जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थुगाव निपाणी, पंचायत समिती नरखेड, नागपुर येथील मुलांनी आज वनामती संस्थेच्या माननीय संचालिका, श्रीमती मिताली शेठी यांच्याशी संवाद साधला. त्यांचा आतापर्यंतचा एकंदरीत प्रवास, प्रशासनातील त्यांचे काही अनुभव, त्यांच्या नवनवीन कल्पना याबद्दल मुलांनी जाणुन घेतले. तसेच मुलांनी त्यांच्या काही कल्पनांची देखील मॅडमसोबत चर्चा केली. अतिशय उत्कृष्ट अशी मुलांची बँक संकल्पना त्यांनी मॅडमला सांगितली. हा झाला आजच्या भेटीचा औपचारिक वृतान्त ...
मी तुम्हाला जे सांगणार आहे ती औपचारिकता नाही.... तर मॅडम ह्या मुलांशी चर्चा करत होत्या..त्यांची चर्चा शेवटाकडेच आली होती, तेंव्हा आम्ही त्यात सामिल झालो. मॅडम ने त्यांचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच प्रकल्प अधिकारी, धारणी या पदांवरील अनुभव थोडक्यात सांगितला. ह्या ७/८ वीच्या मुलांचे प्रश्न अतिशय स्पष्ट आणि तितकेच आत्मविश्वासपुर्ण होते... नंतर आम्ही आमची ओळख मुलांना करुन दिली, त्यांनी त्यांची ओळख करुन दिली. ही मुलं इतकं छान बोलत होती, ऐकत होती की त्यांच्याबद्दल एक वेगळच कौतुक मनाला वाटत होतं... मॅडम ने राणी बेटी माहितीपटाची चिञफीत दाखवली. (चिञफित बघण्यासाठी लिंक :https://youtu.be/ptFXEqibDzw) धारणीसारख्या ठिकाणी काम करतानाही अगदी नाविन्यपुर्ण पद्धतीने, तेथील आदिवासी समुदायाला समजुन घेऊन, त्यांच्याशी आपुलकीची भावना जोपासत त्यांच्यासाठी मॅडमने कार्य केल्याचे ह्या व्हिडीओमधुन जाणवले. आदिवासींना आपण त्यांचे वाटत नाही कारण आपण आपल्या शहरी भाषेत बोलतो, त्यांना ती फार उमजत नाही अन् आपल्याला त्यांची भाषा समजत नाही...त्यामुळे त्यांच्या भाषेत मोडका तोडका का असेना थोडाफार तरी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता यावा, असं मॅडम सांगत होत्या. मुलांचा एकुण टापटिपपणा अन् त्यांचे शिक्षण कौशल्य हेही फार आकर्षुन घेणारी गोष्ट होती. आम्ही शाळेत असताना काहींना नीट मराठी येत नसायची, ही मुलं मराठी, इंग्रजी सोबतच परदेशी भाषेचेही धडे घेत आहेत..ही फारच अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे. चर्चेअंती एका मुलीने चक्क जपानी भाषेत तर दुसरीने चक्क जर्मन भाषेत आभार प्रदर्शन केले, तेंव्हा आपणही ह्यांच्याकडुन शिकलं पाहिजे... अभ्यास, परिक्षा यासोबतच अशा नवनवीन संकल्पना राबवण्यासोबतच बरंच काही ही मुलं शिकतायत...
जिल्हा परिषद शाळा म्हणजे मोडकळीस आलेली शाळा, कधीतरी येणारे मास्तर, अन् कामापुरतं शिकुन कसंतरी करत आठवीपर्यंत पास व्हायचं असं ठरवणारे विद्यार्थी असं काहीसं चिञ सर्वसाधारण आपल्या कल्पनेत असु शकतं, पण ही शाळा, इथले मास्तर, अन् इथले विद्यार्थी सारेच अगदी अप्रतिम, सृजनशील अन् कल्पक.... साधारण प्रतिमेला छेद देणारी ही शाळा अन् हे विद्यार्थी हे उद्याच्या विकसीत भारताचे आश्वासक चिञ आहे. अशा असंख्य शाळा उभ्या राहोत... प्रत्येक जिल्हा परिषद शाळा अशाप्रकारे उभी राहिली तर उद्याचे सुजाण नागरिक घडवण्याची जबाबदारी सहजतेने पार पाडली जाऊ शकेल. प्रशासनात येण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकानेच हाच विचार करुन प्रशासनात यायला हवं की इथे येऊन काहीतरी फरक आपल्याला पाडता येईल. सर्वसामान्य म्हणुनच जगायचं असेल तर इथं येऊन फारसा उपयोग नाही.... इथे आपल्याला आपल्या पुरतं तरी सुंदर विश्व निर्माण करताच यायला हवं... जग बदलेल का माहित नाही...मी बदलेल, एवढाच विश्वास अन् हिच तळमळ आपल्यात कायम रहावी एवढीच अपेक्षा. आज भेटीनंतर ह्या लहानग्यांना पाहुन असं वाटलं की आपण लहानपणी जरा लहानच होतो, अन् मॅडमकडे पाहिल्यावर वाटलं आपण अजुनही लहानच आहोत.... कदाचित पुढेही लहानच राहु, पण लहान का असेना बदल घडावा एवढच... तसही सुर्य होण्याचा अट्टाहास नाहीच, स्वयंप्रकाशी काजवा होता यावं एवढच..! करण्यासारखं बरच काही असतं, शिकण्यासारखं बरच काही असतं....करत राहुयात, शिकत राहुयात !!
No comments:
Post a Comment