या 'डियर तुकोबा' या भागात लेखकाने तुकोबाशी केलेला संवाद आहे...हा संवाद म्हणजे आपल्या आंतरिक कोलाहलाला उत्तर शोधण्याचा प्रयत्नच आहे. रोजच्या जगण्यात आपल्याला भेडसावणारी नकारात्मता कशी दुर सारावी हे असंख्य वादळांना झुंजणारे तुकोबा नावाचे वादळच आपल्याला सांगु शकते. यासाठीच लेखकाने तुकोबांशी संवाद साधुन सकारात्मक उर्जा मिळवली आहे. तीच उर्जा आपल्यालाही हे वाचुन नक्कीच मिळते. तुकोबा कायम आपला वर्तमान बनुनच राहतील अन् आपल्या जगण्याला दिशा देत राहतील, हा विश्वास वाटत राहतो. कदाचित याच साठी दरवर्षी येर-झाऱ्या घालत सामान्य वारकरी ग्यानबा-तुकाराम हे आत्मभानाचे सुञ गात पंढरीची वारी न चुकता करत असतो.या भागाच्या शेवटी लेखकाने म्हटल्याप्रमाणे,
"प्रवाही राहतो । उसळी मारतो ।
पुन्हा खळाळतो। तुकाराम ।।

सांगून उरतो । खलांना पुरतो ।
गाडून उगतो । तुकाराम ।।"

एकंदरीत तुकोबाचे मोठेपणच नाही तर आपले लहानपण कळण्यासाठी अवश्य वाचावे असे 'तुकारामायण', मिडिया ट्रायल आॅन तुकाराम' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन भागात विभागलेले विनायक होगाडे यांचे "डियर तुकोबा" पुस्तक..अवश्य वाचा...वाचल्यावर हे Dear तुकोबा आपल्या कायम Near च ठेवाल हे नक्की.



#असंच_काहितरी
#Book_Review

Friday, March 24, 2023

Book Review : अधिकतमाहून अधिकतर (महाञया रा)

 


"तुमच्या बाबतीत जे घडतं, तो म्हणजे अनुभव नव्हे. तुमच्या बाबतीत जे घडतं, त्याचं तुम्ही जे काही करता ; तो म्हणजे अनुभव"
~ आल्डस हक्स्ले

आपण काय होतो किंवा काय आहोत, ह्याचा आपण काय होऊ शकतो ह्याच्याशी सुतरामा संबंध नसतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण होऊ शकतो.

आयुष्यात दोनच पर्याय असतात : एकतर आयुष्याच्या प्रयोजनाला‌ प्राधान्य देऊन आपल्या आवडी निवडींना दुय्यम स्थान द्या किंवा आवडीनिवडींना प्राधान्य देऊन आयुष्याच्या प्रयोजनाला दुय्यम स्थान द्या. आपण ठरवायचय आपल्याला कुणीही व्हायचय की कुणीतरी विशेष.

आपण सगळेच आयुष्यात जे काही बनतो ते केवळ कुणीतरी आपल्याबद्दल आपल्यापेक्षाही जास्त विश्वास बाळगतं म्हणुन.

कारण कधी परिणामाशी तुलना करत नाही.. शिक्षक कधी आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाशी तुलना करत नाही.

चिकाटी धराल, तर प्रगती कराल.

"प्राधान्यांचा उभा क्रम लावणे थांबवा.मग करियर, मग कुटुंब, मग आरोग्य....वगैरे वगैरे... त्याबाबत क्षितिज समांतर दृष्टिकोन बाळगा. तुमचं करियर तुमच्या कुटुंबाइतकच महत्वाचं असतं... तुमच्या आरोग्याइतकंच तुमच्या आध्यात्मिक विकासाचं महत्व असतं..."

जगात चांगले लोकही असतात अन् यशस्वी लोकही असतात. पण थोर लोक ते जे यशस्वी झाल्यावरही चांगले राहता.

चांगलं नाव कमावुन वाईट आयुष्य जगण्यापेक्षा वाईट नाव कमावुन चांगलं आयुष्य जगा.

आपण वाचायला शिकतो... मग शिकायला वाचतो.

हि व अशी असंख्य आपलं जीवन बदलुन टाकणारी सुभाषितासम विधानं करणारं पुस्तक ... जीवन जगताना कुणीतरी बनायचं की कुणीतरी विशेष ? ह्याप्रश्नापासुन सुरवात करुन जगण्याच्या विविध टप्प्यावर कसे जगावे याचा मुलमंंञ विविध उदाहरणामधुन देत आपल्या जगण्याला दिशा देणारं पुस्तक.... म्हणजे महाञया रा यांचे "अधिकतमाहून अधिकतर" पुस्तक. अगदी छोटसं व आपल्याला पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंत खिळवुन ठेवणारं असं हे पुस्तक आहे. महाञया रा यांचे "न पाठवलेलं पञ" हे पुस्तक नुकतेच वाचुन पुर्ण झाले होते...ह्या पुस्तकातले कित्येक विचार‌ अगदी मनावर कोरले गेले.... त्याच पद्धतीचे व त्याच्याशी साधर्म्य असणारं दुसरं पुस्तक सुद्धा महाञया रा यांनी लिहिलेलं आहे, हे कळल्यानंतर ते वाचायलाच हवं असं वाटु लागलं आणि कदाचित आकर्षणाचा नियम लागु झाला असावा, मला ते पुस्तक मिळालं....मिळालं तसं दोन दिवसात वाचुन काढलं... खरंतर काढलं म्हणता येणार नाही..वाचुन आत रुतुन बसलं असं म्हणणं अधिक योग्य. वरची विधानं वाचल्यावर आपल्या सहज लक्षात येईल की प्रेरणेच असंख्य पाटच यात पानोपानी वाहतायत... आपण आपली ओंजळ भरायची अन् तहान भागवायची. पुस्तकात विविध विचार वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथेच्या माध्यमातुन गुंफले आहेत. प्रत्येक कथेचा नायक आहे 'अव्यक्त'. हा अव्यक्त प्रत्येक कथेमध्ये विविध भुमिकेत आपल्याला दिसतो, कधी वडील, कधी कंपनीचा सल्लागार, कधी शिक्षक, कधी मिञ, कधी अजुन काही...भुमिका वेगवेगळ्या पण विचार तेच.. नाव जरी अव्यक्त असलं तरी तो जे विचार व्यक्त करतो ते लाख मोलाचे अन् आपल्याला रोजच्या जगण्यात पडणाऱ्या कित्येक प्रश्नांचे उत्तर देणारे आहेत. जगताना कायम अधिकतमाहुन अधिकतर मिळवण्यासाठी धडपडत रहावे...फक्त हे धडपडणं नुसतं धावणं नसावं...मिळणारे यश साजरे करण्यासाठी थांबता सुद्धा यायला हवं...अन् असं यश साजर करत करत सुखाच्या मार्गाने जगत रहावं...कारण लेखक म्हणतो त्याप्रमाणे सुखाकडे जाण्याचा मार्ग नसतो..सुख हाच मार्ग असतो.. हा मार्ग सापडावा...जगण्याचा महोत्सव व्हावा असं वाटणाऱ्या प्रत्येकाने अवश्य वाचावं असं पुस्तक..अवश्य वाचा. तुमचं अधिकतमाहून अधिकतर चिंततो...!
---------------------------------------------------------------------
पुस्तकातले काही उतारे 👇








#असंच_काहितरी
#Book_Review

जिल्हा परिषद शाळेतील मुलांची भेट

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थुगाव निपाणी, पंचायत समिती नरखेड, नागपुर येथील मुलांनी आज वनामती संस्थेच्या माननीय संचालिका, श्रीमती मिताली शेठी यांच्याशी संवाद साधला. त्यांचा आतापर्यंतचा एकंदरीत प्रवास, प्रशासनातील त्यांचे काही अनुभव, त्यांच्या नवनवीन कल्पना याबद्दल मुलांनी जाणुन घेतले. तसेच मुलांनी त्यांच्या काही कल्पनांची देखील मॅडमसोबत चर्चा केली. अतिशय उत्कृष्ट अशी मुलांची बँक संकल्पना त्यांनी मॅडमला सांगितली. हा झाला आजच्या भेटीचा औपचारिक वृतान्त ... 

मी तुम्हाला जे सांगणार आहे ती औपचारिकता नाही.... तर मॅडम ह्या मुलांशी चर्चा करत होत्या..त्यांची चर्चा शेवटाकडेच आली होती, तेंव्हा आम्ही त्यात सामिल झालो. मॅडम ने त्यांचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच प्रकल्प अधिकारी, धारणी या पदांवरील अनुभव थोडक्यात सांगितला. ह्या ७/८ वीच्या मुलांचे प्रश्न अतिशय स्पष्ट आणि तितकेच आत्मविश्वासपुर्ण होते... नंतर आम्ही आमची ओळख मुलांना करुन दिली, त्यांनी त्यांची ओळख करुन दिली. ही मुलं इतकं छान बोलत होती, ऐकत होती की त्यांच्याबद्दल एक वेगळच कौतुक मनाला वाटत होतं... मॅडम ने राणी बेटी माहितीपटाची चिञफीत दाखवली. (चिञफित बघण्यासाठी लिंक :https://youtu.be/ptFXEqibDzw) धारणीसारख्या ठिकाणी काम करतानाही अगदी नाविन्यपुर्ण पद्धतीने, तेथील आदिवासी समुदायाला समजुन घेऊन, त्यांच्याशी आपुलकीची भावना जोपासत त्यांच्यासाठी मॅडमने कार्य केल्याचे ह्या व्हिडीओमधुन जाणवले. आदिवासींना आपण त्यांचे वाटत नाही कारण आपण आपल्या शहरी भाषेत बोलतो, त्यांना ती फार उमजत नाही अन् आपल्याला त्यांची भाषा समजत नाही...त्यामुळे त्यांच्या भाषेत मोडका तोडका का असेना थोडाफार तरी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता यावा, असं मॅडम सांगत होत्या. मुलांचा एकुण टापटिपपणा अन् त्यांचे शिक्षण कौशल्य हेही फार आकर्षुन घेणारी गोष्ट होती. आम्ही शाळेत असताना काहींना नीट मराठी येत नसायची, ही मुलं मराठी, इंग्रजी सोबतच परदेशी भाषेचेही धडे घेत आहेत..ही फारच अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे. चर्चेअंती एका मुलीने चक्क जपानी भाषेत तर दुसरीने चक्क जर्मन भाषेत आभार प्रदर्शन केले, तेंव्हा आपणही ह्यांच्याकडुन शिकलं पाहिजे... अभ्यास, परिक्षा यासोबतच अशा नवनवीन संकल्पना राबवण्यासोबतच बरंच काही ही मुलं शिकतायत... 

जिल्हा परिषद शाळा म्हणजे मोडकळीस आलेली शाळा, कधीतरी येणारे मास्तर, अन् कामापुरतं शिकुन कसंतरी करत आठवीपर्यंत पास व्हायचं असं ठरवणारे विद्यार्थी असं काहीसं चिञ सर्वसाधारण आपल्या कल्पनेत असु शकतं, पण ही शाळा, इथले मास्तर, अन् इथले विद्यार्थी सारेच अगदी अप्रतिम, सृजनशील अन् कल्पक.... साधारण प्रतिमेला छेद देणारी ही शाळा अन् हे विद्यार्थी हे उद्याच्या विकसीत भारताचे आश्वासक चिञ आहे. अशा असंख्य शाळा उभ्या राहोत... प्रत्येक जिल्हा परिषद शाळा अशाप्रकारे उभी राहिली तर उद्याचे सुजाण नागरिक घडवण्याची जबाबदारी सहजतेने पार पाडली जाऊ शकेल. प्रशासनात येण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकानेच हाच विचार करुन प्रशासनात यायला हवं की इथे येऊन काहीतरी फरक आपल्याला पाडता येईल. सर्वसामान्य म्हणुनच जगायचं असेल तर इथं येऊन फारसा उपयोग नाही.... इथे आपल्याला आपल्या पुरतं तरी सुंदर विश्व निर्माण करताच यायला हवं... जग बदलेल का माहित नाही...मी बदलेल, एवढाच विश्वास अन् हिच तळमळ आपल्यात कायम रहावी एवढीच अपेक्षा. आज भेटीनंतर ह्या लहानग्यांना पाहुन असं वाटलं की आपण लहानपणी जरा लहानच होतो, अन् मॅडमकडे पाहिल्यावर वाटलं आपण अजुनही लहानच आहोत.... कदाचित पुढेही लहानच राहु, पण लहान का असेना बदल घडावा एवढच... तसही सुर्य होण्याचा अट्टाहास नाहीच, स्वयंप्रकाशी काजवा होता यावं एवढच..! करण्यासारखं बरच काही असतं, शिकण्यासारखं बरच काही असतं....करत राहुयात, शिकत राहुयात !!

Tuesday, March 21, 2023

Book Review : ज्वाला आणि फुले (बाबा आमटे)




"लोकविलक्षण आत्म्याचे उर्जास्वल शब्दविलसित", अशा शब्दांत जेष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी ज्याचे यथार्थ वर्णन केले आहे असे रमेश गुप्ता यांनी शब्दांकन केलेले बाबा आमटे यांचे सखोल चिंतन म्हणजे त्यांचा ज्वाला आणि फुले हा कवितासंग्रह... खरतर हा कवितासंग्रह कमी बाबांचे विचारधन जास्त आहे...या संग्रहात फक्त कल्पनेचे इमले नाहीत, शाब्दिक अलंकाराची मिनारे नाहीत...इथे आहे कर्मयज्ञातुन निघणाऱ्या प्रखर ज्वाला अन् विस्तववादी वास्तवाची फुले.…ह्यातील कविता म्हणजे बाबांचे मुक्त चिंतन आहे.... बाबांचे आयुष्य हेच एक दिर्घ कविता होती....ज्यांच्या आयुष्यात फार काहीच उरले नाही, अशांच्या आयुष्यात काव्य पेरुन त्यावर उमेदीची फुले फुलवण्याचं काम बाबांनी आपल्या आयुष्यात केले, त्यामुळेच यदुनाथ थत्ते याच संग्रहाच्या परिशिष्ठात म्हणतात त्याप्रमाणे बाबांचा अन्य क्षेञातला पराक्रम इतका नेञदिपक आहे की त्यांची गणना कवि आणि गीतकार यांच्या मालिकेत करायचे आपण विसरुनच जातो. बाबा खरे कर्मयोगी.. आपल्या ह्या इतर कामातुन जो काही वेळ मिळेल त्यावेळेतही ते कधी रिकामे बसलेच नसतील, असे वाटते (नसता एवढे वैश्विक चिंतन करायला वेळच मिळाला असता का ?)

ह्या संग्रहाची प्रस्तावनाच इतकी सविस्तर व बाबांच्या कवितेला ज्ञान देणारी आहे की त्यावर अजुन फार काही इतर कुणी काही सांगावे असे उरतच नाही.ह्या संग्रहाचे‌ माझ्यादृष्टिने आपल्यासाठी महत्व हे काव्यापेक्षा वैचारिक पातळीवर जास्त आहे... संग्रहात असणाऱ्या एकुण 23 कवितांमध्ये बाबांचे इतके प्रचंड मोठे विचारधन पेरले गेलेले आहे की वाचणारा सहज अंतर्मुख होऊन तेथेच विचारमग्न होऊन जातो. अगदी साधे साधे वाक्य पण मनाला स्पर्शुन जाणारे तत्वज्ञान इथे आपल्याला सापडते. बाबांनी हा संग्रह अर्पण केलाय तो 'अश्रुंनीच दारे ठोठवणाऱ्या दारिद्रयास'... दारिद्रय हा खरा शाप आहे, गरीबीसारखा शञु नाही हे आपण ऐकलेले किंवा वाचलेले‌ असेलही, पण ह्या दारिद्रयाचा अजुनही आपल्याला आपल्या देशातुन नायनाट करता आलेला नाही, ही वास्तविकता अन् दाहकता ह्याची जाणिव संग्रहाच्या सुरवातीलाच होते. 'पंखांना क्षितिज नसते', या कवितेत ते म्हणतात, "पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारे आकाश असते"...जीवनाचा नक्की अर्थ आहे, आपले ध्येय काय ? याचा विचार मांडताना "जिथे आत्म्याचेही अन्न पिकेल" या कवितेत कल्पनेने कितीही भरारी मारली तरी वास्तवाचे भान सुटता कामा नये हे सांगताना बाबा म्हणतात, "मला भान आहे की - शरीर अखेर धरिञीच्या गुरुत्वाने कोसळते... मस्तके उंचावलेली असण्यासाठी पोट भरलेले असावे लागते आणि आकाशस्थ गुपिते सोडवण्याआधी भाकरीचा यक्षप्रश्न सुटलेला असावा लागतो !" किती ही वास्तविकता... आजही आपल्याकडे कित्येकांच्या भाकरीचा यक्षप्रश्न सुटलेला नाही, अशांसाठी कितीही मोठ्या मंगळमोहिमा अन् चांद्रमोहिमा केल्यातरी त्या मोहिमा म्हणजे फक्त आकाशस्थ गुपिते सोडवण्याचा अट्टाहास...त्यांना हा अट्टाहास नको तर पोटाला पोटभर घास हवा असतो.... हळुहळु यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत असले तरी प्रश्न पुर्णपणे काही मिटलेला नाही, याच जाणही आपल्या सर्वांनाच आहे..याच कवितेतल्या पुढच्या ओळी ह्या अजुन प्रेरणादायक आहेत. ते म्हणतात,
"बुजलेल्या व्रणांचे तोंड उसवत मला आता बसायचे नाही
आणि कणाकणात स्वप्ने पेरुन राञही झिंगवायची नाही
ह्रदयावरच्या जुन्या जखमा स्मृतींच्या गिधाडांना
खाऊ देण्यात काय अर्थ आहे ?
वर्तमानात जगले पाहिजे
जीवित ही गतकालाची बाब आहे
पण जीवन हा वर्तमानाचा विलास आहे
आणि मला माहित आहे की -
व्यथेच्या पेल्यातून सत्याचे घोट घेताना धीट ओठही कापतात !
पण आता प्रेममय जीवन हवे असेल
तर जीवनाची प्रीती टाकुन दिली पाहिजे..."

वर्तमानात जगले पाहिजे - जगण्याचे किती मोठे तत्वज्ञान ह्या तीन शब्दात बाबा सहज बोलुन जातात...खरच जमते आपल्याला कायम वर्तमानात जगणे..भुतकाळाचा  पश्चाताप अन् भविष्याची चिंता ह्यात कितीदा आपण आपला वर्तमान वाया घालवतो हे लक्षात आले की कळते वाटते तितके सोपे नसतेच वर्तमानात जगणे...अन् याही पुढे जाऊन जीवनाची प्रीती टाकुन देणे हे तर अजुन महाकठीण काम...कसे जमायचे आपल्याला...चला प्रयत्न करुयात..किमान काही अंशी तरी बदल करायला हवा, असे हे वाचत असताना आपोआप वाटत राहते...."गर्भवतीचा मृत्यु" ही एक अशीच परखड कविता यात आहे... आयुष्याकडुन आपल्याला कायम उपेक्षाच हाती लागते..किती ञास सहन करायचा आपण ? असे बऱ्याचदा वाटते आपल्याला...अशावेळी ह्या कवितेतल्या बाबांच्या ओळी नक्कीच आपल्याला आधार देतात..ते म्हणतात,
"यातनाहिनांना स्वप्ने नसतात
आणि जो थोडे सहन करतो
तो फार थोडे करु शकतो
जो खुप सहन करील
त्याला पुष्कळ काही करुन दाखविता येईल !"

त्यामुळे सहनशिलता हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे, हे सतत लक्षात ठेवायला हवे...उत्तरवाहिनी, एकलव्य, या सीमांना मरण नाही, वसुंधरेचा पुञ, माझे कलियुग, क्रांतीची पावले, सांगड्यांचे शहर ही ह्यातील अजुन काही कवितांची नावं... प्रत्येक कवितेला तत्वज्ञानाची बैठक आहे, वास्तवाचा आधार आहे, जीवनाचे रान पेटवणारा प्रचंड अग्नी ह्यातल्या शब्दांशब्दांत बारुदाप्रमाणे भरला आहे... जगणे म्हणजे धडपडणे आलेच, जगणे म्हणजे सततचा प्रवास...ह्या प्रवासात कुठल्याशा मुक्कामालाच आपले अंतिम ठिकाण समजुन थांबणारे बघितल्यावर आत्मतुष्टी म्हणजे आत्महत्येची गोळी असा संदेश बाबा देतात.."एक खिंड मी लढवीन" या कवितेत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याचे अगदी सविस्तर वर्णन करताना एकेठिकाणी ते म्हणतात, "वानप्रस्थप्रवृत्ती म्हणजे पोटासाठी इच्छेच्या विरुद्ध ज्याला जगावे लागले..त्याला स्वतःच्या इच्छेने जगण्याची संधी !" आम्हाला हे मिळाले नाही, आमच्या काळात हे नव्हते, आम्ही असे नव्हतो असे म्हणारी वार्धक्याने भांबावलेली माणसं असतात आपल्या आजुबाजुला...पण अशांसाठी बाबा म्हणतात, अशा जेष्ठांनी फक्त जेष्ठच नाही तर श्रेष्ठही ठरावे अन् त्यांनी तरुण पिढीला सांगावे की तुम्ही खुशाल नवे किल्ले सर करण्यासाठी पुढे व्हा ! मी तुमच्यासाठी ही एक खिंड लढवीन ! "मी जवाहरलाल " या कवितेत पंडीत नेहरु शब्दातुन आपली विवंचना मांडताना उभे केले आहेत. "जय हे सामान्य मानव महान" यात लालबहादुर शास्ञी यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचे यथोचित वर्णनच जणु केले आहे. "गांधी-एक युगमुद्रा" या पुढच्या कवितेत गांधी एक युगाचा चेहरा आहे असे वर्णन करुन गांधीजींच्या आयुष्याच्या विविध पैलुंना उलगडण्याचे काम केले आहे. नानाविध पैलुंमधुन गांधी आपल्यासमोर मांडल्यानंतरही गांधी इतक्यात समजणे शक्य नाही ह्याची कबुलीही देतात. बाबा या कवितेचा शेवट करताना अगदी समर्पकपणे म्हणतात, "गांधी माहात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही. आणि उद्याच्या पिढ्यांना त्याची ओळख पटण्यासाठी क्वचित काॅम्प्युटर लागेल ! पण काळाच्या भाळावर उमटलेली हि तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसुन काढता येणार नाही !" सद्यपरिस्थिती बघता ह्या वाक्याला विशेष अर्थ आहे, हे लक्षात येईल..गांधी पुसुन टाकण्याचा प्रयत्न कुणीही कितीही केला तरी ते शक्य नाही हेच खरे. या संग्रहातील शेवटच्या "मी अजुन जहाज सोडलेले नाही" कवितेत बाबांचा प्रचंड आशावाद, लढण्याची मानसिकता, हिम्मत, परिस्थितीवर आरुढ होण्याचे साहस ह्या सगळ्यांची प्रचिती येते. 

या संग्रहाच्या शेवटी दिलेल्या परिशिष्ठात बाबांची चार गीते (थांबला न सुर्य कधी, लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटल्या मशाली, गतीचे गीत आणि माणुस माझे नाव ही ती ४ गीते) व त्या गीतांचे यदुनाथ थत्ते यांनी केलेले विवेचन दिले आहे, ते देखील वाचनीय आहे. हे प्रत्येक गीत म्हणजे एक प्रेरणेचा दिपस्तंभ आहे...माणुस माझे नाव या गीतात उल्लेख केल्याप्रमाणे माणुस माझे नाव, माणुस माझे नाव...दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव....आपणही या गोष्टींचे भान ठेवुन जगायला शिकुयात...अन् त्यासाठीच दहा दिशांच्या रिंगणात पुढे धाव घेण्यासाठी पुस्तकांचा गाव अन् वाचनाची नाव हे आपल्याला नक्कीच मदत करतील... आपल्या असामान्य कर्तृत्वातुन आपल्या कार्याचा ठसा इतिहासाच्या पानावर उमटवणारा कर्मयोगी अन् त्या कर्मयोग्याच्या चिंतनातुन आलेले हे शब्दधन मिळवण्यासाठी, आयुष्यातल्या ज्वालांचीही फुले करण्याची ताकद अंगी बाणवण्यासाठी हा अप्रतिम असा काव्यसंग्रह नक्कीच वाचायला हवा..नुसते एकदा वाचुन समजेलच असे नाही, त्यासाठी परत परत वाचता यावा यासाठी आपल्या संग्रही देखील ठेवावा असा हा कवितासंग्रह सर्वांनीच अवश्य वाचावा. मी स्वतः पदवीला असताना एकदा हा संग्रह वाचला होता, तेंव्हा थोडा फार समजला.. आता परत प्रशिक्षणाच्या दरम्यान महाराष्ट्र दर्शनाच्या‌ निमित्ताने हेमलकसा येथे जाणे झाले होते, तेंव्हा तिथे मिळाला..विकत घेतला...परत वाचला...आता अजुन थोडा समजला....पुर्णतः समजला असे अजुनही वाटत नाही..बघु पुन्हा परत वाचणे होईलच, संग्रही आहेच..कपाटातही अन् काळजातही !


#असंच_काहितरी
#Book_Review

Sunday, March 19, 2023

MPSC चा Exit Plan : Plan B

 

परवा लेक्चर मध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, कुठलेही काम करताना, कुठल्याही प्रकरणात शिरतानाच तुमच्याकडे त्याचा Exit Plan असला पाहिजे, तरच‌ त्यामध्ये शिरा. महसुल विभागातल्या महसुली प्रकरणांबद्दल चर्चा चालु असतानाचा हा प्रसंग. हे ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात आले की किती साधे आणि सोपे गणित वाटते हे, की एखाद्या गोष्टीत शिरतानाच त्यातुन बाहेर कसे निघायचे ते ठरलेले असले पाहिजे. तशी उपाययोजना आधीच तयार पाहिजे, पण हे वाटते तितके खरच सोपे आहे का ? आपण स्पर्धापरिक्षेचा अभ्यास सुरु करतानाच ह्यातुन बाहेर पडण्याची आपली योजना तयार असते का ? की पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढतोच असा आत्मविश्वास हेच आपले भांडवल असते ? मला वाटते बऱ्यापैकी लोकं इकडे येताना खुप आत्मविश्वासाने भरलेले असतात, परंतु मान्य करा किंवा नका करु, हे क्षेञ प्रचंड अनिश्चिततेचे आहे. (मी स्वतःला पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकलो, पण असे प्रत्येकालाच जमेल किंवा जमलेच पाहिजे असे नाही) इथे तुमचे काय होईल, हे तुम्हाला झाल्याशिवाय सांगताच येत नाही. मी खुप मेहनत घेतो, मी हुशार आहे, मी अगोदर पासुन मेरीटचा विद्यार्थी आहे, ह्या सगळ्या समजुतीमधुन बाहेर येऊन वास्तववादी विचार केल्यास मला वाटते स्पर्धापरिक्षेचा विचार करतानाच आपला Exit Plan डोक्यात असावा. तुम्ही अभ्यास सोडुन ते करा, तुमच्याच्याने परिक्षा पास होणार नाही, असं माझं मुळीच मत नाही...पण...खरा पण इथेच आहे...तुम्ही होणारच हा विश्वास जितका गरजेचा, तितकीच नाही झाले तर काय ? हि भिती देखील महत्वाची. विशेषतः नव्याने जे इकडे येत आहेत, त्यांनी तर आपला Exit Plan तयार करुनच इकडे या. एकदा इकडे आले की मग काही वर्ष साधारणतः २-३ वर्ष (जर पहिल्या प्रयत्नात नाहीच झाले तर) त्या प्लानचा विचार न करता, दोर तुटलेल्या सैनिकासारखे परिक्षारुपी शञुवर तुटुन पडा..गड हातुन जाता कामा नये,यासाठी शर्थीने खिंड लढवा...विजय तुमचाच होईल यात शंका नाही...पण सर्व ताकद लावुनही शेवटी गड हातुन गेलाच तरी देखील आपलं स्वराज्य आबादीत राहावं यासाठी आपल्या Exit Plan वर काम सुरु करा...तोच गड आता तुमच्या स्वराज्याची राजधानी बनवा... विश्वास ठेवा...राजधानी कुठलीही असो..राजा आपणच असलं पाहिजे.. अन् आपणच असतो. फक्त जेंव्हा कुठलाही Plan B डोक्यात न‌ ठेवता आपण पुर्णपणे स्पर्धापरिक्षा/MPSC हाच एकमेव आयुष्य जगण्याचा पर्याय म्हणुन बघतो अन् ह्या प्रचंड आक्राळविक्राळ पसरलेल्या स्पर्धेच्या चक्रव्यूहात शिरतो तेंव्हा आपला अभिमन्यु होऊ शकतो...त्यासाठीच नुसतं शिरण्याचं धाडस असुन चालत नाही, निघण्याचा मार्गही हाताशी असावा लागतो....त्याशिवाय चक्रव्यूह भेदणं शक्य नाही...तुमचा अभिमन्यु कधीच होऊ नये, ह्याच शुभेच्छा !!


#असंच_काहितरी
#Plan_B


Thursday, March 16, 2023

Book Review : उन्हाच्या कटाविरुद्ध (नागराज मंजुळे)

 


माझ्या हाती 

नसती लेखणी

तर....

तर असती छिन्नी

सतार...बासरी

अथवा कुंचला

मी कशानेही

उपसतच राहिलो असतो

हा अतोनात कोलाहल मनातला


अशा शब्दात अभिव्यक्ति स्वातंञ्याचं महत्व विषद करणारा हा कवि...जो कवी म्हणुन तसा फारसा परिचित नाही...त्याच्या चिञपटांनीच जाळ अन् धुर संगटच करत सगळ्यांना सैराट करुन सोडलेलं आहे...उपेक्षित घटकांचा अनपेक्षित आवाज होण्याचं काम त्याच्या कलाकृती करत असतात...हाती कॅमेरा येण्याआधी त्याच्या हाती लेखणी आली अन् त्याने त्यातुन कविता प्रसवली..नेमकी कविता कशी सुचली ? ह्या प्रश्नावर तो कवितेतुनच उत्तर देतो अन् म्हणतो की, "उजाडताना मी माझ्यावर कवितेनं धरली सावली, कुणास ठाऊक कशी मनात अंकुरली कविता...पृथ्वीला कशी सुचली झाडे ?" थोडक्यात काय तर सर्वसाधारण सर्वच कविंना न सुटणारा गुंता म्हणजे कविता नक्की कशी सुचते ? हा गुंता न सोडवता उलटपक्षी पृथ्वीवर जशी अनपेक्षित आणि नैसर्गिकपणे झाडे  अंकुरतात, तशीच कविता नैसर्गिकपणे कविला सुचत असते असं सांगुन प्रचंड ताकदीने अन् जिवाच्या आकांताने लिहिणारा कवि आहे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता नागराज मंजुळे....नाव जरी मंजुळ असले तरी तो माञ नागराज नावाला  जास्त जागतो असंच त्याच्या कविता वाचताना वाटते...नागराज अण्णा हा प्रचंड मोठा माणुस झालाय, पण तो कुठे पोहचला यापेक्षा तो कुठुन आला हे बघितल्यावर ह्या माणसावर प्रेम हॊऊन जाते. 

नरेंद्र जाधव म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देऊन जातात.” हे विधान नागराज अण्णांचा हा कविता सग्रह वाचल्यावर अधिक खरे वाटायला लागते. कविता संग्रहाचे नावच अतिशय परखड व आकर्षक आहे...उगाच समाजाच्या ठरलेल्या साच्यात बसण्याच्या हट्टापायी जेंव्हा आपण सारंकाही गुमानं सहन करत असतो, तेंव्हा आपली घुसमट होते, आपण अस्वस्थ होतो, तरिही कुणीतरी काहीतरी म्हणेल, कुणीतरी नाव ठेवेल ह्या भितीतुन आपण सरधोपट मार्ग स्विकारतो...आपल्याला हवं तसं चालत नाही, हवं तसं बहरत नाही... वटवृक्ष होण्याची ताकद असतानाही कुंडीतलं रोप बनुन राहतो....अशा वेळी आपण कुठल्याही ढगांना न घाबरता आपण आपल्या विस्तिर्ण आकाशात झेपावलं पाहिजे....कितीही अवरोध झाला तरी आपण आपली दिशा अन् आपली गती सोडता कामा नये...असं तो सांगत राहतो...बाहेर कितीही असह्नय ऊन असलं तरी त्याच्या विरुद्ध त्वेषाने फुलायला हवं... हेच सांगण्यासाठी कवि 'उन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितेत म्हणतो,

या अनैतिक संस्कृतित 

नैतिक होण्याच्या हट्टापायी

का देते आहेस

एका आभाळणाऱ्या

मनस्वी विस्ताराला मूठमाती

का तू

उन्हाच्या कटाविरुद्ध

त्वेषानं फुलत नाहिस.....

असं त्वेषानं फुलणं जमलं तर खरच किती सोपं होईल जगणं अन् समृद्धही, पण नेमकं हेच तर जमत नाही आपल्याला...हिच खंत ह्या कवितेत मांडलेली आपल्याला दिसते. पण खरा कवि फक्त दशा मांडुन शांत बसत नाही, तर दिशा दाखवण्याचंही काम करत असतो..समाजातल्या कायम दुर्लक्षित राहिलेल्या, उपेक्षित घटकांकडे देखील नागराज अण्णांची कविता आपल्याला घेऊन जाते...कष्टकरी, पिचलेल्या, सामान्य माणसाच्या वेदनेची ही कविता आहे. प्रेम, प्रेमभंग, मैञी, झोपडपट्टीतले जगणे, निसर्ग, तृतीयपंथीयांचं अस्तित्व, अशा आपल्या आजुबाजुच्या असंख्य गोष्टीकडे कविचे किती बारकाने लक्ष आहे याची जाणिव या संग्रहातल्या कविता वाचताना होते. अगदी चार सहा ओळीत अगदी ताकदीने मांडली संकल्पना, मांडलेला विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतो... अगदी छोट्या छोट्या पण खोल अर्थ असलेल्या ह्या सर्व कविता आहेत.. कविता ही फक्त जगाचं रडगाणं गाण्यासाठीच करायची नसते तर ती जगण्याचा आधार असते...ती आपल्याला दुःखात कधी हसवते तर हसताना कधी अलगद आपल्या पापण्या ओलावते...कवितेची आपल्या आयुष्यातली भुमिका मांडताना कविने मिञ ही कविता रचली..ज्यात तो म्हणतो,

"आम्ही दोघे मिञ

एकमेकांचे जिवलग

एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे

पुढे त्याने आत्महत्या केली

आणि मी कविता लिहीली"

थोडक्यात काय तर कविता किती मोठी भुमिका बजावते हेच जणु यात नागराज अण्णांनी मांडलेले आहे. अशा प्रकारच्या जवळपास पन्नासहुन अधिक कविता अगदी छोट्याशा हातात मावेल अशा ह्या संग्रहात दिलेल्या आहेत. प्रत्येक कविता वाचल्याक्षणीच लक्षात राहावी इतकी छोटी पण प्रभावी. दिग्दर्शक म्हणुन प्रसिद्धेच्या शिखरावर पोहचलेले नागराज अण्णा साहित्यातही कवितेचा अप्रतिम नमुना देऊन जातात...त्यामुळे अण्णांचा चिञपट जितका प्रेक्षणीय तितकीच त्यांची कविता वाचनीय आहे.. नागराज मंजुळे यांची 'तुझ्या येण्याअगोदर एक पञ' ही ह्याच संग्रहातील कविता त्यांच्या एका मुलाखतीत टिव्हीवर खुप वर्षाआधी ऐकली होती...तेंव्हाच त्यांच्या 'ऊन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या कवितासंग्रहाबद्दल ऐकले होते...अन् त्यानंतर हा संग्रह वाचायला मिळावा यासाठी प्रयत्न केला होता..बऱ्याच वर्षानंतर हि इच्छा‌ पुर्ण झाली अन् अपेक्षेपेक्षाही अप्रतिम असा ठेवाच जणु हाती लागला.सर्वांनीच आवर्जुन वाचावा अन् संग्रही ठेवावा‌ असा हा कवितासंग्रह...अवश्य वाचाच.


#असंच_काहितरी #Book_Review

Wednesday, March 15, 2023

Book review : न पाठवलेलं पञ (महाञया रा)

 


पुस्तकातले बरेच पॅसेज मोबाईल वर कुठे कुठे कुठे वाचणात आले होते अन् पुस्तकाबद्दलची कुतुहलता वाढत गेली...पुस्तक एकदा वाचायलाच पाहिजे असं वाटत होतं...पण विकत घेण्याचा काही योग आला नाही..मग अचानक एकेदिवशी एका नातेवाईकांकडे जाणं झालं अन् त्यांच्या घरातल्या लायब्ररीत ते पुस्तक दिसलं..दिसलं तसच हातात घेतलं अन् त्यांच्याकडुन वाचायला घेऊन आलो...मध्यंतरी दुसरी पुस्तकं वाचत होतो त्यामुळे हे जरा लांबणीवर पडलं पण काल परत हातात घेतलं अन् आज वाचुन झालं...छोटसं अगदी १८८ पानं असलेलं हे जगप्रसिद्ध पुस्तक...हे तेच पुस्तकं जे छोट्या छोट्या गोष्टिमधुन आयुष्यातल्या कित्येक प्रश्नांना सहज उत्तर देतं...यश मोठ्या गोष्टीत असतं, समाधान छोट्या गोष्टीत असतं..ध्यान शून्यात असतं..ईश्वर सर्व गोष्टीत असतो..हेच जीवन आहे...असा संदेश देणारं हे तेच पुस्तक... प्रत्येक पानात ढासुन भरलेला मोलाचा संदेश अन् जगण्याचं तत्वज्ञान...हे तेच पञ जे पाठवलेलं नाही कधीच, कोणालाच, तरीही सगळ्या जगात पोहचलय....होय मी त्याच जगप्रसिद्ध "न पाठवलेलं पञ" (अर्थात मुळ इंग्रजी पुस्तक : Unposted Letter - महाञया रा) या पुस्तकाबद्दल बोलतोय....

मिञांनो, न पाठवलेलं पञ आज न पाठवता कित्येकांच्या मनात पोहचलय...नुसतं पोहचलं नाही तर मनात घर करुन कायमचं स्थिर स्थावर झालय...काही पुस्तकं फक्त चाळायची असतात....काही पुस्तकं एकदा तरी वाचायची असतात...काही पुस्तकं वारंवार वाचत राहायची असतात...तर काही पुस्तक अगदी रोज उशाला घेऊन बसावं अन् रोज वाचावं वाटावं अशी असतात .... मला वाटतं, हे पुस्तक ह्या शेवटच्या गटातलं ठरेल..हे पुस्तक एकदा दोनदा वाचुन हातावेगळं करण्यासारखं नाहीये..हे कायम आपल्या सोबत ठेवण्याचं अन् जिथे कुठे आपण अडलो .. जिथे एखादा प्रश्न पडला .. तिथे वाट दाखवण्यासाठी, तो प्रश्न सोडवण्यासाठी कामी आणण्याचं शस्ञ आहे हे पुस्तक...

आज आपल्याला भेटलेला एक दिवस हा आपल्याला मिळालेला उपहार आहे त्याचा सदुपयोग करायलाच हवा असं सांगण्यापासुन ते परिवर्तनावर लक्ष ठेवलं तर त्यातुन संस्कृती बनते इथपर्यंत.…विविध मथळ्याखाली आयुष्याला दिशा देतील असे संदेश पानोपानी महाञया रा यांनी या पुस्तकात पेरले आहेत. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वस्तुपेक्षा आपण महत्वाचे आहोत हे सांगताना लेखक सांगतो की खरच भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना उमजलं आहे की प्रेम माणसांवर करायचं असतं अन् वस्तु वापरायच्या असतात, माणसांचा वापर आणि वस्तुंवर प्रेम नाही..आपल्या सभोवताली दिसणारी गर्दी अन् त्या गर्दीतले आपण कधीतरी चुकुन जेंव्हा माणसाचा वापर करु लागतो अन् वस्तुवर प्रेम करु लागतो तेंव्हा आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम हे एक वाक्य करतं..असेच असंख्य संदेश आपल्याला यात वाचायला मिळतील...मी हा, मी तो असे असंख्य लेबलं लावुन जगणाऱ्यांसाठी लेखक सांगतो की हि सगळी लेबलं काढुन टाका, या लेबलांशिवाय नुसते तुम्ही पुरेसे आहात, पुरेशापेक्षाही जास्त. साध्या साध्या गोष्टिंमधुन जगण्यासाठी आवश्यक असणारे कित्येक विचार पुष्प आपल्याला पुस्तकाच्या पानोपानी दिसतात...एकदा वाचुन बघा...हे पुष्प वेचुन बघा..बघा ह्या फुलांचा सुगंध आपल्याही आयुष्याला सुगंधित करुन टाकेल यात शंकाच नाही.

📌 पुस्तकातली मनाला भावलेली काही वाक्ये :

१) वस्तुस्थिती ही आहे की, 'आपण करत नाही'...ही नव्हे की, 'आपण करु शकत नाही'.
२) मुर्ख आणि शहाणा - दोघेही एकच गोष्ट करतात, पण वेगवेगळ्या वेळी. शहाणा ती लगेच करतो तर मुर्ख नंतर करतो. 'उद्या' जणु काही आजच असल्याप्रमाणे वागा.
३) जग कसं वागतं ह्याच्याशी आपला संबंध नाही. आपला अभिमान आपल्या नजरेतुन आपण योग्य वागण्याशी निगडीत आहे. तुमची कितीही कसोटी पाहिली जावो, तुम्ही कुठेही जा, काहीही करत असा..तुमच्या उदात्त स्वभावाचाच आविष्कार तुम्ही केला पाहिजे.
४) ब्रेकवाचुन आपला ब्रेकडाऊन होईल.
५) ज्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं, तिला तोंड द्यावंच लागतं..उशिरा देण्यापेक्षा लवकर द्यावं.
६) एकतर करु नका, किंवा निष्ठापुर्वक करा. मधलंअधलं काही नको.
७) स्वप्न असतं अंतर - तुम्ही जिथे आहात आणि तुम्ही जिथे असणार आहात, त्यांच्यामधलं.
८)  सुखाकडे नेणारा मार्ग नसतो. सुख हाच मार्ग असतो.
९) तुम्ही ज्याची इच्छा करता ते तुम्हाला मिळत नाही. तुम्ही ज्याला पाञ असता ते तुम्हाला मिळतं.
....... असेच बरेच काही ....तुर्तास इतकेच 😊


#असंच_काहितरी
#Book_Review

Saturday, March 11, 2023

MPSC2021 निकालाच्या निमित्ताने...

 




सध्या होत असणारी बरीच चर्चा एका विषया भोवती दिसतेय, तो विषय म्हणजे निकाल लागल्यावर, पोस्ट भेटल्यावर जे भव्यदिव्य आनंद साजरा केला जातोय..ज्या मिरवणुका काढल्या जातात...जे मोठ मोठे बॅनर लावुन विश्वनिर्मितीचे दाखले म्हणुन निकालाला दाखवले जाते हे सगळे खरंच गरजेचे आहे काय ? आनंद सगळ्यांनाच होतो..खरंतर तो झालाच पाहिजे, कारण बरीच वर्षी, बरीच मेहनत सगळं फळाला आल्यासारखं वाटणं हे साहजिकच आहे...पण...इथेच मोठा पण आहे...हे सगळं करताना..हे सगळं होत असताना...एक मोठा अभ्यास करणारा गट म्हणत असतो (किमान मनातल्या मनात तरी...) की बाबांनो, तुमच्या कर्मकहाण्या खुप ऐकल्या आता कामाचं बोला..तुमची मन की बात खुप ऐकली आता आमच्या काम की बात बोला...तुमचे जिद्द, परिश्रम, मेहनत, कष्ट, चिकाटी, सकाळी चार ला ऊठणं, गार पाण्याने अंघोळ, लायब्ररीत जाणारा पहिला मी, अन् बाहेर जाणारा शेवटचा मीच...अशा प्रचंड प्रेरणादायी प्रवासातुन मला मिळणारी उर्मी अन् तुम्हाला यशाची चढलेली गुर्मी दोन्हीही फार काळ टिकत नाही...बोलायचंच असेल तर काहितरी शाश्वत सांगा..अभ्यास कसा करायचा ते सांगा ? कोणत्या पेपरसाठी काय वाचु ते सांगा ? जुन्या पेपरचे विश्लेषण करा, पण नक्की काय करायचे ते सांगा ? अन् सगळ्यात महत्वाचे तुमची प्रेरणा याक्षेञाकडे एखाद्याला आकर्षुण घेण्यासाठी कामी येईल, आम्ही इकडे आलेलो आहोत आता यातुन बाहेर पडण्यासाठी काहीतरी सांगा...प्लिज कामाचं काहितरी सांगा.....

हे असं हल्ली काही वर्षा पुर्वी व्हायचं...मी जेंव्हा अभ्यास सुरु केला (2019) तेंव्हा हे जास्त प्रमाणात चालायचं...पण आता फरक दिसतोय ...काही निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी (अर्थात अधिकारी पण म्हणता येईल त्यांना) हे सगळं या क्षेञात चालणारं बदलुन नवं काहितरी करण्याचं ठरवलं ..अन् बदल जाणवु लागलाय...आता टाॅपर अभ्यासाचं बोलतात...प्रेरणेपेक्षा परिक्षेचं बोलतात...अंगावर गुलाल उधळुन घेण्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही, पण त्याच माखलेल्या गुलालाने काही अधिकारी काम की बात करण्यासाठी परिक्षार्थींना बोलत असतात...आई वडिलांच्या मेहनतीचे पांग फेडले हे सांगतानाच, मागे राहिलेल्या मिञांना सोबत आणण्यासाठी काय करता येईल ह्याचाही विचार ते करतात...ते दिभाभुल करण्यापेक्षा दिशा दाखवण्याचं काम करतात...तुमच्यात अदम्य साहस आहे, तुम्ही करु शकता...नव्हे तुम्ही कराच, असा अट्टाहास धरण्यापेक्षा नसेल जमत तर दुसरा पर्याय बघा...एकडे खरंच खुप काही चांगलच आहे असं नाही, हे स्पष्टपणे सांगण्याचं काम ते करतात...एकदंरीतच आता यशाचं, अपयशाचं फार कौतुक करण्यात रमण्यात व्यस्त असणारे कमी होताय, आपण तर झालो आता मागे राहिल्यांना पुढे आणण्यासाठी शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न ते करत असतात...हा बदल तुम्हाला दिसत असेलही, अन् जाणवत देखील असेल..पण तरीही अजुनही पुर्णपणे जुन्या सर्वच प्रथापरंपरा खंडीत झाल्यात असं मला वाटत नाही.. टाॅपर बोलतात काहितरी..त्यातले दोनचार कामाच्या वाक्याचे व्हिडीओ कट करुन सोशल मिडीया वर टाकायचे अन् प्रेरणेचे पाट वाहु द्यायचे..मग ह्या पाटातुन वाहणारं पाणी स्पर्धापरिक्षा ज्यांची शेती आहे अशांच्या शेताला जावुन मिळतं अन् त्यांचं पिक भरघोस जोमानं उभं राहतं..ह्या पिकाचा हंगाम काही एक नाही, हे बारमाही पिक आहे अन् इथला शेतकरीही हुशार आहे...असो.

हे सगळं होत असताना मला वाटतं निवड झालेल्या लोकांबद्दल जितकं परखड आपण बोलतो, अपेक्षा ठेवतो तितकच तयारी करणाऱ्या लोकांनी पण लक्षात ठेवायला हवे की आपण एक ग्रॅज्युएट झालेले व्यक्ती आहोत...भलबुरं, खरंखोटं सारं समजु शकतो..त्यामुळे आपल्या कामाचं काय हे सहज ओळखता यायला हवं..विजेत्यांच्या झगमगाटातुन आपल्याला वाट दाखवतील असे पथदिवे ओळखुन आपली वाट चालायला हवी..खरंतर एमपीएससी परिक्षेमध्ये फार काही कुणी सांगावं असं नाहिये...कुठल्याही गायडन्सने तुम्ही पास व्हाल, याची शाश्वती नाही... फक्त परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी (परीक्षेसाठी सगळेच करतात, परिक्षेचा अभ्यास केला पाहिजे) थोडी फार मदत नक्कीच होऊ शकते... ती घ्या अन् आपल्या अभ्यासाला लागा...मी स्वतः 2017 पासुन कुठल्याही टाॅपरचे भाषण ऐकले नाहीत....अभ्यासाबाबतीत मार्गदर्शन नक्कीच घेतले पण प्रेरणा म्हणाल तर आपल्याला ती आपल्या परिस्थितीतुनच मिळत असते, आपली परिस्थिती, आपल्या‌ आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवला की आपोआप प्रेरणेचे पाट आपल्या अंतःकरणात वाहु लागतात...त्याच आधारावर आपण आपला अभ्यास करायचा असतो...सतत...सातत्य हाच मुलमंञ आहे आपल्या अभ्यासाचा...एखादी गोष्ट वारंवार केली की आपोआप अवघड गोष्ट सोपी वाटते अन् सोपी गोष्ट सहज जमते..मला वाटते अभ्यास करत राहणे..कुठे काही अडलेच तर YouTube/Google वरुन एखादी संकल्पना समजुन घेणे अन् आपला अभ्यास चालु ठेवणे...एवढेच लागते परिक्षा पास व्हायला...टाॅपरची भाषणं ऐकुन परिक्षा पास झाला असा मला तरी कुणी माहित नाही..आपल्याला खुप खुप शुभेच्छा...👍