"कधी निराशा खिन्न दाटली
कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती
निळेनिळे चांदणे भेटले "
मंगेश पाडगावकरांच्या ह्या ओळी आज वृत्तपञात वाचण्यात आल्या. माणुस म्हणुन जगाताना कायम फुलांचे बगीचेच वाट्याला येतील असे नाही, काट्यांचा मार्ग ही वाट्याला येईलच...कधी काटे अडवत कधी काटे तुडवत..पण जगण्याचा प्रवास थांबता कामा नये...आपण सगळेच ज्या परिस्थितीत आहोत, तिथे आपल्याला रोज कुठुन तरी नकारात्मकता येऊन धडकतेच...कधी तरी कुणी तरी अचानक विचारतो...मग काय ? कधी लागणार निकाल ? मग काय ? राज्यसेवा नाही निघाली का मागची ? अरे पी एस आय ला नव्हता का तु ? मग काय ? कधी सोडायचाय हा नाद ? मग काय यंदा तरी होईल का ? अरे पंचवार्षिक योजना झाली की, अजुन किती ? अरे तुझा तो रुम पार्टनर झाला वाटतं ? मग तु कसा काय राहिला गड्या ? असे एक ना अनेक प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तयारी दरम्यान जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी विचारलेच जातात... कळस म्हणजे हे सगळं विचारणाऱ्याला प परिक्षाचा देखील माहित नसतो..किंवा माहित असेलच तर त्यानेही काही फार दिवे लावलेले नसतात....तरी देखील असे प्रश्न ही नकारात्मकता आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असते...अशावेळी शांतपणे एकच विचार करा..मी माझे प्रामाणिक प्रयत्न करतोय का ? उत्तर जर हो असेल, तर कुणाचीच चिंता न करता आपला अभ्यास आणि आपण यातच गुंतुन रहा...मोबाईलचा वापर कमीत कमी करा...मोबाईलवर दाखवला जाणारा चकमकीत आयुष्याचा चेहरा हा ब्युटीपार्लरमधुन मेक अप करुन बाहेर पडणारा असतो...खरा चेहरा तोच असतो असं नाही.... दिसणारा अन् असणारा यात फरक असतोच... त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात अगदी सोनेरी दिवस आहेत, अन् मीच इथे लोखंडासमान गंजत पडलोय असं वाटु देऊ नका....खरंतर गंजत पडुच नये, कारण गंजण्यापेक्षा झिजणे कधीही चांगले...प्रयत्न करणं म्हणजे झिजणे...प्रयत्न केल्यासारखे दाखवणे पण न करणे म्हणजे गंजणे...आपल्या भोवतीच्या ह्या सगळ्या गदारोळात दुर होऊन पुर्णतः तयारीत गुंतणे ...झिजणे...हाच...हाच एकमेव मार्ग असतो सगळ्या नकारात्मकतेला दुर सारण्याचा....सध्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त अभ्यास आहे..फक्त तेवढाच करा...मंगेश पाडगावकर म्हणतात तसे कधीतरी निराशा दाटेल...कधीतरी भोवतीचे रान पेटेल....फक्त आपण आपल्या आतली मशाल विजू न देता चालत राहिलो, तर येणाऱ्या वळणावरती निळेनिळे यशाचे चांदणे नक्कीच भेटेल...तोपर्यंत... त्या वळणापर्यंत फक्त चालत रहा...चालत रहा....एक सुंदर वळण तुमची वाट पहात आहे...!!
#असंच_काहितरी #MPSC
#Motivation_वगैरे_वगैरे
No comments:
Post a Comment