Sunday, March 26, 2023

Book Review : डियर तुकोबा (विनायक होगाडे)


"तुकोबांच्या भेटी । शेक्सपियर आला । " ही विंदा करंदीकरांची प्रसिद्ध कविता. तुका आकाशाएवढा म्हणतात ते काही उगीच नाही, याची प्रचिती तुकारामांबद्दल काहीही वाचले किंवा ऐकले की आपल्याला येतेच. विंदा करंदीकरांनी इंग्रजीतील महान कवि व नाटकार शेक्सपियर यास तुकोबांच्या भेटीला आपल्या कवितेत आणले होते. त्याच आधारावर तशाच प्रकारचा प्रयत्न आपल्या 'डियर तुकोबा' ह्या पुस्तकात करत महात्मा गांधी, गाडगे महाराज, साने गुरुजी, साॅक्रेटिस, बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, शाहु महाराज, गॅलिलिओ, कर्मवीर भाऊराव व दाभोळकर अशा वेगवेगळ्या प्राचिन ते आधुनिक प्रबोधनकारांना तुकोबांच्या भेटीला आपल्या कवितेत विनायक होगाडे यांनी आणले आहे. विनायक होगाडे हे स्वतः पञकार असल्याने आजच्या पञकारितेचे सारे रंगढंग त्यांना परिचित आहेतच, त्यामुळे याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागात त्यांनी तुकोबावरील 'मिडीया ट्रायल' दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबाने कर्मकांड अन् धर्माच्या नावाकर लोकांना वेडे बनवणाऱ्या संधिसाधुंवर कायमच घणाघात केला होता. त्यांचा हा विद्रोह त्यांचा शब्दांमधुन त्यांच्या कवितेतुन वाहत असायचा, अन् त्यातुनच धर्मपीठाने त्यांना दिलेली गाथा बुडवण्याची शिक्षा व त्यानंतर इंद्रायणीत बुडालेली गाथा लोकगंगेत लोकांच्या मुखातुन कशी तरली याचे अतिशय मार्मिक व लालित्यपुर्ण वर्णन या भागात केले आहे.दरम्यान हे सगळे प्रसंग मांडताना लेखकाने तुकोबांवरचे हे प्रसंग जणु आज, आत्ता आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत, अशा पद्धतीने‌ मांडले आहेत...सध्याच्या काळातील मिडीया, सोशलमिडिया सगळ्यांचीच भुमिका यात कशी राहिली असती, ह्याची आपल्या पुरेपुर कल्पना येते. मग यात एखादा आरोप कुणावर झाला की आरोपी हाच गुन्हेगार आहे अशा प्रकारे होणारे बातम्यांचे वार्तांकन असो किंवा एखाद्या गोष्टीचा सोयिस्कर अन्वयार्थ लावुन प्रेक्षकांसमोर आहे नाही ते चिञ उभे करण्याचे काम असो. सध्यपरिस्थितीत मिडियाचे (काही अपवाद वगळता)हे सगळे उद्योग आपणही बघतोच... अशावेळी लोकांना तुकोबा सांगतात,

"तुका म्हणे नको । आंधळा विश्वास ।
शोधुया सत्यास । विवेकाने ।।"

आणि हेच आपण लक्षात ठेवायला हवे.

दुष्काळानंतर गहाण खतं बुडवण्यापासुन गाथा बुडवण्यापर्यंतच्या प्रसंगाचे वर्णन ह्या भागात अगदी मार्मिकपणे आपल्याला वाचायला मिळते अन् नकळत तुकोबा आपल्या समोर उभे राहतात.शेवटच्या 'डियर तुकोबा' या भागात लेखकाने तुकोबाशी केलेला संवाद आहे...हा संवाद म्हणजे आपल्या आंतरिक कोलाहलाला उत्तर शोधण्याचा प्रयत्नच आहे. रोजच्या जगण्यात आपल्याला भेडसावणारी नकारात्मता कशी दुर सारावी हे असंख्य वादळांना झुंजणारे तुकोबा नावाचे वादळच आपल्याला सांगु शकते. यासाठीच लेखकाने तुकोबांशी संवाद साधुन सकारात्मक उर्जा मिळवली आहे. तीच उर्जा आपल्यालाही हे वाचुन नक्कीच मिळते. तुकोबा कायम आपला वर्तमान बनुनच राहतील अन् आपल्या जगण्याला दिशा देत राहतील, हा विश्वास वाटत राहतो. कदाचित याच साठी दरवर्षी येर-झाऱ्या घालत सामान्य वारकरी ग्यानबा-तुकाराम हे आत्मभानाचे सुञ गात पंढरीची वारी न चुकता करत असतो.या भागाच्या शेवटी लेखकाने म्हटल्याप्रमाणे,
"प्रवाही राहतो । उसळी मारतो ।
पुन्हा खळाळतो। तुकाराम ।।

सांगून उरतो । खलांना पुरतो ।
गाडून उगतो । तुकाराम ।।"

एकंदरीत तुकोबाचे मोठेपणच नाही तर आपले लहानपण कळण्यासाठी अवश्य वाचावे असे 'तुकारामायण', मिडिया ट्रायल आॅन तुकाराम' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन भागात विभागलेले विनायक होगाडे यांचे "डियर तुकोबा" पुस्तक..अवश्य वाचा...वाचल्यावर हे Dear तुकोबा आपल्या कायम Near च ठेवाल हे नक्की.



#असंच_काहितरी
#Book_Review

No comments: