Sunday, March 19, 2023

MPSC चा Exit Plan : Plan B

 

परवा लेक्चर मध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, कुठलेही काम करताना, कुठल्याही प्रकरणात शिरतानाच तुमच्याकडे त्याचा Exit Plan असला पाहिजे, तरच‌ त्यामध्ये शिरा. महसुल विभागातल्या महसुली प्रकरणांबद्दल चर्चा चालु असतानाचा हा प्रसंग. हे ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात आले की किती साधे आणि सोपे गणित वाटते हे, की एखाद्या गोष्टीत शिरतानाच त्यातुन बाहेर कसे निघायचे ते ठरलेले असले पाहिजे. तशी उपाययोजना आधीच तयार पाहिजे, पण हे वाटते तितके खरच सोपे आहे का ? आपण स्पर्धापरिक्षेचा अभ्यास सुरु करतानाच ह्यातुन बाहेर पडण्याची आपली योजना तयार असते का ? की पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढतोच असा आत्मविश्वास हेच आपले भांडवल असते ? मला वाटते बऱ्यापैकी लोकं इकडे येताना खुप आत्मविश्वासाने भरलेले असतात, परंतु मान्य करा किंवा नका करु, हे क्षेञ प्रचंड अनिश्चिततेचे आहे. (मी स्वतःला पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकलो, पण असे प्रत्येकालाच जमेल किंवा जमलेच पाहिजे असे नाही) इथे तुमचे काय होईल, हे तुम्हाला झाल्याशिवाय सांगताच येत नाही. मी खुप मेहनत घेतो, मी हुशार आहे, मी अगोदर पासुन मेरीटचा विद्यार्थी आहे, ह्या सगळ्या समजुतीमधुन बाहेर येऊन वास्तववादी विचार केल्यास मला वाटते स्पर्धापरिक्षेचा विचार करतानाच आपला Exit Plan डोक्यात असावा. तुम्ही अभ्यास सोडुन ते करा, तुमच्याच्याने परिक्षा पास होणार नाही, असं माझं मुळीच मत नाही...पण...खरा पण इथेच आहे...तुम्ही होणारच हा विश्वास जितका गरजेचा, तितकीच नाही झाले तर काय ? हि भिती देखील महत्वाची. विशेषतः नव्याने जे इकडे येत आहेत, त्यांनी तर आपला Exit Plan तयार करुनच इकडे या. एकदा इकडे आले की मग काही वर्ष साधारणतः २-३ वर्ष (जर पहिल्या प्रयत्नात नाहीच झाले तर) त्या प्लानचा विचार न करता, दोर तुटलेल्या सैनिकासारखे परिक्षारुपी शञुवर तुटुन पडा..गड हातुन जाता कामा नये,यासाठी शर्थीने खिंड लढवा...विजय तुमचाच होईल यात शंका नाही...पण सर्व ताकद लावुनही शेवटी गड हातुन गेलाच तरी देखील आपलं स्वराज्य आबादीत राहावं यासाठी आपल्या Exit Plan वर काम सुरु करा...तोच गड आता तुमच्या स्वराज्याची राजधानी बनवा... विश्वास ठेवा...राजधानी कुठलीही असो..राजा आपणच असलं पाहिजे.. अन् आपणच असतो. फक्त जेंव्हा कुठलाही Plan B डोक्यात न‌ ठेवता आपण पुर्णपणे स्पर्धापरिक्षा/MPSC हाच एकमेव आयुष्य जगण्याचा पर्याय म्हणुन बघतो अन् ह्या प्रचंड आक्राळविक्राळ पसरलेल्या स्पर्धेच्या चक्रव्यूहात शिरतो तेंव्हा आपला अभिमन्यु होऊ शकतो...त्यासाठीच नुसतं शिरण्याचं धाडस असुन चालत नाही, निघण्याचा मार्गही हाताशी असावा लागतो....त्याशिवाय चक्रव्यूह भेदणं शक्य नाही...तुमचा अभिमन्यु कधीच होऊ नये, ह्याच शुभेच्छा !!


#असंच_काहितरी
#Plan_B


No comments: