Tuesday, March 21, 2023

Book Review : ज्वाला आणि फुले (बाबा आमटे)




"लोकविलक्षण आत्म्याचे उर्जास्वल शब्दविलसित", अशा शब्दांत जेष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी ज्याचे यथार्थ वर्णन केले आहे असे रमेश गुप्ता यांनी शब्दांकन केलेले बाबा आमटे यांचे सखोल चिंतन म्हणजे त्यांचा ज्वाला आणि फुले हा कवितासंग्रह... खरतर हा कवितासंग्रह कमी बाबांचे विचारधन जास्त आहे...या संग्रहात फक्त कल्पनेचे इमले नाहीत, शाब्दिक अलंकाराची मिनारे नाहीत...इथे आहे कर्मयज्ञातुन निघणाऱ्या प्रखर ज्वाला अन् विस्तववादी वास्तवाची फुले.…ह्यातील कविता म्हणजे बाबांचे मुक्त चिंतन आहे.... बाबांचे आयुष्य हेच एक दिर्घ कविता होती....ज्यांच्या आयुष्यात फार काहीच उरले नाही, अशांच्या आयुष्यात काव्य पेरुन त्यावर उमेदीची फुले फुलवण्याचं काम बाबांनी आपल्या आयुष्यात केले, त्यामुळेच यदुनाथ थत्ते याच संग्रहाच्या परिशिष्ठात म्हणतात त्याप्रमाणे बाबांचा अन्य क्षेञातला पराक्रम इतका नेञदिपक आहे की त्यांची गणना कवि आणि गीतकार यांच्या मालिकेत करायचे आपण विसरुनच जातो. बाबा खरे कर्मयोगी.. आपल्या ह्या इतर कामातुन जो काही वेळ मिळेल त्यावेळेतही ते कधी रिकामे बसलेच नसतील, असे वाटते (नसता एवढे वैश्विक चिंतन करायला वेळच मिळाला असता का ?)

ह्या संग्रहाची प्रस्तावनाच इतकी सविस्तर व बाबांच्या कवितेला ज्ञान देणारी आहे की त्यावर अजुन फार काही इतर कुणी काही सांगावे असे उरतच नाही.ह्या संग्रहाचे‌ माझ्यादृष्टिने आपल्यासाठी महत्व हे काव्यापेक्षा वैचारिक पातळीवर जास्त आहे... संग्रहात असणाऱ्या एकुण 23 कवितांमध्ये बाबांचे इतके प्रचंड मोठे विचारधन पेरले गेलेले आहे की वाचणारा सहज अंतर्मुख होऊन तेथेच विचारमग्न होऊन जातो. अगदी साधे साधे वाक्य पण मनाला स्पर्शुन जाणारे तत्वज्ञान इथे आपल्याला सापडते. बाबांनी हा संग्रह अर्पण केलाय तो 'अश्रुंनीच दारे ठोठवणाऱ्या दारिद्रयास'... दारिद्रय हा खरा शाप आहे, गरीबीसारखा शञु नाही हे आपण ऐकलेले किंवा वाचलेले‌ असेलही, पण ह्या दारिद्रयाचा अजुनही आपल्याला आपल्या देशातुन नायनाट करता आलेला नाही, ही वास्तविकता अन् दाहकता ह्याची जाणिव संग्रहाच्या सुरवातीलाच होते. 'पंखांना क्षितिज नसते', या कवितेत ते म्हणतात, "पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारे आकाश असते"...जीवनाचा नक्की अर्थ आहे, आपले ध्येय काय ? याचा विचार मांडताना "जिथे आत्म्याचेही अन्न पिकेल" या कवितेत कल्पनेने कितीही भरारी मारली तरी वास्तवाचे भान सुटता कामा नये हे सांगताना बाबा म्हणतात, "मला भान आहे की - शरीर अखेर धरिञीच्या गुरुत्वाने कोसळते... मस्तके उंचावलेली असण्यासाठी पोट भरलेले असावे लागते आणि आकाशस्थ गुपिते सोडवण्याआधी भाकरीचा यक्षप्रश्न सुटलेला असावा लागतो !" किती ही वास्तविकता... आजही आपल्याकडे कित्येकांच्या भाकरीचा यक्षप्रश्न सुटलेला नाही, अशांसाठी कितीही मोठ्या मंगळमोहिमा अन् चांद्रमोहिमा केल्यातरी त्या मोहिमा म्हणजे फक्त आकाशस्थ गुपिते सोडवण्याचा अट्टाहास...त्यांना हा अट्टाहास नको तर पोटाला पोटभर घास हवा असतो.... हळुहळु यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत असले तरी प्रश्न पुर्णपणे काही मिटलेला नाही, याच जाणही आपल्या सर्वांनाच आहे..याच कवितेतल्या पुढच्या ओळी ह्या अजुन प्रेरणादायक आहेत. ते म्हणतात,
"बुजलेल्या व्रणांचे तोंड उसवत मला आता बसायचे नाही
आणि कणाकणात स्वप्ने पेरुन राञही झिंगवायची नाही
ह्रदयावरच्या जुन्या जखमा स्मृतींच्या गिधाडांना
खाऊ देण्यात काय अर्थ आहे ?
वर्तमानात जगले पाहिजे
जीवित ही गतकालाची बाब आहे
पण जीवन हा वर्तमानाचा विलास आहे
आणि मला माहित आहे की -
व्यथेच्या पेल्यातून सत्याचे घोट घेताना धीट ओठही कापतात !
पण आता प्रेममय जीवन हवे असेल
तर जीवनाची प्रीती टाकुन दिली पाहिजे..."

वर्तमानात जगले पाहिजे - जगण्याचे किती मोठे तत्वज्ञान ह्या तीन शब्दात बाबा सहज बोलुन जातात...खरच जमते आपल्याला कायम वर्तमानात जगणे..भुतकाळाचा  पश्चाताप अन् भविष्याची चिंता ह्यात कितीदा आपण आपला वर्तमान वाया घालवतो हे लक्षात आले की कळते वाटते तितके सोपे नसतेच वर्तमानात जगणे...अन् याही पुढे जाऊन जीवनाची प्रीती टाकुन देणे हे तर अजुन महाकठीण काम...कसे जमायचे आपल्याला...चला प्रयत्न करुयात..किमान काही अंशी तरी बदल करायला हवा, असे हे वाचत असताना आपोआप वाटत राहते...."गर्भवतीचा मृत्यु" ही एक अशीच परखड कविता यात आहे... आयुष्याकडुन आपल्याला कायम उपेक्षाच हाती लागते..किती ञास सहन करायचा आपण ? असे बऱ्याचदा वाटते आपल्याला...अशावेळी ह्या कवितेतल्या बाबांच्या ओळी नक्कीच आपल्याला आधार देतात..ते म्हणतात,
"यातनाहिनांना स्वप्ने नसतात
आणि जो थोडे सहन करतो
तो फार थोडे करु शकतो
जो खुप सहन करील
त्याला पुष्कळ काही करुन दाखविता येईल !"

त्यामुळे सहनशिलता हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे, हे सतत लक्षात ठेवायला हवे...उत्तरवाहिनी, एकलव्य, या सीमांना मरण नाही, वसुंधरेचा पुञ, माझे कलियुग, क्रांतीची पावले, सांगड्यांचे शहर ही ह्यातील अजुन काही कवितांची नावं... प्रत्येक कवितेला तत्वज्ञानाची बैठक आहे, वास्तवाचा आधार आहे, जीवनाचे रान पेटवणारा प्रचंड अग्नी ह्यातल्या शब्दांशब्दांत बारुदाप्रमाणे भरला आहे... जगणे म्हणजे धडपडणे आलेच, जगणे म्हणजे सततचा प्रवास...ह्या प्रवासात कुठल्याशा मुक्कामालाच आपले अंतिम ठिकाण समजुन थांबणारे बघितल्यावर आत्मतुष्टी म्हणजे आत्महत्येची गोळी असा संदेश बाबा देतात.."एक खिंड मी लढवीन" या कवितेत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याचे अगदी सविस्तर वर्णन करताना एकेठिकाणी ते म्हणतात, "वानप्रस्थप्रवृत्ती म्हणजे पोटासाठी इच्छेच्या विरुद्ध ज्याला जगावे लागले..त्याला स्वतःच्या इच्छेने जगण्याची संधी !" आम्हाला हे मिळाले नाही, आमच्या काळात हे नव्हते, आम्ही असे नव्हतो असे म्हणारी वार्धक्याने भांबावलेली माणसं असतात आपल्या आजुबाजुला...पण अशांसाठी बाबा म्हणतात, अशा जेष्ठांनी फक्त जेष्ठच नाही तर श्रेष्ठही ठरावे अन् त्यांनी तरुण पिढीला सांगावे की तुम्ही खुशाल नवे किल्ले सर करण्यासाठी पुढे व्हा ! मी तुमच्यासाठी ही एक खिंड लढवीन ! "मी जवाहरलाल " या कवितेत पंडीत नेहरु शब्दातुन आपली विवंचना मांडताना उभे केले आहेत. "जय हे सामान्य मानव महान" यात लालबहादुर शास्ञी यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचे यथोचित वर्णनच जणु केले आहे. "गांधी-एक युगमुद्रा" या पुढच्या कवितेत गांधी एक युगाचा चेहरा आहे असे वर्णन करुन गांधीजींच्या आयुष्याच्या विविध पैलुंना उलगडण्याचे काम केले आहे. नानाविध पैलुंमधुन गांधी आपल्यासमोर मांडल्यानंतरही गांधी इतक्यात समजणे शक्य नाही ह्याची कबुलीही देतात. बाबा या कवितेचा शेवट करताना अगदी समर्पकपणे म्हणतात, "गांधी माहात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही. आणि उद्याच्या पिढ्यांना त्याची ओळख पटण्यासाठी क्वचित काॅम्प्युटर लागेल ! पण काळाच्या भाळावर उमटलेली हि तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसुन काढता येणार नाही !" सद्यपरिस्थिती बघता ह्या वाक्याला विशेष अर्थ आहे, हे लक्षात येईल..गांधी पुसुन टाकण्याचा प्रयत्न कुणीही कितीही केला तरी ते शक्य नाही हेच खरे. या संग्रहातील शेवटच्या "मी अजुन जहाज सोडलेले नाही" कवितेत बाबांचा प्रचंड आशावाद, लढण्याची मानसिकता, हिम्मत, परिस्थितीवर आरुढ होण्याचे साहस ह्या सगळ्यांची प्रचिती येते. 

या संग्रहाच्या शेवटी दिलेल्या परिशिष्ठात बाबांची चार गीते (थांबला न सुर्य कधी, लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटल्या मशाली, गतीचे गीत आणि माणुस माझे नाव ही ती ४ गीते) व त्या गीतांचे यदुनाथ थत्ते यांनी केलेले विवेचन दिले आहे, ते देखील वाचनीय आहे. हे प्रत्येक गीत म्हणजे एक प्रेरणेचा दिपस्तंभ आहे...माणुस माझे नाव या गीतात उल्लेख केल्याप्रमाणे माणुस माझे नाव, माणुस माझे नाव...दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव....आपणही या गोष्टींचे भान ठेवुन जगायला शिकुयात...अन् त्यासाठीच दहा दिशांच्या रिंगणात पुढे धाव घेण्यासाठी पुस्तकांचा गाव अन् वाचनाची नाव हे आपल्याला नक्कीच मदत करतील... आपल्या असामान्य कर्तृत्वातुन आपल्या कार्याचा ठसा इतिहासाच्या पानावर उमटवणारा कर्मयोगी अन् त्या कर्मयोग्याच्या चिंतनातुन आलेले हे शब्दधन मिळवण्यासाठी, आयुष्यातल्या ज्वालांचीही फुले करण्याची ताकद अंगी बाणवण्यासाठी हा अप्रतिम असा काव्यसंग्रह नक्कीच वाचायला हवा..नुसते एकदा वाचुन समजेलच असे नाही, त्यासाठी परत परत वाचता यावा यासाठी आपल्या संग्रही देखील ठेवावा असा हा कवितासंग्रह सर्वांनीच अवश्य वाचावा. मी स्वतः पदवीला असताना एकदा हा संग्रह वाचला होता, तेंव्हा थोडा फार समजला.. आता परत प्रशिक्षणाच्या दरम्यान महाराष्ट्र दर्शनाच्या‌ निमित्ताने हेमलकसा येथे जाणे झाले होते, तेंव्हा तिथे मिळाला..विकत घेतला...परत वाचला...आता अजुन थोडा समजला....पुर्णतः समजला असे अजुनही वाटत नाही..बघु पुन्हा परत वाचणे होईलच, संग्रही आहेच..कपाटातही अन् काळजातही !


#असंच_काहितरी
#Book_Review

No comments: