Saturday, November 17, 2018

मी एकाकी आहे....?

कसं वाटतंय
विचिञ ....?
कोंडल्यासारखं...?
सगळं सुटल्यासारखं...?
असुन कुणीच नसल्यासारखं...?
एकटं.....?
कि एकाकी....?
छे... छे... मी काहीतरीच बोलतोय...
तुम्ही म्हणाल , मी एकाकी आहे....
नाही .... मी तसं म्हणणार नाही
कसे म्हणु मी एकाकी आहे....?
अजुनही 'ती' माझ्यात बाकी आहे.....

# असंच काहितरी......

मी वेचलेले अक्षरमोती ....# मी नथुराम गोडसे बोलतोय


Saturday, November 10, 2018

पांढरं सोनं‌ वेचताना


मानवजातीचा होण्यासाठी


फुले

फुले.......

फुले वाहिले जातात
पाहिले जात नाहित
फुले वेचले जातात
वाचले जात नाहीत..।।

फुले फुलतात सगळीकडे
पण कळतात कुठे
फुले साठवतात सगळे
पण आठवतात कुठे....।।

एक सुवास देणारी
एक नवा श्वास देणारी
एक फळ देणारी
एक लढाण्याचं बळ देणारी.. ।‌‌‌।

एक वार्याने गाळलेले
एक व्यवस्थेने गाळलेले
पहिली फुले दुसर्यावर
वाहिली जातात....
दुरुन मग दोघेही
नुसती पाहिली जातात......

एकाचा हार होतो
अन् दुसर्याची हार.....
दरसाला दोर्याचा
दोघेही सोसत राहतात भार.....।।

🖋 शशिकांत मा. बाबर

Tuesday, October 2, 2018

तुझ्या माझ्या शहरातला फरक

तुझ्या शहरात
मोठमोठ्या घरात छोटछोटी माणसं राहतात
अन् माझ्या शहरात
छोटछोट्या घरात मोठमोठी माणसं
एवढाच काय तो फरक
तुझ्या अन् माझ्या शहरात.......
तुझ्या शहरात
चकमकीत रस्ते पण चाल बिघडलेली माणसं
माझ्या शहरात
बिघडलेल्या रस्त्यावरुन निट चालणारी माणसं
एवढाच काय तो फरक
तुझ्या अन् माझ्या शहरात.........
तुझ्या शहरात
उंच इमारतींना श्रीमंतीचा माज
माझ्या शहरात
गरीबीला ईमानदारीचा साज
एवढाच काय तो फरक
तुझ्या अन् माझ्या शहरात........

# असंच काहितरी

गांधी.....

गांधी.......

ज्या आॅफीसातल्या भिंतीवर
गांधी लटकत असतो........
त्याच तिथे नथुरामही
खुलेआम भटकत असतो......
वर्षानुवर्षांच्या धुळीनं
चष्म्याची झाकलीय काच.....
बापु दिसतेय का त्यामागुन
टेबलाखालची लाच......
देश महासत्ता होणारंय आता
शहरं होतायत स्मार्ट...
गावांच्या स्वयंपुर्णतेचं
हरवलंय कुठे आर्ट......
तुमच्या सहिष्णुतेच्या गप्पा
आता हर एक मारतो बापु
अहिंसेच्या गप्पा करतायत
खिशे कापु अन् गळे कापु.......
गांधी सगळ्यानांच हवा असतो
पण फक्त नोटावर....
अहिंसा कळणार कशी त्यांना
भुक हिंसा करते ज्यांच्या पोटावर.....

*🖋शशि....( गांधी समजताना......)*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

Sunday, September 16, 2018

असंच काहितरी.... # जगाची भाषा

मिञा, या जगात जगायचं असेल तर जगाची भाषा कळली पाहिजे अन् नुसती कळुन चालणार नाही . आपल्यालाही त्या भाषेत बोलता आलं पाहिजे . इथं अंतरांना अर्थ असतो अन् अर्थांमध्ये देखील अंतर असतं.... इथं नाती तयार होतात ती गरजेनुसार ...इथल्या सगळ्या कल्पनाच भ्रामक , त्या फसव्या आपल्याला फसवत राहणार ..... इथं आपण आपल्यावर प्रेम करावं... इतरांवर प्रेम करावं.... पण इतरांनी आपल्यावर प्रेम करावंच , हा अट्टाहास करण्यासाठी हे जग नाही. जिथे बालहट्ट पुरे होत नाहीत.... तिथे तुझे तारुण्यातले हट्ट कसे पुरे होतात.....

# असंच काहितरी

Tuesday, August 21, 2018

पावसाळी ढग

पावसाळी ढग.......

कालची रिमझिम , तुझ्याही गावात झाली
सकाळ सकाळी गावात ओरडा होता
माञ माझा गाव , अद्यापही कोरडा होता.....

तुझ्यासारखेच ढगानेही , गावाला गाळले माझ्या
वार्याने वावराला , मुद्दाम टाळले माझ्या.....

शेजारच्या गावात , धो धो पाऊस पडतो आहे
माझ्या गावावरुन वाहणार्या वार्याला
तिथे कुठला हिमालय अडतो आहे.....

ढग भरुन येतात , वरुन जातात
गाव सुका सुकाच राहतो
तुझ्या गावातला बोलका पाऊस
माझ्या गावात मुकाच राहतो......

सगळीकडे पाऊस , नदी नाल्यांतुन वाहतो आहे
माझा माञ गाव , ढगाकडेच पाहतो आहे......

तुझ्यासारखेच ढग , आता गावाला छळत असतात
न बोलताच , न थांबताच पळत असतात......

तु नाही आली तरी चालेल
पाऊस आला पाहिजे
मन कोरडं राहिलं तरी चालेल
माती चिंब झाली पाहिजे.......

तुझ्या काय , माझ्या काय
जरी घरावर एकच आभाळ आहे
तुझ्या वेगळ्या ललाट रेषा
माझं वेगळं भाळ आहे......

घर गळेल माझं , एवढा पाऊस पडु दे
काळजातला जाळ जळेल , एवढा पाऊस पडु दे.....

तुझ्या घरावरुन जाणार्या ढगांना
माझ्या घरावर बरसायला सांगुन बघ
माझ्यासाठी किमान एकदा
एवढंच वरदान मागुन बघ......

*www.shashichyamanatale.blogspot.com*

Saturday, August 18, 2018

आयुष्यावर बोलु काही

आयुष्यावर बोलु काही.....


आयुष्य.... खरं तर हा शब्दच पुरे ठरतो सारं काही सांगण्यासाठी. खरं म्हणजे आयुष्य म्हणजे काय...? मी काही कागदी तत्वज्ञान पाजणार नाही. जे मनात आलं ते सहजं इथं उतरलंय....
जन्म आणि मृत्यु यांच्यातलं अंतर म्हणजे आयुष्य की हे अंतर कापण्याचं तंञ म्हणजे आयुष्य ?... नेमकं काय ....? सारं अगदी मनासारखं मिळावं अशी अपेक्षा असेल तर नाहीच येणार आयुष्यात मजा. आयुष्य हे कधी कधी मला झाडासारखं वाटतं ... आपलीच फळ आपल्याला न खाता येण्याजोगं .... म्हणजे आपल्या प्रयत्नावर दुसर्याचीच होते मजा आणि आपण माञ हापापलेलेच आनंदासाठी.... कधी कधी आयुष्य वसुंधरेसारखं वाटतं मला .... अगदी सारं सहन करत राहायचं... कितीही काही झालं तरी स्थिर , अचल....
आयुष्य खरं तर कोडंच आहे .... न सुटणारं.... आयुष्य फार रटाळ वाटतं जर आपण आपलंच पाहिलं... आयुष्य काय हे तुम्हाला आरशासमोर उभा राहुन नाहीच कळणार कधी ते. तसं आयुष्याला जुगारही म्हणतील काही जण. अगदी पुढच्या क्षणी कुठलं पान आपल्या हाती येईल हे माहित नसणार्या त्या खेळासारखं.... पान कसंही येवो ते चांगल्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो.... आयुष्य अगदीच काट्यावर चालणंही नव्हे अन् फुलावर झुलणंही नव्हे ... आयुष्याची किंमत कळली त्यांनाच काहितरी किंमत असते.... जाणिवा बोथट झाल्या , विवेक गहाण पडला अन् विचार अशक्त झाले , की आयुष्य म्हणजे काय ? हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडायला लागतो....
अशावेळी जगणं महाग अन् मरण स्वस्त वाटायला लागतं....
का...? हा अद्याप तरी सहन न होणारा गहन प्रश्नच आहे फक्त.....

*www.shashichyamanatale.blogspot.com*

Monday, August 13, 2018

मातीचे प्रेमगीत


चार थेंब


बायको नावाची मैञिण


इंद्रधनु


तिच्याविना श्रावण

*--------- श्रावण ----------*

शोधु नकोस मजला
या दाटलेल्या ढगात....
मी मग्न माझ्या नभात
मी मग्न माझ्या जगात......

होताच रिमझिम जराशी
आठवेल मी तुला.....
बसुनी एकांती खिडकीपाशी
शोधशील तु मला.....

मी गंध होतो पसार झालो
तु तशीच राहिलीस फुला.....
तु तिथे मी इथे झुरत असेल
माञ एकटाच झुलत असेल,
तो श्रावणातला झुला.........

आजही श्रावण
बरसत येतो जेंव्हा
तुझ्यावाचुन मी
तरसत असतो तेंव्हा......

तु माझे जग होतीस
तुझे जग झालो नाही
मी कुणाच्याच जगाचा
मग भाग झालो नाही

झाले गेले सारे
विसरुन जायला हवे ना....?
आपापल्या जगात
सुखात जगायला हवे ना ....?

पण.....,

आजही एकटाच
श्रावण पाहतो आहे
एकांती तुझेच
गीत गातो आहे........

नशिब ! एवढे तरी करु शकतो....
तुला आठवुन ,
रित्या आयुष्याचा पेला भरु शकतो.........

# असंच काहितरी.......
@ त्या दुरस्थास.... जो मनाच्या कायम जवळ आहे......

www.shashichyamanatale.blogspot.com

Tuesday, May 29, 2018

आयुष्यभराची साथ

*आयुष्यभर साथ....*

आजही पाहतो जेंव्हा
हास्य तुझ्या गाली...
मानतो आभार देवाचे
किती नशिब माझे
की तु माझ्या भाळी...।।

सुख दुःख माझे
सारे वाटुन घेतलेस...
मला तुझ्या सुखाचा साक्षीदार
अन् स्वतःला माझ्या दुःखाचा
भागीदार केलेस....।।

आयुष्य नव्हते नेहमीच
झुल्यासारखा झुला...
बोचु नये काटे मला म्हणून
किती जपलेस माझ्या फुला... ।।

अय्या ! जाऊ द्या हो
असं काय बोलता...
मी काय एकटीनंच
सारा गाडा हाकला ?
तुमचा बी कंबरकणा
सांगा किती वाकला..।।

आयुष्य असतेच कुठे
झुल्यावरचा झुला..
अन् त्यावर झुलणं...
आपल्या हाती असतं फक्त
पुढे पुढेच चालणं.......।।

खरंच की....

असेच पुढे चालत राहु
घेऊन हाती हात..
अशीच देऊ एकमेका
आयुष्यभर साथ....।।

*~ शशिकांत मा. बाबर*

*टिप:- कविता तुमचीच फक्त शब्द मला सुचले एवढंच.....*

आजचा तुका वेगळा आहे



असंच काहितरी...... ° बाप °

सुर्य जितका तप्त
तितकाच बाप‌ संतप्त आहे
कदाचित सुर्याच्या प्रकाशाला
असेल कुठे ना कुठे अंत
पण बापाचे प्रेम माञ अनंत....
बाप खरंच सुर्यासारखा
घर नावाच्या आकाशगंगेतला...
तो सुर्य तिकडं तार्यांना प्रकाशीत करतो
बाप इकडं आम्हा सार्यांना प्रकाशीत करतो....
तरीही ,
त्याच्या मनातले कित्येक स्फोट
आम्हाला अनभिज्ञच असतात....
म्हणुनंच की काय ,
भले आमचा बाप‌ आम्हाला
संत वाटत नाही...
पण त्याच्यामुळेच आयुष्यातला
वसंत कधी आटत नाही...

# असंच काहितरी
~ शशिकांत मा. बाबर

 


Friday, May 25, 2018

असंच काहितरी

काही गोष्टी सांगु कि नको... नाही नको.. राहु दे ... असं म्हणुन ज्या गोष्टी आपण राहु देतो ना... त्या तशाच राहतात... गोष्ट वाटली , पटली , अन् सांगितली की गोष्ट संपते.... माञ ती तशीच राहिली , राहु दिली तर गोष्ट सुरु होते ... आपल्या मनात... असो.

प्रत्येकाच्या मनात बरंच सांगण्यासारखं असतं.. ह्या जगात दुःख कुणाला नाही , हो फक्त ज्यांचं दुःख ऐकायला कुणी नाही ते जास्त दुःखी होतात एवढंच. माणुस अंत आणि एकांत या पेक्षा एकांतालाच जास्त भीतो असं व. पु. काळे म्हणतात.... अगदी खरंय .. का माहीतीय ...? कारण अंत झाला की संपलं सगळं .. कसलीच चिंता नाही ... सारं चितेत जळुन जातं.. पण एकांतात माञ मनात सुरु होतात अनंत प्रश्न .. एकाला उत्तर द्यावं .. त्याचा अंत करावा तर दुसरा समोर.. माणुस खरंच भांबावुन जातो यात... खरंच का एवढा ञासदायक असतो एकांत.. ? माहीत नाही. ते मी सांगुनही तुला थोडंच पटणार आहे... काही गोष्टी ( कशाला सगळ्याच म्हणु देतं .. नको, बुद्ध सांगतात आपल्याला सर्व विश्वाच ज्ञान थोडंच आहे.. म्हणुन आपण एका मर्यादेतंच बोलावं... म्हणुन 'काही'....) अनुभवल्या शिवाय कळत नसतात मुळीच... नदीच्या किनारी लाटांना न्याहाळत बसणं ... तितक्यात हवेच्या मंद झुळकेनं सहस स्पर्श करुन जाणं ( अन् त्यातही प्रियसी सोबत असेल तर ..) किती आनंददायक असतं हे कितीही ऐकलं तरी कळायचं नाही .. ते अनुभवायलाच हवं... तसंच हा एकांत ही....
इथे प्रत्येकाला काही ना काही सांगायचं असतं , बोलायचं असतं.. .. त्यासाठी कुणी ऐकणारं हवं असतं... फक्त कानांनी नव्हे तर मनानंही.... माणुस नेहमी अशा माणसाच्या शोधात असतो...
एक सांगु, आपण अशा काळात जगतोय , जिथे संदेश प्रचंड वाढलेत पण संवाद हरवत चाललेत.. , आपण एकमेंकांच्या संपर्कसुची मध्ये असतो पण संपर्कात नाही , आपण ऐकमेकांना दाद देतो पण साथ नाही , आपण ऐकमेकांच्या समोर असतो पण सोबत नाही , आपण ऐकमेकांच्या जवळ असतो पण जवळचे नाही , आपण दररोज आॅनलाईन असतो पण आपल्यातले नाते आॅफलाईन.... बघ एक सांगता सांगता कित्येक गोष्टी सांगितल्या..... नाही? साला‌ हा माणुस प्राणीच निराळा. बरं ते असु दे ... अद्याप 'तु'च मला समजली नाहीस , माणुस‌ हा त्यापुढचा अभ्यासक्रम...
एक सांगु , ( नाही, आता माझ्यातला लेखक जागा झालाय म्हणुन नाही तर.......) खरा ञास कधी होतो माहितीय ...? जेंव्हा समोरचा चुकला असंही वाटत नाही अन् आपण चुकलो होतो असंही पटत नाही. हा क्षण फार विचिञ.... असे क्षण आयुष्यातुन वजा करता येतील तोच खरा गणितज्ञ..... अद्याप तरी मी त्याच्या शोधात आहे.....

# असंच (?) काहितरी.....

Saturday, May 19, 2018

चारोळी...... सत्तेची समीकरणं

चारोळी........

इथे सत्तेची समीकरणं आता
पैशाच्या साह्यानं सोडवली जातात
म्हणुनंच लोकशाहीवर संकटं
राजरोस ओढवली जातात......।।

Friday, May 18, 2018

पञ... 'ति'ला

प्रिय.......

              वैशाख नुकताच संपलाय पण तुझ्या विरहात माझ्या काळजात पेटलेला वैशाख वणवा काही केल्या थंड व्हायला तयार नाही , म्हणुन काळजातली हाक कागदावर उतरवुन तुझ्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे पञ. थेट कारण सांगुन पञाची सुरवात केली म्हणुन आश्चर्य चकीत होऊ नकोस , नाही तु होणारही नाहीस कारण माझा भिडस्तपणा , थेट विषयाला हात घालणं , हे तुला ज्ञात आहेच. पण तरीही असं थेट विषय सांगणं एखाद्या लेखकाला शोभायचं नाही. लेखकानं कसं गोष्टी फिरुन , शब्दांचा पुरेपुर वापर करुन सांगायला हवी पण माझं तसं नाही. शब्द फुकट मिळतात काय कितीही वापरायला ? , असो. मी तुझ्या दुराव्या बद्दल बोलत होतो. वैशाख संपुन हा अधिक मास लागलाय तो खरच अधिकचाच आहे . तो नकोच होता म्हणजे महिना लगेच कटला असता अन् आपल्याला हा एक महिन्याचा दुरावा सहन करावा लागला नसता. पण ते आपल्या हातात नाही ना , काय करणार. बरं कशी आहेस..? अगं तु सुंदर आहेस हे माहित आहे मला , मी तब्बेतीबद्दल बोलतो. मस्त आहेस ना. माझी आठवण येतेय...? आता लगेच प्रतिप्रश्न करु नकोस.. मला तुझी आठवण येत नाही..( रुसलीस काय ...? अगं आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं अन् मी तुला विसरलेलोच नाही , काय ? ). बरं ते असु दे... काय करतेस...? तब्बेत कशी आहे ...?( वारंवार  तब्बेतीचं काय विचारतोस ? असं म्हणु नकोस .. अगं तुझी तब्बेत ठिक असली की मला ठणठणीत  वाटतं म्हणुन विचारतो... माझ्या स्वतः साठीच की ,फार स्वार्थी आहे मी.. हसु नकोस.. पुढचा प्रश्न वाच...) सुट्यांचा मस्त कुठे फिरण्याचा प्लान आहे का...? नाही माणसानं फिरायला हवं .त्याशिवाय ही दुनिया कळायची नाही. चार भिंतीत आपलं घरंच आपलं विश्व असतं... पण बाहेर पडल्यावरच विश्वाचा पसारा कळतो. बघ माझा शहाणपणा झाला सुरु. तु हे सोड ... पण मस्त फिरुन घे .. कारण हे विश्व माझे घर आहे असं आपली संस्कृति सांगते , आपलं घर हे विश्व आहे असं नाही... असो. बघ कसा भरकटतो मी, मी आपलं‌ साहित्यातंच सारं शोधतो... ही पुस्तकंच मला सारी भ्रमंती करवतात ... ते फिरवात दगडांच्या देशात , प्राण्यांच्या वस्त्यात अन् माणसांच्या कळपात देखील.. बरं बस्स झालं हे पुस्तकपुराण ... तु तुझं सांग... कसे जाताय हे दिवस... इथे मला एक एक दिवस एका युगासारखा वाटतोय... कटता कटत नाहीय. इतक्या दिवसात तु दिसली नाही , मनं आजारी पडलंय.. कसला आजार ....? तुझ्या प्रेमाचा.... आता लवकर भेटुन तुझे उपचार घ्यावेत त्याशिवाय बरं नाही वाटायचं.... मी येतोय ..... तु आराम कर .... ऊन्हाचं लय बाहेर फिरु नकोस.. ऊन्हाचा कडाका जास्त आहे.... तुला ती ऊन्हाची झळ जाणवेल लगेच पण माझ्या काळजातली कळ... ती जाणवेल तेंव्हा माझा ऊन्हाळा संपेल... माझ्या मनाची माती तुझ्या प्रेमाच्या पर्जन्याशिवाय तृप्त व्हायची नाही.... करशील ना तीला तृप्त.... ?
मी वाट पाहतोय..... त्या सरीची...

                                          तुझाच.........

असंच काहितरी.....~ भगतसिंह


असंच काहितरी


अंगाई - निंबोणीच्या झाडामागे

निंबोणीच्या झाडामागे
आता चंद्र लपत नाही ।
DJ ऐकणारे बाळ हे
आता अंगाई ऐकत नाही ।।

Chatting च्या नादात बाळ
चंद्राकडे पाहतंच नाही ।
ती Offline गेल्याशिवाय
बाळ काही झोपतंच नाही ।।

वेदना

वेदना असल्याची
मुळीच खंत नाही ।
असे थोडेच आहे
की वेदनेला अंत नाही ।।

पण वेदनेवरती बोलायलाही
हल्ली उसंत नाही .... ।
नको गाळुस आसवे तु
तुझी आसवे मज पसंत नाही ।।

Tuesday, April 17, 2018

माय अन् माती

माय अन् माती....

माझ्या माय अन् मातीचं
खरंच लय जवळचं नातं हाय
मायच्या घामाच्या धारा
माती पुसू लागते
अन् मातीवरल्या भेगा
मायच्या पायावर दिसू लागते .....

मायनं मातीला संग दिला म्हणुन
अन् मातीनं मायला रंग दिला म्हणुन
मला माय अन् मातीत,
दंग होता आले
अन् माझ्या कवितेला मायच्या तोंडचा ,
अभंग होता आले....

*🖊 शशिकांत मा. बाबर*
*( बोररांजणी , जि. जालना )*
संपर्क:- ९१३०६२०८३४

*www.shashichyamanatale.blogspot.com*

Monday, April 2, 2018

तुला बघताच

तुला बघताच
दाबले जातात कचाकच ब्रेक
माना वर करुन बघु लागतात
मग एका मागुन एक....
एक एक नजर कशी तु
झेल झेल झेलुन घेतेस
चेहर्यावरच्या स्कार्पला
आणखी वर नेतेस...
तु शांत पणे सहन करतेस
इथेच चुकतेस तु..
जगाला भिडण्यापेक्षा
स्वतःला जास्त सावरतेस तु
म्हणुनंच मग,
ही एक एक नजर
आग ओकु लागते ....
अन् बघणारी बांडुगुळं
आणखी सोकु लागते..
आणि हो , उद्या काही बोललीच तु
तर हि औलाद तुझ्यावरच
कुञ्यावाणी भोकु लागते..
ह्या अशा नजरांना
काय ? म्हणुन विचारायला शिक..
अन् वेळेवरती ह्यांच्या नरडीवरती
पाय द्यायला शिक...
ह्यांच्या नजरा लय
विखारी असतात बये
नाक्यानाक्यावर
मौक्यामौक्यावर
ह्या शोधत असतात हिरवळ...
यांची पाहुन ही वळवळ
माझ्या काळजात उडतेच कळ....
नाही म्हणजे मी फार जय वगैरे नाही
पण बाई ला बाईंच समजुन
पहायचं एवढं शिकलोय नक्कीच
म्हणुनंच लेखनीत संचारतं
दहा हत्तीचं बळ...
अन् कविता उभी करते
कागदावर चळवळ...
घेते दखल इथल्या कित्येक
नजरेने होणार्या अत्याचारांची
अन् खडसावते देखील...
वासनेच्या व्यापार्यांनो
नका एवढे हलकट होऊ
नका आपली नीतीमत्ता
अशी गहाण ठेऊ....
संस्कृतीच्या गप्पा मारणार्यांनो
का? कुठे जाते अशा वेळेस तुमची संस्कृति
कुठे जातो त्याग ,
कुठे हरवतो योग
का ? नुसता आठवतो भोग....

*# असंच काहितरी....*

*कवितेला नाव नाही ते द्या अथवा नका देऊ..*
*पण कवितेला प्रतिक्रिया नक्की द्या....*

*नाही म्हणजे तुमची मतं कवितेवर संस्कार करण्यासाठी तेवढीच महत्वाची आहेत...*

*🖊 शशि...( सत्य मांडताना..)*

Sunday, March 11, 2018

ओळी

*ओळी...-----------*
*--------------------*

कित्येकदा ओळी लिहुन परत खोडल्या जातात...
काही ओळी मनातल्या मनात जोडल्या जातात...
अन् बाहेर आल्या की
परत मोडल्या जातात...
मग उगाच ञागा होतो जिवाचा
अन् भरलेल्या ओळी मग
हळुच वार्यावर सोडल्या जातात.....
भरलेल्या ओळी त्या तुझे गीत गातात...
तुझ्यापर्यंत एखादी झुळुक घेऊन येईलंच त्या ओळी
तेंव्हा अलगद स्पर्शुन घे त्यांना
फार कवटाळुन बसु नकोस त्यांना...
अन् गालातल्या गालात
वाचुन हसुही नकोस त्यांना...
तुझ्या हसण्यानं त्या शहारुन जातील
रिकाम्या ओळीही मग भरुन जातील...
अन् लोक म्हणतील मी कविता केली तुझ्यावर..
पण खरंतर तुच गिरवलेस शब्द त्या कागदावर...
हे जगाला थोडंच माहीत आहे...
जग आनंदी होईल
भरलेल्या ओळी पाहुन..
अन् मी माझी भरलेली झोळी पाहुन....

*🖊शशि....( ओळी भरताना...)*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

Saturday, February 10, 2018

चुक

*चुक....*

आग लागत नाही लावतो आम्ही
आमच्याच हातानं आमचंच सरण रचतो आम्ही
जगणं महाग झालंय इथं
म्हणुन आता मरण मागतोय आम्ही ...

सरकार खरतर चुकतोच आम्ही
उगाच स्वतःला जाळतो आम्ही
अन् तुमच्या पाठी पळतो आम्ही
तुम्हाला खरच कुठं कळतो आम्ही
म्हणुनच तर आम्हाला छळता तुम्ही ...

कापसाला बेपारी घेत नाही
अन् ऊसाला कारखाना नेत नाही
अशावेळेस कापसासारखंच  बापाचं तोंड पांढरं पडतं
अन् जाळलेल्या उसाचं खुनुट चालताना नडतं...

घरात तुर आली की
बाजारात तुरीचे भाव पडतात
अन् आमचा हंगाम सरला की
मग भाव कसे वर वर  चढतात

कांद्याचा कायमच वांदा होऊन जातो
टमाट्याचाबी कधी लाल चिखल करावा लागतो
अन् माणसासाठीचा भाजीपाला
जनावरांच्या तोंडात भरावा लागतो
किमान तेवढं तरी बरं आहे
आमच्या दावणीला जनावरं तरी आहे...

ज्या वाटा शहराकडुन गावाकडे जातात
त्याच गावाकडुन शहराकडे पण जातात
हेच विसरतो आम्ही
तुमच्या चार शब्दांनी
लगेच घसरतो आम्ही
खरंच चुकतोच आम्ही....

म्हणुन आता चुक टाळणार आहे
शेताला सगळ्याबाजुनं कुंपण घालणार आहे
अन् तिथंच चौकीदारी करणार आहे
कारण कुंपणानं शेत खाऊ नये म्हणुन....

*शशि......*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

Tuesday, January 23, 2018

खिडकी

*खिडकी.....*

दमल्या भागल्या जिवाला या
असा मिळावा विसावा
थकुन बसावे खिडकीपाशी
अन् खिडकीतुन तुझाच चेहरा दिसावा ।।

खिडकीजवळ नुसतंच मग
उगाच बसुन रहावं
इवल्याश्या फटीमधुन तुझ्या
ओल्याचिंब केसांकडे पहावं ।।

तुझी ओलिचिंब पाठ
अन् पाहुन त्यावर तरळणारे पाणी
तुच सांग कशी येणार नाहीत
मग माझ्या तोंडी गाणी ।।

तु तोंड फिरवताच
मी लपुन जावं .....
का...?
कारण चोरुन पाहण्यात काय मजा असते
तुला कसं सांगावं ।।

तु केसांना पिळतेस तेंव्हा
एकडे काळजाला पिळ पडत जातो
अन् तुझ्या प्रेमाचा पुन्हा पुन्हा
रोग मला जडत जातो ...।।

*🖊 शशि....( तिला पाहताना....)*

Tuesday, January 16, 2018

बदल

*बदल......*


नाही कसं म्हणु मी
झालायच म्हणा बदल
आदर्शांना धरुन चालणारी
आता दिसत नाहीत दल ।।

बळ वाढायचं पुर्वी
कुणी म्हटलं की दल
हरवलय ते बळ सारं
आता दल म्हणजे फक्त दलदल ।।

ह्याच दलदलीत
रुतुन बसतात कित्येकांचे पाय
सारं बळ लावुनही
मग निघता निघत नाय ।।

पायाला हल्ली तशी
कमी बोचतात काटे
क्राँक्रीटच्या जंगलात
पसरतील कशी बोरी, बाभळीचे फाटे ।।

कातडी राहतायत सुरक्षित
पण काळजात आहेच की सल
मग कसं म्हणता येईल
झालाच नाही बदल ।।

सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा
अन् रातच्याला पडतो पाऊस
क्षणातच हल्ली इथे
ऋतु बदलतायत कुस ।।

माणसांचे संदर्भ अन् मातीचा गर्भ
बदलता येत नाही असं वाटायच पुर्वी
पण आता सारंच बदलुन टाकालय आम्ही
खरय जगण्याचा बदलला कल
की जगात अनिवार्यच ठरतो बदल....।।

*🖊शशि....( बदल बघताना )*
www.shashichyamanatale.blogspot.com

Friday, January 12, 2018

जिजाऊस पञ

विदर्भाची लेक , मराठवाड्याची सुन अन् पश्चिम महाराष्ट्राची रणरागिणी
आदर्श मातृत्व , कर्तृत्व , नेतृत्व
एक नव्हे तर दोन  नव्हे तर तीन तीन छाञपती घडवणार्या
अशा या राष्ट्रमाता , राजमाता ,
माँसाहेब जिजाऊंच्या चरणी विनम्र अभिवादन...

माँ साहेब
राजे पुन्हा येतील की नाही सांगता येणार नाही पण एकदा तुम्ही परत याच. नवा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे , नाहीतर इथे कित्येक राडा करणारी , धुरळा करणारी, मिञांची लाडकी, रोज रस्तोरस्ती घडतायत ,‌ फक्त उणीव आहे ती या मातीवर नाही तर यवनांच्या छातीवर नाच करत रयतेच्या मनावर राज्य करणार्या शिवरायांची ..... आणि ते आपल्याशिवाय शक्य होईल असं वाटत नाही . तुम्ही दांडपट्टा , तलवार बाजी , घोडेस्वारी , सारंच शिकुन घेतलं होतं , तेंव्हा तु मुलगी आहेस जिजे तु हे शिकुन काय करणार ? असा प्रश्न नाही उभा केला आपल्या पिताजींनी . इथे सारं उलटं होतंय आता. मुलींना सातच्या आत घरात, अन् इथे नावासमोर राजे लावुन फिरणारे करतायत राडा अगदी मध्यराञीही. 
माँसाहेब, आपण महाराष्ट्राच्या छाताडातली अंधश्रद्धेची पहार उखडुन फेकली होतीत, पण अंधश्रद्धा अजुनही डोक्यातुन जात नाहीय आमच्या. " शिवबा , जर तुम्हाला काही झालंच तर ही जिजाऊ समजेल की आपण निपुञिक होतो म्हणुन " , असं म्हणत शञुशी दोन हात करायला पाठवण्याचं सामर्थ्य म्हणजे धैर्याचा सर्वोच्च कळसच की. आता आता काल परवा दंगल झाली , यांनी त्यांना मारले म्हणे, पण दोनशे वर्षानंतरही आपण त्याच गोष्टींसाठी आपापसात लढलो यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. तेंव्हा वाटलं महाराष्ट्र तुमचे संस्कार विसरालय बहुतेक. " मरानांती वैरानी " म्हणत अफजलखानाची कबर बांधायला लावली होती तुम्ही हे इथल्या आताच्या मावळ्यांना केंव्हा कळणार कुणास ठाऊक ? तुम्ही मावळ्यांना जातीसाठी नाहीतर मातीसाठी लढायला लावलंत पण इथे आम्ही बर्याचदा जातीसाठी माती खात असतो हल्ली. मागच्या चारशे वर्षात बरंच काही बदललय आता, आधी लग्न कोंढाण्याचं  , म्हणणारा तानाजी आता दिसत नाही , घोडखिंडीत शञुला अडवुन , " राजे , तुम्ही जा . लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ", म्हणत आपल्या रक्ताने खिंड पावन करणारा बाजी आता भेटत नाही. "माझ्या शिवबाचं स्वराज्य म्हणजे इथल्या रयतेचं स्वराज्य ", असं म्हणायचात तुम्ही पण आता तीच रयत लोकशाहीच्या मंदिरासमोर लटकुन संपवतेय स्वतःला , तेंव्हा स्वराज्य मिळालं होतं हे खरं पण ते कुठपर्यंत राहिल याची शाश्वती देता येणार नाही. काय तर म्हणे आम्ही लोकशाही स्विकारलीय पण लोकशाहीचा नेमका अर्थ तरी काय ? हा प्रश्न अर्ध्याअधिक भारताला अजुन उमजलाच नाही, असो. आणि हो तसा विकासही झालाय ( वेडा ? ) बराच. मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला होता , आता तर अगदी चंद्रावर , मंगळावरही तिरंगा रोवलाय आम्ही, अजुनही आमच्या नशिबी चांदणं आलंच नाही अन् आपच्या राशीतला मंगळ अजुनही टंगळमंगळ करत का होईना आडवा येतोच आम्हाला..असो. बर्याच गोष्टी आहेत. सारं काही मीच सांगणं बरं वाटणार नाही , ( नाहीतर काही तरी सस्पेंस हवा की नाही ? ) तुम्ही आल्यावर बघालंच की. तेंव्हा इथल्या भरकटलेल्या मावळ्यांना पुन्हा एकदा  सह्याद्रीचा वारसा सांगण्यासाठी, अन् इथे नवा शिवबा घडवण्यासाठी याच ..... आम्ही आपली वाट बघतोय....

......... आपलेच वारसदार.......

www.shashichyamanatale.blogspot.com