Sunday, December 31, 2023

प्रिय 2023


 प्रिय 2023,


साल बदललं तसं हाल बदलले की मग सरत्या सालाचं कौतुकही राहतं अन् येत्या सालाचं अप्रुपही वाटतं....तसं तु येण्याआधीच माझे हाल तर बदलले होतेच पण तु आलास अन् माझा काळच बदलुन टाकलास....म्हणुन म्हटलं या शेवटच्या संध्याकाळी एक आभाराचं पञ तुलाच का लिहु नये ? म्हणुन हा प्रपंच....तर हे असं पञास कारण पञास कारण न म्हणताच मी तुला सांगुन टाकलं बघ....असु दे. तर सालाप्रमाणे तुही आलास ठरलेल्या वेळीच पण तु जणु काही खुप काही माझ्यासाठी आपल्या मुठीत घेऊनच आला होतास, अन् जशी जशी वेळ आली तशी तशी मुठ उघडत गेलास....झाकली सव्वालाखाची असते खरी, पण उघडली की लाखमोलाची पण ठरु शकते मुठ हेच तु मला ह्या वर्षभरात दाखवुन दिलं, त्यासाठी खरंतर तुझे आभार....तुझ्या येण्याची चाहुल लागली तेंव्हाच मला दिल्लीचं बोलावणं आलं होतं, दिल्ली बहोत दुर है असं म्हणतात खरं, पण खरच दिल्ली तितकीही दुर नसते म्हणा याची प्रचिती तु दिलीस मला...तुझ्या पहिल्याच महिन्यात अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने का होईना मला दिल्ली जाण्याचं भाग्य लाभलं....भाग्यच म्हणावं लागल बाबा, नाहीतर पुण्या मुंबई ला जरी कुणी बोलावलं तर आमचं कुठं नशीब इतकं असं म्हणावं लागायचंच की आधी...तर असं हे भाग्य लाभलं...त्यात अजुन भर म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच विमानात बसुन प्रवास करता आला...घरावरुन जाणारं विमान दिसेनासं होईस्तोवर बघणारे आम्ही विमानप्रवास हे आमच्यासाठी अप्रुपच की रे...विमानात बसलो...मग दिल्ली अन् तिथुन अजुन पुढं मसुरी जाणं झालं...हिमालय फक्त पुस्तकात पाहिलेला, ह्या सालात तो प्रत्यक्ष देखील पाहता आला....मसुरीवरुन परत येताना ऋषिकेश, हरिद्वार हे पविञ तिर्थक्षेञही पाहण्यात आली...गंगा मैयाच्या पाण्यात हात घालता आला...सगळे पाप धुवुन टाकणारी गंगा....गंगेत डुबकी मारणारे बरेच पाहिले, पण शरीर धुवुन पापं कशी धुवुन जातात कुणास ठावुक ? पाप तर मनात असतं ना ? असो...बरंच काही पाहता, जगता आलं जे येत्या काळात कायम स्मरणात राहील...त्याबद्दलही तुझे आभार....त्यानंतर जानेवारीच्या शेवटाला हा सगळा दिल्ली व मसुरी दौरा आटोपुन प्रशिक्षणासाठी नागपुर गाठलं...दोन महिने नागुपुरात गेले, ह्या प्रशिक्षण काळात महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त डाॅ. प्रकाश आमटे व डाॅ. मंदाकिनी आमटे ह्या आमटे दाम्पत्यास भेटता आले, बाबांनी फुलवलेलं आनंदवन बघता आलं, बरेच अविस्मरणीय अनुभव देणारा हा सर्व काळ होता....मागच्या प्रशिक्षणादरम्यानच पुढचा निकाल लागला, क्लास 2 वरुन क्लास 1 झालो....नव्या पदाच्या ओळखीसह जुन्या पदाच्या जिल्हा संलग्नतेसाठी पुनः श्च रुजु झालो...बुलढाण्यात आलो...एप्रिल ते जुन तीन महिने जिल्हा संलग्नते अंतर्गत विविध कार्यालयीन संलग्नता पार पडल्या..10 जुलै रोजी जळगाव-जामोद तहसिल कार्यालयात रुजु झालो....तेथील अनुभव देखील प्रशासकीय दृष्ट्या समृद्ध करणारा होता...भटकंती ते जबाबदारी असा प्रवास तुझ्या सुरवातीच्या नऊ महिन्यात झाला.... खूप काही शिकवलंस तू.... त्यासाठीही तुझे आभार...3 ऑक्टोबर ला नवीन पदी विराजमान झालो.... परिविक्षाधीन काळ असल्याने ह्या ही काळात शिकतोच आहे...प्रत्येक ठिकाणी अतिशय जबाबदार अन् अतिशय चांगली माणसं भेटली..तु माझ्या मोठ्या स्थित्यंतराचा साक्षीदार म्हणुन तुझे आभार...तु दिलेल्या आठवणी अन् शिकवणी दोन्ही उराशी ठेवुन येत्या सालाचं स्वागत करतोय... मावळतीच्या ह्या सुर्यासारखा तु ही लपुन बसणार आहेस, पण पुन्हा न उगवण्यासाठी ...म्हणुन हे माझं पञ सांभाळुन ठेव...तुझ्यासारखाच पुन्हा न उगवण्यासाठी मी ही जेंव्हा मावळेल तेंव्हा नक्कीच तुला भेटेल अन् ह्याचं उत्तर मागेल...तोपर्यंत वाट पहा....पुनःश्च तुझे आभार....आभार ...आभार...

Thursday, November 30, 2023

Book Review : स्वतःला स्वतःविरुद्ध उभं‌ करताना (विशाखा विश्वनाथ)

 

कविता म्हणजे फक्त यमकांची जुळवाजुळव इतकंच नसते मुळी, कविता म्हणजे भावनांचा उस्फूर्त उद्रेक असतो ...मग त्यासाठी शब्दांचा यमक जुळेलच असे नाही....तरुण पिढीच्या मनातला कोलाहल हल्ली कवितेच्या माध्यमातुन कागदावर येतो आहे..अन् त्या कोलाहलाला बाहेर आणताना मुक्तछंद हे सर्वात जवळचे माध्यम वापरले जाते... अशाच प्रकारे मुक्तछंदातील कवितांचा संग्रह म्हणजे विशाखा विश्वनाथ यांचा २०२३ सालचा साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कारप्राप्त 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना' हा कवितासंग्रह...संग्रहाच्या प्रस्तावनेतच कवयिञीने सांगितलय की धडपडण्याच्या प्रवासात पुन्हा पुन्हा उठून उभं राहता आलं ते कवितेमुळे ! म्हणुनच संग्रहाचं नाव स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना ठेवलय....संग्रहातील सर्व कविता ह्या मुक्तछंदातील आहेत...त्या शहरयार, बाहुल्यांची देवी, दूरचा पल्ला गाठताना, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना आणि प्रिय... या पाच गटात विभागलेल्या आहेत...

'शहरयार' गटातील पहिल्या कविते आधीच कवयिञी सांगते,
"शहराच्या गर्भाशयातलं पाणी संपत आलं
तेंव्हाचा जन्म असलेले आपण
साहजिकच आहे
ओल शोधत फिरावंच लागेल आपल्याला"
आपल्या पिढीचं अगदी समर्पक वर्णन यात केलय...शहरात राहणारा तरुण शहराकडं ज्या भुमिकेतून पाहतो, त्या भुमिकेतुन केलेल्या कवितांचा ह्या भागात समावेश आहे...शहरात राहणारा बॅचलर, बेरोजगार युवक असो वा शहरातली बाई या सगळ्यांच्या मनातला कोलाहल शब्दबद्ध करुन ह्या कवितांची निर्मिती झालेली आहे याची प्रचिती शब्दागणिक येत राहते...'बाहुल्यांची देवी' ह्या भागात लहानपणीच्या बाहुल्यांची देवी चा आधार घेऊन मुलींच्या, स्ञियांच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम या भागातील कवितेतुन केलं गेलंय...या भागातील एका कवितेत कवियित्री म्हणते,
"उगाळून उगाळून गंधगोळी संपते
तसंच दुःखही सरुन जाईल
विरुन जाईल या वेड्या आशेने
गंधगोळी उगाळत राहावी
तशी दुःखं उगाळत राहतात माणसं"
मानवी स्वभावाचं हे वर्णन अतिशय योग्य तर आहेच पण हे वाचुन आपण ही असंच करत असु तर आपणही माणुस आहोत याची जाणिव ओली होते...दुःखं गंधगोळी नाही हे कळण्याइतकी हुशारी जवळ असली तरी उगाळत न बसण्याइतकं शहाणपण माञ नसतंच आपल्याकडे किंवा असलं तरी त्याचा वापर करता येत नसावा म्हणुनच आपणही उगाळत बसतोच दुःख.....माणसाच्या दुःखाचं वर्णन करण्यासोबत बाईच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम ही कविता करते..."बाईला पाठ असते, भाकरीलाही पाठ असते" हे सांगताना कडक भाकरी करणारी बाई मऊ असते.. मऊच राहते..हेही कवियित्री आवर्जुन सांगते...

दूरचा पल्ला गाठताना ह्या भागात मनातला कोलाहल आहे, मनाची अस्वस्थतता आहे अन् स्वतः चा स्वतःशी संवाद आहे...'स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना' ह्या भागात कविता अधिक वैश्विक होत जाते...कविता आपल्याला अंतर्मुख करते...वाचताना हे आपल्याच भावनांचं शाब्दिक रुप आहे असंही वाटत राहतं...ह्या भागाच्या सुरवातीलाच कवयित्री सांगते की रक्तातल्या शांततेची ओढ मनाला पसायदानापर्यंत नेऊन सोडते..अशी रक्तातली शांततेची ओढ प्रत्येकाच्या आता असते, म्हणुन ही कविता देखील प्रत्येकाची आहे...आतल्या कोलाहलाला ज्याला ऐकता येतं, ज्याला आरशाशिवाय स्वतःला पाहता येतं अन् ज्याला संदर्भाशिवाय घटनांची वैश्विकता समजते अशा प्रत्येकाला ही कविता आपली वाटते...या भागात एके ठिकाणी कवयिञी म्हणते,
"ओटीपोटातली वादळं सोसत धावत राहणाऱ्या बायका
आणि आतली खदखद सांभाळत
सतत फिरत राहणारी ही पृथ्वी
सृजनाचा विस्तार एवढा वैश्विक असतो"
पृथ्वी अन् बाई यांच्यातलं साम्य अधोरेखित करताना बाई म्हणजे सृजन हे वैश्विक सत्य आपल्या समोर मांडलेले आहे..पृथ्वीवर भुकंप होतात.. आतली खदखद बाहेर येते..तशीच बाईची खदखद देखील बाहेर आली पाहिजे..अगदी प्राचीन काळापासुन आधुनिक काळापर्यंत बाई कायम सहन करत आली...तिच्या सहनशिलतेमुळे तिला देवत्व प्रदान केलं‌ गेलं पण तिचं माणुस असणं स्विकारायचं असेल तर तिला तिच्या आतली खदखद बाहेर काढायला मदत करायलाच हवी..अन् हेच काम कविता करत राहते... कायम...शेवटचा भाग आहे प्रिय....यातल्या कविता म्हणजे जणू पञव्यवहारच... कधी बाहेरच्याशी केलेला तर कधी स्वतःशीच....एखाद्या तरुणीने आपल्या मिञ मैञिणीशी संवाद करावा इतक्याच सहज रचलेल्या ह्या रचना...ह्या संग्रहातील सर्वच कविता वाचनीय तर आहेतच पण अंतर्मुख करायला लावणाऱ्या अन् मुख्य म्हणजे आपल्या पिढीचं गाणं गाणाऱ्या आहेत त्यामुळे त्या अधिक जवळच्या वाटतात... विशेषतः तरुण पिढीने अवश्य वाचाव्यात अशा ह्या कविता....आपण नक्की वाचाल अशी अपेक्षा... शेवटी, या संग्रहाच्या मलपृष्ठावर प्रार्थनेचं महत्व अगदी समर्पक शब्दात व्यक्त केलय, त्या ओळी माझ्या मनात अगदी घर करुन बसल्यात...तेवढ्या इथे उद्धृत करतो अन् थांबतो....
"प्रतारणांना उत्तर म्हणून
वेदनांवर मलम म्हणुन नसते प्रार्थना
स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना
पाठीशी असावं कुणी
म्हणून म्हणायची असते प्रार्थना"


#असंच_काहितरी

#Book_Review

Wednesday, November 1, 2023

Book Review : वन पेज स्टोरी (डाॅ. विक्रम लोखंडे)


बुलेट ट्रेनच्या गतिने धावणारे आयुष्य, दोन मिनिटात मॅगिसारखं सगळं काही क्षणात हवं हवं वाटणारी अन् सगळं कसं शाॅर्टकट मध्ये मागणारी पिढी असं आपल्या पिढीचं वर्णन करता येऊ शकेल...अशा या पिढीला जीवनानुभूती देतील अशा छोट्या छोट्या अन् काही मिनीटात चटकन पटकन वाचुन होतील अशा साधारण प्रत्येकी एक पानभर असणाऱ्या एकुण 44 कथांचा संग्रह म्हणजे डाॅ. विक्रम लोखंडे लिखित 'वन पेज स्टोरी'. कथा इतक्या मार्मिक व समर्पक आहेत की मोठ मोठ्या कादंबरीत जे सांगता येणार नाही असं माणसाला अंतर्मुख करणारं जीवनाचं अमोघ तत्वज्ञान या एका एका पानात सामावलेलं आहे...पानभर असणारी प्रत्येक कथा अगदी दोन मिनीटात वाचुन‌ होते, पण पुढचे कित्येक मिनिट मनात रेंगाळत राहते..म्हणुनच या कथा फक्त वाचुन संपवायच्या नाहीत.... तसं करायला गेलं तर तास दोन तासात पुर्ण पुस्तक वाचुन होईल...यातील प्रत्येक कथा वाचल्यावर कित्येक भावतरंग मनात उठतात, त्यावर विचार करायला हवा...अन् नंतरच पुढच्या कथेकडे जायला हवं...थोडक्यात ह्यातील कथा ह्या लिमलेटच्या गोळीसारख्या आहेत, त्या गिळुन घेतल्या तर लवकर संपतील, पण त्याची चव अनुभवता यायची नाही...त्यासाठी या कथा वाचायच्या, मनाच्या अंतरंगात त्यावर घुसळण होऊ द्यायची..कथेतला विचार मनात जपुन ठेवायचा...असे केल्यास त्या नक्कीच अविस्मरणीय ठरतील...लेखक डाॅक्टर असल्याने बऱ्याच कथेतील संदर्भ तसे आहेत, माञ इतरही आयुष्याशी, त्यातल्या माणसांशी, माणसांच्या आपापसातील नात्यांशी निगडीत कथा यात आहेत... कथा साध्या, सोप्या आहेतच सोबत त्या कधीकधी विस्मयकारकही वाटतात... कथेच्या सुरवातीला आपल्याला अपेक्षित असलेला शेवट शेवटी असेलच असे नाही...काही कथेच्या सुरवातीला एखाद्या पाञाबाबत आपल्याला कणव वाटु लागते तर शेवटाकडे गेल्यावर आपण चुकलो असे वाटुन जाते...माञ या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लेखकाने प्रत्येक कथेत मानवी नात्यांवर अचुकपणे भाष्य केले आहे...आपल्या वाट्याला येणाऱ्या सुखदुःखाच्या ह्या कथा आहेत...आपण नक्की कसं जगावं हे सांगणाऱ्या, कधी कुठे कुणाशी कसं वागावं हे सांगणाऱ्या ह्या चतुर‌ कथा (खरंतर सामान्य माणसाच्या आयुष्यातले प्रसंगच म्हणा ना) नक्कीच वाचनीय आहेत....

#असंच_काहितरी
#Book_Review

Friday, October 20, 2023

काटा


"पाण्याच्या लाटा होतात
 रस्त्याच्या वाटा होतात
 फुलाच्या आठवणीही
 कधी कधी काटा होतात "


 #असंच_काहितरी

Wednesday, October 18, 2023

Book Review : काळेकरडे स्ट्रोक्स (प्रणव सखदेव)


 

महाविद्यालयीन जीवन म्हणजे आयुष्यातले सोनेरी दिवस पण ह्याच सोनेरी दिवसांना काळी करडी किनार लाभली तर आयुष्यात एक उदासीच भरुन राहील हे निश्चितच...अशीच उदासी घेऊन जगणाऱ्या.... आयुष्यात सर्व छान चालु आहे असं वाटत असताना वेळोवेळी ज्याचं आयुष्य वळणं घेत जातं अशा व्यक्तीची...तिच्या आयुष्यातल्या घटना, प्रसंग अन् व्यक्तींची अगदी खुलेपणाने मांडणी करणारे अंतरंगातील बोल्ड  काळेकरडे स्ट्रोक्स म्हणजे प्रणव सखदेव यांची साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी....


ही कथा आहे समिरची...त्याच्या जवळचे मिञ असलेल्या चैतन्य, सानिका, सलोनीची...हे तिघे समिरच्या आयुष्यात कसे आले अन् गेले याची कथा अन् व्यथा ह्यात आहे...चैतन्यचं जाणं हा अपघात, सानिकाचं जाणं हे आश्चर्य तर सलोनीचं जाणं हे अटळ....या‌ सगळ्या उलथापालथी होत जाताना मनातल्या कोलाहलाला शमवण्यासाठी व्यसनाची साथ ...अन् आयुष्याच्या पावलो पावली आवश्यक तिथे आवश्यक ते मोलाचं जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारी समिरला भेटणारी माणसं...ही कथा समिरची आहेच, पण यासोबतच दादु काकाची आहे..हिमालयातल्या वयस्कर जोडप्याची आहे...समिरला वेळोवेळी काय करावं अन् काय टाळावं याचं खुल्लमखुल्ला ग्यान देणाऱ्या अरुणची आहे....अशा कथेत बारीक सारीक उपकथा आहेतच..अन् ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्याला थोड्याफार फरकाने का होईना रिलेट होत जातात...अजुन एक जमेची बाजु म्हणजे कथेची भाषा ही बऱ्याच ठिकाणी आपल्या आजच्या पिढीची अशी मिंग्लिश म्हणजे मराठी-इंग्रजी मिक्स आहे..काहींना ही एका बिघडलेल्या मुलाची कथाही वाटु शकेल, पण ही बिघडलेल्या नाही तर घडलेल्या मुलाची अत्यंत खुलेपणाने मांडलेली व्यथा आहे हेच जास्त वाटत राहते...आयुष्यात काय करावं, यासोबतच काय करु नये या दोन्हींचा परामर्श घेणारी ही आपल्या पिढीची अन् आपल्या पिढीने लिहीलेली कादंबरी एकवेळ अवश्य वाचायला हवी...


#असंच_काहितरी
#Book_Review

Monday, October 2, 2023

माझी महसुल डायरी....



तहसिलदार म्हणवत मिरवणं...जिल्हा संलग्नतेदरम्यान विविध कार्यालयात गेलं की नायब तहसिलदार आलोय, असं सांगणं...सबसे भारी, दंडाधिकारी म्हणणं असो नाहीतर महसुल प्रशासन असं काही नसतं, प्रशासन म्हणजेच महसुल प्रशासन असं अभिमानानं सांगणं असो....मागच्या वर्षभरात महसुल विभागात परिविक्षाधिन म्हणुन का होईना पण बरंच काही बघता आलं, शिकता आलं याचा आनंद आहे...प्रशासनात आपल्याला मिळणारी प्रतिष्ठा ही आपल्यावरची जबाबदारी अधोरेखीत करत असते, याची प्रकर्षाने जाणिव झाली... जिल्हा संलग्नतेमध्ये इतर कार्यालयासही भेटी व्हायच्या त्यामुळे शासनाच्या विविध विभागाच्या कामकाजाबद्दल व त्यांचा महसुल विभागाशी असणारा संबंध याची माहीती मिळायची...यातुन महसुल विभागाकडे समन्वयाची जबाबदारी जरा जास्तच आहे...शासनाचा कांकणभर अधिक विश्वास अजुनही महसुल विभागावरच आहे, हे लक्षात आलं...पण ह्या विविध कार्यालयांच्या दोन चार दिवसांच्या संलग्नतेपेक्षा खरा महत्वाचा टप्पा होता, तहसिल कार्यालयात एक स्तर खाली काम करणं...जळगाव-जामोद सारख्या दुर्गम भागात काम करावं लागणार म्हणुन सुरवातीला नाराजी होती, पण प्रशासनात आव्हानं सतत असणार..पाहिजे तिथं, पाहिजे तसं काम करायला मिळणं हे नाटकात शक्य होईलही, पण जीवनात बहुधा शक्यच नसतं...कारण जीवन हे नाटक असलं तरी ह्या नाटकाच्या दिग्दर्शकाशी आपण अनभिज्ञ असतो...तो देईल ती भुमिका म्हणेल त्या ठिकाणी आपल्याला वठवावी लागते...म्हणुनच मिळालेल्या ठिकाणाची फार तक्रार न करता जळगाव-जामोद येथे रुजु झालो...

सुदैवाने तहसिलदार मॅडम ला नवीन पदावर निवड झाल्याचं सांगितल्याने महसुलचा पाहुणा‌ म्हणुनच तिथे वागणुक मिळाली...आठवड्यात एक दोन वेळेस जाऊन भेटलो तरी पुरे, असा अलिखित करार मॅडम सोबत मी करवुन घेतला...पण पहिल्या आठवड्यानंतर लगेच तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं अन् ह्या अशा नैसर्गिक आपत्तीवेळी सगळे करार आपोआप तुटतच असतात...तसा आमचाही करार तुटला..अन् मग माञ सलग आठवडाभर कार्यालयात उपस्थित रहावं लागलं..या दरम्यान पंचनामा काय प्रकार असतो याचा अनुभव आला ...स्वतः जाऊन पंचनामा करावा लागला...लोकांच्या ढिगभर अपेक्षा अन् आपल्याकडे असणारे कणभर अधिकार यामुळे कित्येकदा फक्त हळहळ करण्यापलिकडे आपल्याकडे पर्याय राहत नाही, याचाही अनुभव आला...रास्ता रोको काय असतो ? मोर्चा, उपोषण काय असतं ? याचाही अनुभव आला...अशावेळी लोकांशी काय बोलावं ? कसं लोकांना समजुन सांगावं हे मॅडम सोबत राहुन शिकता आलं...नैसर्गिक आपत्तीप्रसंगी अवेळी काम करणं असो किंवा इतर विभागांशी समन्वय साधुन तातडीने कामं करणं असो...कार्यलयातील अधिक काम करणारे कर्मचारी अन् टाळाटाळ करणारे कर्मचारी दोन्ही इथे पाहायला मिळाले..ह्यातल्या काहींकडुन काय करावं हे शिकता आलं तर काहींकडुन काय करु नये हे शिकता आलं...आपल्याकडे प्रश्न घेऊन आलेल्या लोकांना कशी उत्तरं द्यावीत, कुठे काय बोलावं अन् काय टाळावं याचाही धडा इथे काम करताना मिळाला...लोकांना त्यांच्या प्रश्नाची योग्य उत्तरं दिली तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधानही बघता आलं...

रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक हे महसुल विभागासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे...रेती वाहतुक करणारे वाहन पकडण्यासाठी गेल्यानंतर ते हाती न लागल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशन ला जाण्याचाही योग आला..एफ आर आय करण्याआधी आपापसात मिटवुन घ्यायला हवं असं सांगणारे भेटले, गुन्हा नोंदवु नये म्हणुन टाळाटाळ करणारे पण दिसले...अन् तरीही महसुल वर्षाच्या शेवटच्या दिवशी राञी 12 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन ला थांबुन का होईना एकदाचा एफ आर आय करुनच बाहेर पडायचा निर्धारही पुर्ण करता आला...या सगळ्या साधारण, असाधारण प्रकरणानंतर नव्याने महसुल विभागाला मिळालेली जबाबदारी म्हणजे शासन आपल्या दारी कार्यक्रम..या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक म्हणुन जबाबदारी सांभाळावी लागली..त्यासाठी संबंधीत नोडल व सहायक नोडल अधिकारी म्हणुन नेमलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांशी व महा ई सेवा केंद्रचालकांशी तसेच बस डेपोशी समन्वय साधुन कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना घेऊन जाण्याची व परत आणण्याची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडता आली...अर्थात या कामात सहकाऱ्यांचीच भूमिका महत्वाची होती, त्यांच्याशिवाय ते शक्यच नव्हते...विशेषतः आमचे सर्व नियमित नायब तहसिलदार यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाची फार मदत झाली...ह्या सगळ्या सोबतच अनेक बारीकसारीक अनुभव हाती‌ लागले...प्रशासनातल्या संधी, आव्हानं, अधिकार अन् मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी कमीजास्त प्रमाणात लक्षात आल्या...

वर्षभरात मिळालेल्या प्रेम, आदर, सन्मान अन् कौतुकासाठी महसुल विभागाचा कायम ऋणी असेल...प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक व्यक्तीने आपुलकीने प्रेमाने सर्व समजुन सांगितले, समजुन घेतले...त्यां सर्वांचा शतशः आभारी आहे...सर्वांचा नामोल्लेख इथे केला नसला तरी सर्वांच्या आठवणी स्मृतीपटलावर कायमच्या कोरल्या गेल्यात..हे सगळे अनुभव खरंतर अधिकारी होणं म्हणजे काय असतं ? याचं प्रात्यक्षिक होतं...वर्गात शिकलेल्या धड्यांपेक्षा वर्गाबाहेर मिळणारे धडेच आपल्याला अधिक शहाणे, अधिक समृद्ध बनवत असतात...मागच्या वर्षभरातील महसुल विभागातील अशा असंख्य अनुभवांनी कित्येक धडे शिकवले..कायद्याच्या अभ्यासापेक्षा माणसांचा अभ्यास या दरम्यान अधिक करता आला...माणसांचं व्यवस्थापन कसं करावं...कुणाला कसं सांभाळावं, याचे धडे मिळत गेले...माञ हे सगळं शिकुन त्याचा प्रत्यक्ष आपल्या अधिकारात आपल्या कार्यालयात वापर करण्याची वेळ येण्याआधीच महसुल विभागाचा निरोप घेण्याची वेळ आलीये...कागदोपञी उद्या सकाळी (शासकीय भाषेत मध्यान्ह पुर्व) महसुल विभागातून कार्यमुक्त होईल अन् नवीन विभागात नवीन पदावर रुजु होईल...महसुल विभागाने व बुलढाण्याने आतापर्यंत दिलेले अनुभव पुढच्या प्रवासासाठी निश्चितच दिशादर्शक ठरतील...तसं बघायला गेलं तर पदाचं अन् विभागाचं नाव तेवढं बदललय, बाकी गाव अजुनही तेच आहे..तेच बुलढाणा, तेच जिल्हाधिकारी कार्यालय, अन् तोच मी...अर्थात् दंडाधिकारी नव्हे तर मुख्याधिकारी पदाचा झबला घालुन तयार.....नव्या प्रवासासाठी... एकच ध्यास, नगरविकास म्हणत....


#असंच_काहितरी #नायब_तहसिलदार #मुख्याधिकारी_गट-अ

Tuesday, August 15, 2023

प्रिय विशाल... छे.. मनोहर


युट्युबवरुन ज्याचा‌ परिचय झाला असा गझलकार..जो युट्युबवरुनच थेट ह्रदयाच्या ट्युब पर्यंत पोहचलेला...नंतर योगायोगाने प्रत्यक्ष भेट झालेला...अन् पहिल्या भेटीनंतर लगेच आपलासा झालेला...त्याच्या गझले इतकाच त्याचा स्वभावही दर्जेदार आहे याची जाणिव झाली अन् ओळख मैञीत परिवर्तित झाली....तो भेटला अन् बुलढाण्यात गझलेचा ढाण्या वाघ भेटला असंच वाटलं....गझल, कविता यासोबतच त्याच्यामुळे बुलढाणा रमणीय वाटला...त्याच्या गझलेने काळजात घर केले होतेच...त्याच्या भेटीने बुलढाणा देखील घरच्यासारखेच झाले....त्याच्या भेटीमुळे पुढे दिग्गज साहित्यकार, कलाकार यांच्याशी परिचय व्हायला सुरवात झाली...मिञ वनव्यात गारव्यासारखा सांगणारे अनंत राऊत यांना फक्त प्रत्यक्ष ऐकणेच नाही तर त्यांच्या सोबत फिरता आले...कुठे फिरायला जाणे असो, नाहितर कुणाला भेटायला जाणे असो....सर्वच ठिकाणी कायम सारथ्य करायला तयार असणारा कृष्ण....'एक राणी गेल्याने डाव संपत नाही', असं म्हणत हरलेल्या मनाला उभारी देणारी त्याची गझल त्याच्या आयुष्याला शोभा आणतेच आहे...पण डावही संपु नये अन् राणीही जाऊ नये, अन् हा आमचा राजा कायम असाच सम्राट बनुन रहावा...ह्याच मनःपुर्वक शुभेच्छा...अशा ह्या मिञ, तत्वज्ञ अन् वाटाड्यास अर्थात ह्या मितवास, गझलसम्राटास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा....
🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐

विशालच्या काही निवडक माझ्या आवडीच्या ओळी :

" लायक आहे मनगट माझे अजुन देवा
  मंदिरात मी म्हणून काही मागत नाही "
----------------
" पेरला गेलाय माझा जन्म येथे
  यामुळे मी वावरावर शेर लिहितो "
-----------------
"कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी
सुर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी

कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर
जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी "
-----------------
"दोघांमधल्या दुराव्यास या
कारण ठरली केवळ भाषा
मज ओठांची जमली नाही
तुज डोळ्यांची कळली नाही"
-------------------

#मनोहर
#असंच_काहितरी

प्रिय पुनम.. छे ..पुनव


स्वातंञ्यदिनासारख्या पविञ दिवशी जन्मास आलेल्या....'यशोमती'च्या सर्वेसर्वा.....मुलाखतीची पण तयारी करायची असते अन् ती किती जास्त करायची असते हे ज्यांच्याकडे पाहुन कळलं त्या ग्रुपच्या संस्थापक-संचालक....शिक्षकाची मुलगी असल्याने शिकवणे हा गुण अगदी रक्तातच असलेल्या...शिकवण्यासोबतच शिकण्यावरही तितकाच भर असणाऱ्या .... महाविद्यालयीन जीवनापासुनच वाचण व लिखाणाची आवड असणाऱ्या .... वाचण, लिखाण याच्या जोडीला आवाजही तितकाच दमदार लाभलेल्या... काहींचा आवाज ऐकुन झोप लागते तर काहींचा आवाज ऐकुन जाग येते, यापैकी दुसऱ्या गटात बसणाऱ्या अन् कित्येक स्पर्धा-परिक्षार्थींना आपल्या आयुष्याच्या डायरीतल्या एका एका पानातुन जागं करणाऱ्या .... अभियांञिकी शिकल्यावर समाजशास्ञाचे धडे घेऊन समाजासाठी चार गोष्टी करण्याची संधी देणाऱ्या क्षेञात म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा धाडसी निर्णय घेऊन यशस्वीपणे निर्णयास योग्य ठरवणाऱ्या .... पहिल्या टप्प्यात मंञालयात कक्ष अधिकारी तर दुसऱ्या टप्प्यात थेट प्रांताधिकारी/उपजिल्हाधिकारी पदी मजल मारणाऱ्या .... मिळेल ते काम करायला तयार आहे असं म्हणत आपल्याला हवं तेच काम मिळवण्यात पटाईत असणाऱ्या .... महसुल विभागात येण्याआधीच महसुल विभागात कक्ष अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव घेणाऱ्या .... नंतर जीवाचं महसुल करुन घेण्याआधी जीवाची मुंबई करुन घेणाऱ्या ... ट्रेनिंगच्या परिक्षांचाही एमपीएससीच्या अभ्यासासारखा अभ्यास करणाऱ्या .... फार जास्त कुठे फिरायला न जाता निरंतर अवांतर वाचणावरच लक्ष असणाऱ्या.... कदम कदम जपुन टाकायला हवा, असा विचार करत यशाच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या.....सगळं असुनही काहीच नाही असं सांगण्यात पारंगत असणाऱ्या.... नाशिकची कन्या अन् अहिराणीवर विशेष प्रेम असणाऱ्या .... 'महसुल प्रशासन असं काही नसतं, प्रशासन म्हणजेच महसुल' अन् 'सबसे भारी दंडाधिकारी', या अशा माझ्या विधानांशी शतप्रतिशत सहमत असणाऱ्या .... माझ्या शब्दांना सतत प्रोत्साहीत करणाऱ्या.... एमपीएससी विश्वातील कित्येकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या .... #DC_Punam मॅडम, आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.... 🎂🎂🎂🎂💐💐💐💐


पुनवेच्या शलाका निरंतर चमकत राहो....महसुल प्रशासनात तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करता येवोत ह्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.... प्रांत होणं हा अंत नाही तर सुरवात आहे, एका प्रशांत महासागरासमान पसरलेल्या प्रशासकीय कारकीर्दीची....ह्या प्रवासाठीही खुप खुप शुभेच्छा......💐💐💐💐


#DC_Punam
#असंच_काहितरी

Sunday, July 30, 2023

परिक्षा अन् प्रशासन

 


परिक्षा हे प्रशासनात येण्याचं फार मोठं द्वार जरी असलं तरी शितावरुन भाताची परिक्षा किंवा घराची कळा अंगण सांगते अशा म्हणीनुसार परिक्षेवरुन प्रशासनाची परिक्षा होत नाही किंवा परिक्षा प्रशासनाची कळाही सांगत नाही...खरंतर प्रशासनात कळा आहेत आणि ह्या कळांना जो कलेने हाताळतो तो खरा प्रशासक...निकाल लागला, कागदाच्या तुकड्याने आपल्या नावाच्या मागे एखादे पदनाम चिटकवले की आपण अधिकारी होऊ, मग सगळे प्रश्न मिटतील, अगदी फुलांच्या पायघड्याच पायवाटेवर अंथरल्या जातील अशा काहीशा कविकल्पना आपल्या डोक्यात तयारीच्या दरम्यान होऊही शकतात, पण ह्या कल्पनाच आहेत हे माञ तंतोतंत सत्य आहे. याचा अर्थ प्रशासन म्हणजे अगदीच ञासदायक आहे असा अर्थ काढण्याची घाई करु नका...प्रशासन अवघड नाहीतर आव्हानात्मक आहे...त्यातही सामान्य जनतेच्या संपर्कात असणारे विभाग जसे महसुल, ग्रामविकास, नगरविकास, व इतर यांना हा अनुभव तर येतोच....महसुल विभाग हा जसे प्रशासनाचा कणा आहे असं अभिमानानं सांगितलं जातं, तितकंच ह्या कण्यावर त्याच्या धन्याचं (लोकशाहीत खरा धनी जनताच) लक्षही बारकाईनं असतं...अगदी गावातली भांडणं असो नाहितर शेताच्या बांदावरुन होणारे वाद... कुणी पाणी अडवलं असो नाहितर कुणी पाणी जिरवलं असो.... घरात पाणी घुसलं काय किंवा विहीरीतुन पाणी गेलं काय ..पुर असो नाहितर दुष्काळ, शासनाची कुठलीही मदत मिळणं असो नाहितर इतर शासकीय विभागांबद्दलची गाऱ्हाणी असो...आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं मशिन म्हणजे महसुल प्रशासन अशी किमान बऱ्याच जणांची समजुत आहे. ह्या समजुतीमागे बराच प्रदीर्घ इतिहासही आहे, त्याबद्दल तुर्तास इथे चर्चा टाळुया...तर आपण म्हणत होतो की, मुळात प्रशासन हे आव्हानात्मक आहे....मग जर प्रशासन आव्हानात्मक असेल तर प्रशासनाचा भाग होऊ पाहणारे आपण सर्व भावी अधिकाऱ्यांनी ह्या आव्हानांना सामोरं जाण्याचं कसब आपल्यात भिनवायलाच हवं ना....एखाद्या विषयाचा आवाका लक्षात घेणं, त्यासाठी अधिकची माहिती मिळवणं....आपल्या आजुबाजुच्या चालुघडामोडींना फक्त लक्षात ठेवण्याबरोबरच असं का घडतय ? यावर काय उत्तर असु शकतं याचा विचार करणं...परिक्षेचा अभ्यास एकट्याने जरी अभ्यास करत असु तरी एकलकोंड्यासारखा अभ्यास न करणं...आपल्या सामुहिक वर्तवणुकीवर लक्ष देणं....आपल्या चालण्या-बोलण्यावर लक्ष देणं....एखाद्या बाबीवर विचार कसा करायचा अन् आपण कसा करतो यावर देखील विचार करणं...परिक्षेची तयारी करताना ह्या इतर अनुषांगिक बाबी ज्या आपल्या स्वभावात आणणे गरजेचे आहे...ज्या आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असणं गरजेच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचाही विचार झाला पाहिजे...नाहितर मी अन् माझी पुस्तकं एवढच केलं तर कदाचित आपण अधिकारी होऊ पण एक उत्तम प्रशासक होणं कठीण होईल....आता हे सगळं करायचं म्हणजे अभ्यासाच्या क्लास मध्ये भरीस भर म्हणुन व्यक्तिमत्व विकासाचे पण क्लास लावायचे का ? तर मुळीच नाही....ह्या गोष्टी स्वतःहुन शिकता येतात...ठरवुन काही गोष्टी अंगवळणी पाडुन घेता येतात...व्यसनं कशी न कळत लागतात, तसं चांगुलपणाचं...सदवर्तवणुकीचं व्यसन लागत नाही, ते लावुन घ्यावं लागतं...फक्त तसा प्रयत्न करणं...जाणिवपुर्वक काही गोष्टी करणं अन् काही गोष्टी टाळणं...हे जमायला हवं...एवढंच कशाला अगदी उपलब्ध वेळेचं नियोजन योग्य प्रकारे करणं अन् ते काटेकोरपणे पाळणं ही गोष्ट देखील पुढे प्रशासनात आपल्याला फार जास्त उपयोगी ठरणारी आहे...त्यामुळे असा सर्वांगिक अभ्यास करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे....नाहीतर परिक्षा, निकाल अन् सत्कार यातुन बाहेर आल्यावर जेंव्हा आपण काम करायला सुरवात करु तेंव्हा लक्षात येते की मी फक्त प्रशासनाचा अर्धचंद्रच बघितला होता, चंद्राची अशीही एक बाजु आहे जी तयारीच्या काळात आपल्या लक्षातच आली नाही....ह्या दुर्लक्षित बाजुसाठी आपल्याला अजुन बरेच काही शिकावे लागणार आहे.


#असंच_काहितरी

Friday, June 23, 2023

अ(प्रिय) राहुल


(RFO दर्शना पवारची तिचा मिञ राहुल कडुन हत्या.....ह्या दुर्दैवी घटनेनंतर मनातले 👇)

(अ)प्रिय राहुल.....


प्रेम प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं‌ असं पाडगावकर म्हणतात....पण राहुल आमचं प्रेम तुझ्यासारखं नाही..असुच शकत नाही...प्रेम‌ मी ही केलं होतं...पण कधी तिला बांधुन‌ ठेवलं नाही रे...प्रेम म्हणजे मुक्त करणं...प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला‌ तिचं आकाश देणं, कुठल्याही बरसातीची अपेक्षा न ठेवता....मला मान्य आहे, तुझा राग...तुझा मनस्ताप...मान्य तिच्या एका नकारात आयुष्य उद्ध्वस्त करणारा सुरुंग होता, पण आता तुझ्या नशिबीही तुरूंग आहे...ह्याची जराशी जाणिव तुला आधी कशी झाली नाही ?..आई सोडुन‌ गेलेल्या लेकराला जगताय पाहिलय आपण...गाय निर्वतलेल्या वासराला हंबरुन‌ हंबरुन का होईना गोठ्यात मोठं होताना पाहिलंय आपण...थोडक्यात आई जाण्याचं दुःखही आपण पचवु शकतो...सोपं नसतंच ना रे ते ही...पण‌ जमतंच ना...जमवावंच लागतं....जशी आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एका वेळेवर येते, तशी एका वेळेवर ती निघुनही जाणारच असते.... आई जाण्याच्या दुःखापेक्षाही हा बाई सोडुन‌‌ जाण्याचा ञास इतका असहनीय व्हावा अन्‌ त्यातुन तुझ्या हातुन एवढा मोठा घात व्हावा हे अनाकलनीय आहे...मी काही बाबा तुला उपदेश द्यायला पञ लिहीलं नाही...माझ्या मनाची‌ घालमेल कागदावर उतरवणं हेच खरे पञास कारण. नाहीतर तु आधीच‌ एवढा रागात त्यात हे पञ हाती पडल्यावर तिथं जवळपास असणाऱ्याचाच जीव घ्यायचा तु....फक्त एक लक्षात ठेव मिञा, तुझ्या एका कृतीनं आकाशात भरारी मारु पाहणाऱ्या कित्येक चिमण्यांची पंखच छाटली जातील आता....त्याचं काय ? पोरींना पाखरु म्हणतो‌ आपण....पण‌ ह्या पाखरांची शिकार जर आपणच गेली‌ तर आकाशात पाखरांचे थवे दिसतील कसे...जर आकाशात हवे असतील‌ थवे, तर पाखराला कशाला पिंजऱ्यात न्यावे ? आणि तु तर पिंजऱ्यात नाहीतर पाखराला‌ मातीत घातलेस रे.... लाज वाटतेय तुझी...मनात नुसती विचारांची उलथापालथ होतेय..डोकं सुन्न झालय...कालपर्यंत मला वाटायचं की कुठल्या तरी जंगली प्राण्यानं हल्ला केला असावा, पण तुच एवढा जंगली झाला असशील असं वाटलं नव्हतं रे.... परिक्षा पास होऊन अधिकारी होऊन तु ही इंतकाम घेऊ शकला असतास ना...पण तु स्विकारलेला पर्याय काही योग्य नाही.... तो कधीच कुणाला योग्य वाटणारही नाही...होकार आणि नकार याचा तितक्याच शांतपणे स्विकार करतं ते खरं प्रेम... पण आता सगळ्याच चर्चा वायफळ...चर्चांची गुऱ्हाळं सुरु झालीत जागोजागी...पण त्यातुन हाती काय येईल ? फक्त चोथा..... चार दिवस गप्पा रंगतील...लोकं हळहळ करतील....परत जैसे थे ..... तसेही‌‌ आम्हीही काय करु शकतो म्हणा...फार‌ फार तर चार‌ अश्रु ढाळु...मेणबत्त्या जाळु...परत आपापल्या कामाकडे वळु....मग कोण दर्शना कोण राहुल सारेच विसरुन जाऊ हळू हळू.... पण मिञा, तु एकट्या दर्शनाची हत्या नाही केलीस....तु मुलांवर विश्वास ठेवुन त्याच्याशी जवळीक करणाऱ्या मुलींच्या मुलांवरच्या विश्वासाची हत्या केलीस...आपली मुलगी दुर शहरात एकटी देखील सुरक्षित आहे, असा विश्वास असणाऱ्या पालकांच्या विश्वासाची हत्या केलीस...प्रेम म्हणजे लफडं नाही, असा प्रेमावर विश्वास असणाऱ्यांच्या विश्वासाचीही तु हत्या केलीस..... तुला सजा काय व्हायची ती होईल, पण ती फक्त दर्शनाच्या हत्येसाठी असेल... बाकी गुन्ह्यांची सजा कोण अन् कशी देणार ? आता कदाचित उद्या तुला पश्चाताप होईलही तुझ्या एका क्षणात घेतलेल्या टोकाच्या निर्णयाचा.... तेंव्हा फक्त एक कर, उद्या दुसरा राहुल तयार होऊ नये म्हणुन तुझ्या मनातले नक्कीच ओरडुन जगाला‌ सांग...सांग त्यांना की नकार पचवणं कठीण असतं, पण‌ अशक्य नसतं....तो एक क्षण‌ सावरला तर उभं आयुष्य सावरता येतं....बघ तुला‌ जमतय का ? तुझ्यातल्या टनभर दुर्गुणांची चर्चा होताना, तुझ्यातल्या कणभर चांगुलपणावर मला विश्वास वाटतो म्हणुन तुला पश्चाताप होईल, अशी आशा बाळगतो... 

[दुसरा राहुल आपल्या आसपास घडु न देणे, हिच तुला आमची खरी श्रद्धांजली असेल दर्शना...तोपर्यंत आमच्या ह्या शाब्दिक श्रद्धांजलीचाच स्विकार कर..]



#असंच_काहितरी

Saturday, June 3, 2023

"एमपीएससी, क्लास आणि आपण..."



"एमपीएससी, क्लास आणि आपण..."


नमस्कार मिञ-मैञिणींनो,

MPSC & UPSC परिक्षांचे निकाल लागले की "जिकडे तिकडे चोहिकडे, शुभेच्छांचे, सत्काराचे सडे" असे काहीसे वातावरण तयार होते..निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ हळू हळू पसरु लागतात...कित्येकांच्या कर्मकहाण्या कळत न कळत कानावर येऊ लागतात... एकच टाॅपर सगळ्या क्लासवाल्यांच्या बॅनरवर दिसु लागतात...प्रत्येकजण आपल्या क्लासचे एवढे निवडले गेले, तेवढे निवडले गेले असे सर्वदूर सांगत असतो...नक्की कळत नाही की, नेमकं हा एक व्यक्ती किती ठिकाणी होता..कुणाकुणाचे मार्गदर्शन घेत होता...या सगळ्यांच्या पलिकडे आमच्या सारखे काही असतात, जे सांगतात मी कोणताच क्लास लावला नव्हता, घरीच अभ्यास केला, वगैरे वगैरे...मग या सगळ्यात भांबावून जातो तो या क्षेञाकडे नुकताच वळलेला किंवा नव्याने वळू पाहणारा परिक्षार्थींचा गट...नक्की कोण खरं सांगतय..? नक्की आपण या परिक्षा पास करण्यासाठी काय करावं ? क्लास लावावा की नाही ? पुण्याला जावं की नाही ? एकट्याने अभ्यासाने होईल का ? एवढ्या लाखात आपण कसे सलेक्ट होऊ ? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडत आलेले आहेत...आताही पडत असणारच.....तर याबाबतीत मी माझ्या तयारीबद्दल आपल्याशी बोलतो, त्यातुन बरीच प्रश्न सुटतील अशी आहे..

तर मी माझी राज्यसेवेची तयारी जुलै 2019 मध्ये सुरु केली....तत्पुर्वी मी 2019 ची पुर्व परीक्षा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना देऊन पास झालो होतो, पण मेन्सचा सिलॅबस देखील मी प्रीचा निकाल लागे पर्यंत बघितलेला नव्हता...मग जून मध्ये पदवीचा लास्ट ईयरचा निकाल लागला अन् जूलै मध्ये मी 2019 ची मुख्य परिक्षा झाल्यावर खरा अभ्यास सुरु केला...त्याअर्थाने माझी 2020 ची परिक्षा ही माझ्या साठी पहिलाच प्रयत्न ! मग राज्यसेवा करायची तर करायचं काय ? हा प्रश्न होता, पण कुठे क्लास लावू का ? हा प्रश्नच माझ्यासाठी नव्हता, कारण क्लासची ५०-६० हजार फिस मी भरूच शकणार नव्हतो... म्हणुन हा प्रश्न निकाली काढुन मी माझी डिगरी जिथे पुर्ण झाली तिथेच म्हणजे जळगावलाच (खान्देश) सेल्फ स्टडी म्हणजे आपण आपला अभ्यास करायचे ठरवले... योगायोगाने मोठा भाऊ जून 2019 मध्ये जाॅबसाठी जळगावला आला, मग दोघांनी मिळून रुम केली अन् अभ्यासाला सुरवात केली..माझ्या अभ्यासाचा पहिला टप्पा होता, मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम नीट बघणे...बऱ्याच UPSC Toppers ला ऐकलेले होते, त्यांचे म्हणणे असायचे की मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला पाठच असला पाहिजे...मग मी तसा प्रयत्न करायला सुरवात केली...जुने पेपर बघुन 360° अभ्यासक्रमाचे डिकोडींग  करायला सुरवात केली...एक महिना फक्त अभ्यासक्रम, जुने पेपर बघणे अन् प्रश्न नक्की कशातुन विचारले जातात हे स्वतः शोधणे (उदा. लक्ष्मिकांत मधुन प्रश्न येतात हे ऐकलेले होते, पण तरीही GS2 चा पेपर घेऊन खरच प्रश्न ह्या पुस्तकातून येतात का ? हे स्वतः बघायला सुरवात केली) हाच उपक्रम चालू होता. ह्यातुन सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे मला परिक्षा बहुतांशाने कळली...नक्की काय विचारले जाते ? का विचारले जाते ? अन् कुठून विचारले जाते ? ह्या प्रश्नांची खाञीशीर उत्तरे स्वतःच स्वतःला भेटत गेली...स्वतःवरचा विश्वास वाढत गेला...आपण हे करू शकतो, हा विश्वास बळावत गेला...अन् एकटा असूनही कधी फारसा सेल्फ डाऊट वाटला नाही....

एक महिन्याच्या ह्या विश्लेषणानंतर मी माझी बुकलिस्ट फायनल केली....बुकलिस्ट फायनल करताना अजुन एका गोष्टींची मला फार मदत झाली, ते म्हणजे श्री. सदाशिव नांदे (ACST) सरांचे 2018 च्या मेन्सच्या पेपरचे सविस्तर विश्लेषण (हे युट्युबवर फ्री उपलब्ध होते)...एकदा ही बुकलिस्ट फायनल झाली की मग तन-मन-धन अगदी परिक्षेसाठीच असा विचार करुन अभ्यास करायला‌ सुरवात झाली...2020 ची पुर्वपरिक्षा 5 एप्रिल 2020 ला नियोजीत होती, त्यानुसार जुलै - डिसेंबर 2019 मेन्सचा अभ्यास अन् जानेवारी पासुन पुर्वच्या विचाराने अभ्यास असे ठरवले....मग मेन्सचा अभ्यास करताना 6 महिने फक्त आणि फक्त अभ्यासच....हा सहा महिन्यांचा काळ माझ्या आतापर्यंतच्या पुर्ण तयारीतील सर्वाधिक अभ्यासाचा काळ होता...साधारण 12-14 तास अभ्यास होत होता...अर्थात कधीतरी दिवसभर टाईमपास ही होत असायचा, पण राञी झोपताना पश्चाताप व्हायचा...ह्या पश्चातापातून मग अजुन आग पेटायची...मनोमन निश्चय करत परत नव्या जोमाने दुसऱ्यादिवशी अभ्यास....एकंदरीतच ह्या काळात पुस्तकं वाचणे, एकदा पुर्ण त्या पेपरचा अभ्यास झाला की जुने पेपर सोडवणे..अन् परत पुढच्या पेपरचे वाचणे असा क्रम चालु होता.. जुने पेपर, काही प्रॅक्टीस प्रश्न ह्या सगळ्यांमधून Facts लक्षात राहत गेले...अभ्यास वाढला...मग प्री च्या अभ्यासासाठी टेस्ट सिरीज लावून अभ्यास सुरु केला....पण ठरल्या नुसार सारे होईल कसे?...नियतीच्या मनात एका वर्षात पास होऊ देणे नव्हतेच बहुधा...कोरोना आला, लाॅकडाऊन लागले...सगळे नियोजन बारगळले..कसेतरी स्वतःला सावरत अभ्यास चालु ठेवला..बरेच चढ उतार आले, पण अभ्यास बंद केला नाही....

त्याचेच फळ म्हणजे परिक्षा जेंव्हा झाली तेंव्हा प्री पासुन पोस्ट पर्यंत चांगलेच मार्क मिळत गेले अन् नीट अभ्यास करुन दिलेल्या ह्या अटेंप्ट मध्ये राज्यात 16 व्या क्रमांकाने पास झालो...एवढेच नाही तर ह्या जवळपास एक-दिड वर्षाच्या पुर्ण एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाच्या जीवावर 2020,2021 & 2022 ह्या तिन्ही वर्षीच्या राज्यसेवेच्या पुर्व व मुख्य परिक्षा पास करता आल्या.....थोडक्यात काय तर एक वेळ ईमानदारीने परिक्षेला पुर्ण समजुन नीट नियोजन करुन अभ्यास केला, बाकी गोष्टींपासुन दूर राहिलो, तर नक्कीच आपण ही परिक्षा आपण आपल्यापरीने पास होऊ शकतो...ते ही चांगल्या रँकने....तेंव्हा ह्यावरुन एक गोष्टतर नक्कीच मी स्वानुभवातून सांगू शकतो, ती म्हणजे तुम्ही जर अभ्यासात बरे असाल (अर्थात बरे म्हणजे एखादी गोष्ट वाचून समजुन घेता येते असे) तर निश्चितच शून्य रुपयात आपण तयारी करु शकतो....पुण्यात मी 2020 च्या मुलाखतीसाठी म्हणुन पहिल्यांदा गेलो, त्याआधी पुर्ण तयारी जळगावला रुमवरच झाली होती...त्यामुळे पुण्यात गेलेच पाहिजे का ? असा प्रश्न विचारताना पुण्यात नक्की कशाला जायचे ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे...पुणे स्पर्धापरिक्षांची (विशेषतः एमपीएससीची) पंढरीच आहे, पण ह्या पंढरीत गेल्यावर आपल्याला खरंच पांडूरंग भेटेल का ? की फक्त मंदिराच्या कळसाचेच दर्शन होईल ह्याचा अंदाज आधीच घेतला पाहिजे...बाकी आॅनलाईन माध्यमामुळे पुणे आपल्या मोबाईलमध्ये आले आहे...तरीही फक्त वातावरण हवे, म्हणुन पुण्यात जातो म्हणणारे बरेच आहेत...तिथे नक्की कोणते वातावरण मिळते हे देव जाणे... मलाही सुरवातीला वाटायचे की पुण्याला जावे वगैरे...पण माझ्या पुण्यात तयारी करणाऱ्या मिञाने मला कायम रोखले अन् सांगितले की तुला वाटते तसे इथे फार काही दिव्यवलय नाहीये...(विरोधाभास असा होता की तो स्वतः तिथे गेला होता, पण मला रोखत होता...कदाचित मेल्यावर स्वर्ग दिसतो तसा त्याला दिसला असावा, म्हणुन तो मला आत्महत्येपासून रोखत होता...) ह्या सगळ्याचा अर्थ मुळीच असा नाहिये की पुण्यात तयारी करुच नये...ज्यांना परवडते त्यांनी अवश्य करावी...आपला एखादा २-३ मिञांचा ग्रुप असेल, आपण तिथे जाऊन क्लास वगैरे करणार असु तर पुण्यात जायला हरकत नाही...पण फक्त अभ्यास करायचा आहे, मग तिथे जातो, तिथे जाऊन रिडींग लावतो अन् सेल्फ स्टिडी करतो असं नियोजन असेल तर मग यावर पुनर्विचार करायला हवा..असो..ह्याबाबतीत विचार करुन निर्णय घेऊनच आपण सगळे अभ्यास करत आहात...किंवा करायचा ठरवत आहात..आता जो मुळ प्रश्न होता की मी सेल्फ स्टडी करुन अभ्यास केला वगैरे ठिक ..पण याचा अर्थ मी कुणाचीच मदत घेतली नाही असा नाही...माझ्या तयारी दरम्यान मी खुप वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत घेतली, अर्थात हे सर्व परवडणारे होते म्हणुन...मी तयारी दरम्यान कोणती पुस्तकं वाचली याची यादी स्वतंञ बुकलिस्ट म्हणुन आधीच शेयर केलेली आहे..पुस्तकांशिवाय इतर मदत खालीलप्रमाणे मिळाली....


१) MPSC2020 Prelims Test Series - पृथ्वी अकॅडमी, डेक्कन आय ए एस (Both were online) आणि भुषण धूत अकॅडमी (दिपस्तंभ, जळगाव येथे offline)

२) MPSC2020 Mains Test Series - Deccan IAS (Online, माञ PDF डाऊनलोड करुन प्रिंट करुन वेळ लावून सोडवायचो) & Unacademy (MPSC Combat मधून Unacademy Plus Subscription फ्री मिळवले होते, त्यामुळे Unacademy च्या टेस्ट सिरीज त्यांच्या App मधुन सोडवल्या....विशेष म्हणजे डेक्कनची टेस्ट सिरीज लावण्यासाठी पैसे नव्हते, Unacademy ने Mains साठी Test series competition ठेवली होती, त्यामध्ये 3000/- Amazon voucher जिंकलो, अन् त्यातून डेक्कनची टेस्ट सिरीज लावली....Thanks to Unacademy)

3) MPSC2020 Mock Interview - (हे फ्री असतात) कोलंबे सर व मनोहर भोळे सर यांच्या कडे one to one Mock दिला, दिपस्तंभ व इतर अतिप्रसिद्ध नसलेल्या ३ ठिकाणी पॅनेलसमोर माॅक दिला)

MPSC2021 च्या पुर्व व मुख्य साठी कुठलीही Paid Test Series लावली नाही. 

MPSC2021 साठी माॅक Interview - कोलंबे सर (भगिरथ अकॅडमी), संकल्प देशमुख सर (अध्ययन अकॅडमी) [दोघेही अतिशय सविस्तर आणि सखोल मुलाखत घेतात] आणि मनोहर भोळे सर (राजमुद्रा अकॅडमी)

या सगळ्यांशिवाय YouTube च्या माध्यमातुन ज्यांचा मला फायदा झाला ते :

१)Some Channels like Bhatner IAS, Genius Maths and WiFi Study (For CSAT) (सचिन ढवळे सर आणि आरगडे सर यांचे CSAT साठीचे Videos)

२) सचिन भस्के सरांचे व्हिडीओ (सामान्य विज्ञानासाठी)

३) मृणाल सर/तेच ते UPSC वाले (For Economy's Concept)

४) Study IQ & Sushil's Spotlight - (For Current affairs)

थोडक्यात मी टेस्ट सिरीज वगळता बाकी कुठलीही बॅच किंवा क्लास कोणत्याही क्लासेसचा लावलेली किंवा लावलेला नव्हता.....जे फ्री मध्ये उपलब्ध होते ते निश्चितच वापरले, पण तेही फार Selectively...

त्यामुळे माझ्या मते तरी MPSC ची तयारी कमीत कमी पैशात आणि कमीत कमी वेळेत करणे शक्य आहे, फक्त गरज आहे ती आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची ! एक ते दोन वर्षाच्या प्रामाणिक प्रयत्नांत परिक्षा पास होणे शक्य आहे...(अपवादात्मक परिस्थितीत 3-4 वर्ष लागू शकतात..किंवा जाॅब करत असु तर कदाचित अजुन जास्त) जर कुठे काही कमी जास्त वाटत असेल तर क्लासेसची मदत नक्कीच घेऊ शकता, अन्यथा साधारणपणे आपला अभ्यास व्यवस्थित असेल आणि योग्य दिशा असेल तर निश्चितच ध्येयप्राप्ती अवघड नाही...हे मान्य करायला हवे.

हे सगळे एवढे सविस्तर लिहीण्याचा उद्देश्य एवढाच की मी असे केले ... तुम्हीही कदाचित माझ्यासारख्याच परिस्थितीत असाल तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं यातुन मिळाली असतील...टाॅपर सगळीकडे कसे दिसतात याचे मुख्य कारण माॅक interview असते...मुख्य परिक्षेनंतर Mock interview free घेतले जातात, त्यामुळे सर्वच जण सर्वच ठिकाणी माॅक देण्याचा प्रयत्न करतात...त्यामुळे कुठल्या एखाद्या बॅनरवर टाॅपरची गर्दी दिसली म्हणजे ते सगळे त्या क्लास मध्ये शिकूनच अधिकारी झाले, असा गैरसमज मुळीच करुन घेऊ नये....आता सोशल मिडीया मुळे निवडलेल्यांशी सुद्धा सहज संपर्क होऊ शकतो ...राहिला प्रश्न क्लासचा तर मी एवढच सांगेल की क्लास लावला म्हणजे आपण पासच होऊ हा मोठा गैरसमज आहे..तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जीवावरच पास होणार आहात...नदीत उडी मारली म्हणजे आपोआप किनारा गाठता येईल असे नाही, त्यासाठी हात पाय मारावे लागतील...तसेच इकडे क्लास लावणे म्हणजे उडी मारणे...नुसती उडी मारू‌न भागत नाही..असो....क्लासला विरोध करणे हा‌ माझा उद्देश्य नाहीये...ती‌ काही जणांची गरज देखील आहे....आणि क्लास मधून परिक्षाभिमुख कंटेंट देणारे पण क्लास आहेत...फक्त गर्दीचा भाग बनुन, इतरांकडे बघून क्लास लावण्यात अर्थ नाही..नुकतेच मागच्या आठवड्यात एका आईसक्रीमचा गाडा चालवणाऱ्या काकांशी बोलणे झाले, त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी BSC 2nd year la आहे आणि तिने सहा महिन्यापुर्वी एका नामांकीत अकॅडमीचा 1 लाख 15 हजार रुपयाचा क्लास लावला आहे (पैकी 60 हजार‌ यांनी भरलेले आहेत)...सहा महिने झाल्यावर तिला कळले‌ की तिथे अपेक्षे प्रमाणे शिकवले जात नाही...आता तिला परत क्लास बदलायचा आहे तर‌ कोणता क्लास लावू ? त्यांचे म्हणणे होते की मी एकवेळच जेवतो पण मला मुलीला शिकवायचेय, अधिकारी करायचेय ..हे ऐकल्यावर त्यांचे प्रश्नाचे थेट उत्तर मी देऊ शकलो नाही उलट मलाच अनेक प्रश्न पडले..एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतल्या व्यक्ती जीवाचं रान करुन पैसे भरतात, मुला-मुलींना क्लासला पाठवतात..जर त्यांना तिथे हवे ते मिळत नसेल तर क्लास का लावायचा ?...यात क्लासेसचीच चुक आहे असेही मी म्हणणार नाही...आपली परिस्थिती नसेल तर एवढे महागडे क्लासेस लावण्याची खरच गरज आहे का ? आपल्याला मदत होईल असे अनेक क्वाॅलिटी कोर्सेस युट्युब वर फुकट उपलब्ध आहेत, आपल्या मदतीला शासनाच्या सारथीसारख्या संस्था आहेत...आपण त्याचा फायदा करुन घ्यायलाच हवा...हा विचार मुला-मुलींनी देखील करण्याची गरज आहे...असो. त्यादिवशी काकांशी बोलल्यापासुन मनात होते की याबाबत थोडे सविस्तर बोलावे, आपण नक्की काय केले ? कोणता क्लास लावला का ? कुणाची मदत घेतली ? हे सांगावे....कोण जाणे यातून बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील....! सामान्य कुटूंबातल्या मुलांनो, अधिकारी व्हायचे स्वप्न पाहा, पण त्यासाठी लगेच पुण्याला जातो अन् क्लास लावतो असं करु नका...आधी परिक्षेला पुर्ण समजुन घ्या, अभ्यासक्रम काय आहे ? जुने पेपर बघा...काय काय वाचायचे ह्याबाबत पेपर बघुन, टाॅपरच्या मार्गदर्शनातुन अंदाज घ्या अन् अभ्यासाला लागा...आपल्या परिक्षेत न कळण्यासारखे असे फार जास्त काही नसते..वाचुन लक्षात येण्यासारखे बरेच असते...त्यामुळे वाचत रहा...मोफत उपलब्ध स्रोतातून माहिती मिळवा...फारच कठीण वाटत असेल अशा एखाद्या विषयाचा तेवढ्यापुरता क्लाॅस किंवा एखादी बॅच जाॅईन करा...पण पहिल्यांदा परिक्षा समजुन घेऊन वाचत रहा...नक्कीच शुन्य रुपयात तुम्ही ही परिक्षा पास होऊ शकता...आपली परिस्थीती बदलण्यासाठी आपल्याला ही परिक्षा नक्कीच मदत करते, पण ह्या परिक्षेत वारंवार अपयश आल्यावर स्वतःच्या क्षमतांवर विचार करा...प्रत्येक जण मोठा माणुस होऊ शकतो, पण प्रत्येक जण अधिकारी नाही होऊ शकत...त्यामुळे अधिकारी होणं म्हणजेच मोठं होणं असंही नाहीये, हेही ध्यानात ठेवा...तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा...!


#असंच_काहितरी

शशिकांत बाबर
(मुख्याधिकारी, गट-अ, MPSC2021)
(नायब तहसिलदार, MPSC2020)

Wednesday, May 31, 2023

वर्षपुर्ती स्वप्नपुर्तीची !



वर्षपुर्ती स्वप्नपुर्तीची...! #नायब_तहसिलदार


एका वर्षापुर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 31 मे 2022 रोजी राज्यसेवा 2020 चा अंतिम निकाल लागला होता..कोरोनाच्या दोन वर्षांच्या अंधारानंतर हा निकालाचा  काजवा मिणमिणत हाती आला होता...आयुष्यातल्या पहिल्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो...पहिल्यांदा बोलणं शिकलो तेंव्हाचे बोबडे बोल अन् त्या आठवणी कायम आनंददायी असतात..पुढे मोठमोठी भाषणं करायला शिकतो, पण ते बोबडे बोल माञ अनमोलच...कारण ते पहिले पहिले शब्द असतात..जसं पहिलं प्रेम अन् प्रेमातली पहिली भेट....तशीच पहिली नोकरीही ! तसंही एका बेरोजगार मुलासाठी नोकरी म्हणजे 'ती'च... कधीकधी तिच्यापेक्षाही जास्त महत्वाची, म्हणुनच तर तिच्यापासुन दूर होऊनही 'हि'ला मिळवण्यासाठी धडपडणारी तरुणाई आपल्याला दिसते...पहिल्यांदा मिळणाऱ्या गोष्टींचा आनंद काही औरच असतो...या निकालानंतर मागच्या एका वर्षात दोन निकाल लागले...बेरोजगार ते वर्ग ब अधिकारी अन् पुढे वर्ग अ अधिकारी असा प्रवास करता आला...पण पहिल्यांदा कुठली नोकरी लागली...त्यातही सरकारी अधिकारी झालो...गावाकडच्या भाषेत लोकांसाठी साहेब झालो, ह्या सगळ्या गोष्टी अविस्मरणीय...त्यामुळे 31 मे हा तसा अविस्मरणीयच...प्रवास इथे संपला नाहीच...फक्त मुक्कामाची ठिकाणी अशी वेळेवर भेटत गेली की पावलांना चालायला अजुन बळ मिळतं एवढं नक्की...सरल्या सालाचे आभार 🙏 आता ह्या नव्या सालात पावलांना पुढच्या प्रवासासाठी अधिक बळ मिळो, हिच प्रार्थना !!


#असंच_काहितरी
🖋शशिच्या मनातले

Sunday, May 14, 2023

संभाजी महाराज जयंती


सह्याद्रीच्या खडकांसारखा अभेद्य बाणा असणारा ... शिवछञपती सारख्या वाघाचा छावा ...... बालपणीच मातेचे छञ हरवल्यावर जिजाऊमाँसाहेबांच्या विद्यापीठात तयार झालेला छञपती... शस्ञांसोबत शास्ञांतही पारंगत असणारा.... छळ, कपट अन् अंतर्गत कलहांना स्वाभिमानाने सामोरे जाणारा...मिञासाठी जीव देणारा पण दगाबाजांना तितक्याच कठोरपणे यमसदनी पाठवणारा.... न्याय्यबुद्धीने राज्य करणारा....आपल्या अल्प काळातही काळाच्या भाळावर आपल्या कर्तृत्वाची सोनेरी मुद्रा उमटवणारा....बाप से बेटा सवाई म्हणतात तसे शिवरायांच्या स्वराज्याची उंची अधिक वाढवणारा, तरिही कल्पोकल्पित घटनांच्या आधारे काहींनी 'बढे बाप की बिगडी हुई औलाद' असा ठपका ज्यांच्यावर ठेवला असा, पण या अशा अफवांना भिक न घालता शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याचा आपल्या कर्तृत्वाने खरा वारसदार ठरलेला.... मरणाला स्वतःची लाज वाटावी इतक्या  निडरपणे मृत्युला सामोरे जाणारा .... स्वराज्याचा धाकला धनी म्हणजे छञपती शंभूराय.....राजे आपल्या जयंतीनिमित्त आपल्या पविञ स्मृतिस विनम्र अभिवादन....🙏

Friday, May 5, 2023

प्रिय सिद्धार्थ



प्रिय सिद्धार्थ,

नेमकं तुला काय म्हणावं ? याचाच विचार करत होतो...सिद्धार्थ म्हणु, तथागत म्हणु की बुद्ध म्हणु... असु दे...काहीही म्हटलं तरी तुला फार फरक पडणारच कुठेय ? तुझं मोठेपण हे नावात नाहीये हेच खरे...तुझं जगणं, तुझा संदेश हिच तुझी खरी ओळख..तु खरंतर माझंच विस्तारीत रुप आणि मी तुझं संकुचित रुप, तसं बघितलं तर हा माझाच माझ्याशी संवाद आहे..मग खरच नावात काय आहे ?

तर सिद्धार्था, ह्या पञास कारण की आज तुझा वाढदिवस...आमच्या भाषेत बर्थ डे..पण नुसतं एवढच नाही..आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातला फारच महत्वाचा दिवस...तुझा जन्म आजचा...तुला ज्ञानप्राप्ती झाली तो दिवसही आजचाच...अन् तुझे ह्या मायावी जगातुन महापरिनिर्वाण झाले, तेही आजच्याच दिवशी...आयुष्याची सुरवात अन् शेवट एकाच बिंदुवर, यातुन आपलं आयुष्य एक वर्तुळ आहे हेच जणू तु दाखवुन दिलेस. ह्या वर्तुळाच्या परिघावर भटकण्यात आमचे जीवन निघून जाते...आमच्या सारख्या सामान्य माणसाचं आयुष्य तर खऱ्या अर्थानं परिघावरचे जिणे...ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदुचा शोध काही काहींना आयुष्यभर लागत नाही...असो.

सिद्धार्था, तु राजकुमार होतास...कशाचीच कमी नव्हती...तरीही जगातले दुःख पाहुन तुझे हृदय कसे द्रावले ?...इकडे आमच्याकडे तर जरासा पैसा आला की आम्ही तर बाबा मानच खाली वाकवत नाही...मग तुझ्यात धनदौलतीचा उन्माद कसा आला नाही ?...हे काही मला अजुन कळले नाही..तु राजमहाल सहज सोडु शकला, कुठलेच बंधन तुला बांधुन ठेवु शकले नाही...आम्हीतर बाहेरगावी जाताना घराचे कुलूप नीट लागले का याची चारदा खातरजमा करतो...बायको माहेरी पोहचे पर्यंत चारदा काॅल करुन नीट जातेय ना, कुठपर्यंत पोहचली, अशी विचारणा करत असतो...घराचा, घरातल्या माणसांचा कशाचाच मोह तुला कसा अडवु शकला नाही, हे माझ्यासारख्या सामान्यांना न उलगडणारं एक कोडंच आहे...पण खरं सांगायचं तर तु राजमहाल सोडलास तेंव्हाच कुठे तु खरा सम्राट झालास...शांततेचा, विश्वबंधुतेचा संदेश देणारा महासम्राट....तु जगातले दुःख पाहिले, वार्धक्य पाहिले तेंव्हा ह्या जगण्याचा हेतु काय ? असा प्रश्न तुला पडायला लागला अन् मग त्यातुनच तु शोधायला निघालास अशा प्रश्नांची उत्तर जी कधी कोणाला पडलीच नव्हती...धर्म म्हणजे कर्मकांड हेच ज्यांचं गणित होतं, ज्यांच्या धर्मानं इतरांना नाकारलं, त्या नाकारल्यांना तु स्विकारलेस अन् त्यांना नवा धर्म दिलास..जगण्याचा नवा मार्ग दाखवलास...तु शिव्या घालत बसला नाहीस, तु दगडांवर धडकाही घेतल्या नाहीस, तु धर्मांधतेचा डोंगरच पोखरलास...सामान्यांना असामान्य असे ज्ञान देऊन त्यांचं जगणं देखणं केलस...सहा वर्षाच्या भटकंतीनंतर तुला दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली...जगात दुःख आहे...दुःखाला कारण आहे...अन् हे दुःख दूर देखील करता येते असा सर्वव्यापी संदेश तु दिलास....तृष्णा हे दुःखाचे मुळ कारण आहे, हे किती अचुक सांगितलेस तु...आम्ही कायम दुःखी का ? ह्याचं उत्तर आमची तृष्णा कायम कृष्णामाई सारखी वाहतच असते...आमच्याकडे सायकल नसते तेंव्हा सायकल हवी असते, सायकल आली की मोटारसायकल, मग चारचाकी  गाडी, मग बंगला, मग नुसता बंगला चांगला वाटत नाही, बंगल्याच्या आजुबाजुला बगीचाही हवा, अन् एवढं सगळं असल्यावरही तृष्णा भागत नाही... कधी पैसा, कधी पद, कधी प्रतिष्ठा आम्ही कायम तहानलेलेच...आता ह्या दुःखाला दूर करण्याचा अष्टांग मार्गही तु सांगितलास... आम्ही माञ फार फार तर तुला साष्टांग नमस्कार करु शकतो, पण हा अष्टांग मार्ग स्विकारणे जरा आम्हाला जडच जाते बघ...

सिद्धार्था, तुला कसं जमलं रे इतकं सम्यक जगणं ?...पण खरं सांगु आम्हीही काही वाईट माणसं आहोत असं नाही...आम्हाला फक्त जमत नाही मध्यम मार्गावर चालणं, आम्ही एक तर डावे असतो नाहीतर उजवे...समाजवादी असतो नाहीतर भांडवलवादी...काळे असतो नाहीतर गोरे...आम्ही कायम हो किंवा नाही असाच प्रश्न म्हणुन पाहतो ...आहे रे आणि नाही रे मध्ये विभागणी करणारा एक मार्क्स आमच्याही आत असतोच.. आम्हाला तु सांगितले तसं मध्यम मार्गावर चालणं जमावं अस वाटतं, पण यासाठी कुणीतरी हात धरावा अन् त्यामार्गावर न्यावं यासाठीच आमचा शोध सुरु असतो...सारे धर्म, सारे शोध, साऱ्या प्रार्थना, हे सारेच आम्हाला कुणीतरी, काही तरी हवे असते जगण्यासाठी ...आमच्या अंधारात चाचपडत पडलेल्या जीवांना मार्ग दाखवण्यासाठी...आमच्या‌ वाटेत उजेड पेरण्यासाठी...पण बाबा, तु तर मोकळा झालास अत्त दिप भव: म्हणुन...आता तुच सांग कसा पेटवायचा हा आतला दिप ?...अन् कसा पेरायचा उजेड आपणच आपल्या वाटेवर ?...असु दे..हे तरी तुला का विचारावं, मीच माझं शोधलं पाहिजे ह्याचं उत्तर कारण तुला स्विकारायचे म्हणजे सोपं नाहीच....पण आवश्यक माञ आहे...म्हणुनच साऱ्या धर्म अन धर्मग्रंथांचा अभ्यास करुन भिमराय तुझ्या मार्गावर आला तो काय उगीच..?

सिद्धार्था, बघ काय काय बोललो ना...किती भरकटलो...अरे हे असंच होतं बघ माझं...म्हणुनच तु अन् तुझे शब्द मला परत मार्गावर आणण्यासाठी फार गरजेचे आहेत बघ...मी माझा दिप होईलच ..तु फक्त माझ्या जवळच रहा, माझ्या दिव्याची वात विझू नये म्हणुन....तु लहानपणापासुन शाळेतल्या पुस्तकापासु‌न ते कथा, कादंबरी, सिनेमापर्यंत वारंवार भेटत आलाच आहेस..पुढे पुढे सोशल मिडियात कितीतरी प्रेरणादायी वचनांच्या माध्यमातुन तु भेटला...खरंखोटं सगळं तपासुन पाहायला हवं, हे तुच सांगितलस...पण मी शंका घेऊच शकलो नाही तुझ्यावर...तु कायमच आईसारखा जवळचा वाटलास रे... युद्ध नको बुद्ध हवा असं म्हणत कायमच तू हवाच, अशी मागणी मी करत आलो आहे.... आताही तीच मागणी करतो... कायम सोबत रहा बाबा...कायम...!


तुझाच........

Wednesday, May 3, 2023

Book Review : दोन मने (वि.स.खांडेकर)


माणसाचं मन तसं न उलगडणारं कोडं...बहिणाबाईंनी पिकातल्या ढोराची उपमा दिलेलं मन...न दिसणारं, न दाखवता येणारं..तरीही आपल्या आयुष्याला दिशा देणारं मन...मनामुळे सगळं कळतं, पण मन कळत नाही असं म्हणतात...याच मनावर कित्येकांनी लिहिलं आहे...पण या सगळ्यांनी वर्णिनेलं मन हे एकच..."माणसाच्या आत दोन मनं असतात, एक पशूचं आणि एक देवाचं...पहिलं उपभोगात रमतं, दुसरं त्यागात आनंद मानतं"...हे सांगणारं पुस्तक‌ म्हणजे वि. स. खांडेकर यांची 'दोन मने' ही कादंबरी...


'प्रीती अन् पराक्रम हेच जीवनाचे डोळे आहेत', असं मानणाऱ्या खांडेकरांच्या बहुतेक कादंबऱ्यांचा विषय प्रीती आणि प्रेम हाच आहे..तोच विषय यादेखील कांदबरीचा आहे.. कादंबरीची मुख्य कथा आहे तीन मिञांची..प्राध्यापक असलेले आगटे, वकिली करणारे बाळासाहेब अन् अनाथाश्रम चालवणारा सुबोध..या तिघा मिञांच्या आयुष्याचा पट उलगडणारी ही कथा..काॅलेजात असणारे आपण अन् पुढे आयुष्यात असणारे आपण यात‌ बऱ्याचदा खूप फरक असतो... तेंव्हा समाजवादी असणारे आपण पुढे भांडवलदार देखील होऊ शकतो, हे सत्य यात अगदी साध्या शब्दात मांडलेले आहे.. कथेतील बाळासाहेब म्हणजे उपभोगवादी माणुस...आगटे हा वैचारिक तरिही परिस्थितीसमोर मान तुकवणारा माणुस...तर सुबोध हा सभोवतालचे दुःख, वेदना पाहुन सन्यस्त झालेला तरीही आपल्या दुबलेपणाला आपला सात्विकपणा म्हणुन आपण जगलो अशी खंत वाटणारा... कथा मुख्यतः बाळासाहेबांच्या भोवती फिरते.. बाळासाहेब चपला नावाच्या एका सिनेनटीच्या प्रेमात पडुन तिच्यासोबत पुण्याला जातो..तिथे जुन्या काॅलेज मिञाची भेट होते..तो चपला लाच त्यांची बायको समजतो...बाळासाहेबही हा गैरसमज दुर करत नाहीत...पण काही दिवसांनी बाळासाहेबांची बायको तिथे येते तेंव्हा बाळासाहेबांचे पितळ उघडे पडते...त्यावेळी त्यांच्या बायकोची अवस्था..बाळासाहेबांच्या मनाला होणारा दंश..आपल्या चुकीच्या वागण्याचा होणारा पश्चाताप.. त्यातुन बाळासाहेबांचे स्वतःच्या आयुष्याचे होणारे मुल्यांकन ... हे सगळे मांडताना अनेक जगण्याचे मंञ शब्दाशब्दात सापडतात...त्यानंतर 'चपला'चे बाळासाहेबांपासुन अलगद दुर होणे...आगटेंचा विद्यार्थी असलेल्या एका 'श्री' नावाच्या हरिजन तरुणाशी जवळीक होणे...दलितांसाठी सत्याग्रह करण्याचा निश्चय घेऊन दलितांसाठी जीवन वाहून घेण्याचा निश्चय करणारा हा तरुण...चपलेसारख्या मोहक तरुणीच्या मोहाला बळी न पडणारा...आपल्या कर्तव्याशी प्रतारणा न करणारा...अन् म्हणुनच चपलेला आवडणारा...पुढे जाऊन तर श्री च आपले दुसरे मन जागे करु शकला, असे सांगुन चपला त्याच्यासाठी हरिजनांच्या सत्याग्रहातही भाग घेते..कथेत बरेच बाकी चढ उतार आहेत..अन्य पाञे आहेत..म्हातारपणातही सत्याग्रहासाठी तयार‌ होणारा 'श्री'चा आजोबा..बाळासाहेबांची पत्नी-निर्मला...सुबोधच्या आश्रमातली माई...इत्यादी.

कथेत ठिकठिकाणी माणसाच्या दोन मनांचा उल्लेख येतो...प्रत्येकात दोन मने असतात...एक उपभोगात रमते तर दुसरे त्यागात ...या दोन मनात कायम झगडा असतो...बाळासाहेबांचे पहिले मन वरचढ ठरले तर श्री चे दुसरे मन....माणसाला आयुष्यात ह्या दोन्ही मनांचा समतोल साधतच जगावे लागते...तसे जगले तरच आयुष्य सुखी होते ..जीवनात‌ अनेकदा भरकटलेला कथेचा नायक बाळासाहेबच आपल्याला जीवनाचे खरे सार सांगुन जातो...
तो‌ म्हणतो,
"जीवन ही लढाई आहे.
जीवन हा यज्ञ आहे.
जीवन हा सागर आहे.
जखमांवाचून लढाई नाही.
ज्वालेवाचून यज्ञ नाही.
वादळावाचून‌ सागर नाही."

अशाप्रकारे जीवनाबाबतचे हे असे शाश्वत सत्य सांगणारी ही कादंबरी. कथा आपल्याला खिळवून ठेवणारी..आपल्या आवडीच्या विषयावरची...स्ञी-पुरुष संबंधाबद्दल आपल्याला जागरुक करणारी...प्रेम म्हणजे फक्त मोह नाही, प्रेम म्हणजे नुसता उपभोग नाही...प्रेमात उपभोग असला तरी तो प्रेमाचा मुख्य भाग नाही, उप आहे...हे अधोरेखीत करणारी.. प्रत्येकाच्या आयुष्यात मोहाचे क्षण येतात, ते मोहक क्षण दाहक अनुभव देखील देऊ शकतात, तेंव्हा अशा मोहाच्या क्षणी सावरायला हवे असे सांगुन आपल्या तारुण्याला सावध करणारी..अन् प्रत्येकामधले पशुचे मन वरचढ होऊ पाहते, हे सांगणारी...म्हणुनच आपल्याला दोन मनांचे हे गौडबंगाल कळावे यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.

कादंबरीतील काही भावलेली विधाने :
१) निसर्ग भविष्याकडे धावत असतो आणि मनुष्य मात्र भूतकाळात गुंतून राहतो.
२) माणसाला कुठलं तरी वेड असावंच लागतं.
३) जिथं माणूस अत्यंत सुखी असतो तेच त्याचे घर.
४) परिचयाचे पहिले धागे रेशमाहूनही नाजुक असतात.
५) पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींपैकी न लिहिलेल्या गोष्टीच आयुष्यात जास्त घडतात.
६) पूजा ही जीवनाचा कळस आहे.
७) जीवन मनातले असते ; जनातले नसते.
८) भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यात मानवी मनाचा खरा पराक्रम आहे.


#असंच_काहितरी
#Book_Review

Saturday, April 29, 2023

Book Review : हू मूव्हड् माय चीज (स्पेन्सर जाॅन्सन)

 

''Change is the only constant in life'' ह्या 'Heraclitus' या ग्रीक तत्वज्ञाच्या विधानाशी आपण सर्व परिचीत आहोत...बदल होत असतो, होणारच असतो ह्याची आपल्या कल्पना असते, तरीही आपल्याला बदल बऱ्याचदा नकोसा असतो...आपण बदलाला घाबरतो...आहे तिथं, आहे तसंच रहावं असंच वाटत राहतं..यातुनच मग बदलाची भिती निर्माण होते...भोवतालच्या बदलाशी जुळवून घेणं न जमल्याने आपण मागे पडु लागतो...निराश होतो, हताश होतो...अशा अवस्थेत असणाऱ्या किंवा अशा अवस्थेत शिरण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या तसेच अशा अवस्थेत आपण जाऊच नये असे वाटणाऱ्या प्रत्येकासाठी छोट्याशा गोष्टीमधून आयुष्यातील व व्यवसायातील बदलांना सामोरे जाण्याचा मार्ग दाखवणारे पुस्तक म्हणजे 'हू मूव्हड् माय चीज' हे स्पेन्सर जाॅन्सन यांचे जगप्रसिद्ध पुस्तक.

हे पुस्तक म्हणजे एक लघुकथा आहे.. चीजच्या शोधात बाहेर पडणाऱ्या 2 उंदरांची व 2 छोट्या माणसांची...ह्या छोट्याशा कथेत आपल्याला अनेक मोलाचे संदेश मिळतात..भिती ही सकारात्मक तथा नकारात्मक दोन्ही प्रकारची असते..एक आपल्याला कार्यप्रवृत्त करते तर दुसरी कार्यापासुन परावृत्त करते....ह्या परावृत्त करणाऱ्या भितीवर विजय मिळवला की आपणे खरे स्वातंञ्य अनुभवतो...हाच कथेचा मुलमंञ आहे...कथा विविध सुविचारांमधुन आपले उद्बोधन करते अन् आपल्याला विचारमग्न करुन आपल्याला बदलांकडे पाहण्याची नवी दृष्टी देते...बदलांकडे पाहण्याची आपली नजर बदलवणाऱ्या या पुस्तकाला वाचुन आपल्या वाचण्याचे चीज झाल्यासारखे वाटते अन् आपण नवनवीन चीजच्या शोधात आपला प्रवास कायम ठेवावा असे मनात पक्के होते. कथेतील चीज प्रमाणेच आपले चीज(हवी असणारी गोष्ट) हे प्रत्येकासाठी वेगळे असते....आपले ऐश्वर्य, आपले आरोग्य, आपली आध्यात्मिक शांती किंवा अजुन काही आपले चीज कुणी हलवले आहे असे वाटल्यावर आपण जैसे थे न राहता कार्यप्रवत्त होऊन बदलणाऱ्या भोवतालाबरोबर स्वतः तही बदल घडवावा असा मोलाचा संदेश ही कथा आपल्याला देते... त्यासाठी अवश्य वाचावे असे हे छोटेसे पुस्तक !

Sunday, April 23, 2023

प्रिय नागरी सेवा


 प्रिय नागरी सेवा,

तुझी माझी ओळख कधी झाली ? तुला थेट पत्र लिहीण्याचं मी धाडस कसं केलं ? असं तुला लिफाफा हाती पडताच वाटेल ...सुरवातीलाच स्पष्ट सांगतो, मी तुला ओळखतो (किमान मला असं वाटतं तरी...) पण तु पण मला ओळखशीलच अस नाही...मी तुला प्रिय म्हटलो असलो तरी तु फक्त प्रिय नाहीस...तु माझ्यासाठी प्राणप्रिय आहेस...माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे...मुमताज साठी ताजमहाल बांधणाऱ्या शहाजानचं कौतुक कशाला..? मी तर तुझ्यासाठी मनात महाल नाही नगरच वसवलय...अन् तुला हदयाच्या गाभाऱ्यात बसवलय...तु मला हो म्हणावं म्हणुन रातंदिन झुरतोय...कारखान्यातल्या कामगारासारखं न चुकता वेळापत्रक पाळुन मर मर मरतोय...कधी वाचतोय..कधी ऐकतोय..तुझ्यासाठी नको नको ते करतोय... अर्थात तीच कर्मकहाणी तुला सांगावी वाटली म्हणुन...

तसं तुझी ओळख मला शाळेत असतानाच झाली..आमच्या १० वीच्या निकालानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आम्ही एका मोठ्या साहेबांना ऐकलं...त्यांच्या तोंडुन मी तुझं जे कौतुक ऐकलं..तुला काय सांगु...मला तेंव्हाच तु प्रचंड आवडलीस... तु एकदा भेटली की होणारा सन्मान...भेटणारा मानमरातब...तुझ्यापायी येणारी लालदिव्याची गाडी..मोठा बंगला...अन् एकदा तु हाताशी आली की मग जगातली सुंदरातली सुंदर पोरगी सुद्धा आपल्या हातात हात देईल असा वाटणारा विश्वास...माझ्या कुमार अवस्थेत तुझ्याबद्दल अशी अगदीच सुमार माहिती होऊनही मी तुलाच मिळवायचं हे मनोमन ठरवुन टाकलं...

तुझ्या भोवतीचा झगमगाट मला तुझ्याकडे घेऊन आला असला तरी पुढे काॅलेजात गेल्यावर अजुन कळायला लागलं...झगमगाटाबरोबर येणारी जबाबदारी जरा जरा समजायला लागली... पायाखाली वीट आली म्हणुन पांडुरंग होता येत नाही...तसं तु भेटल्यावर सगळेच जनतेचे तारणहार होत नाहीत, हेही नंतर नंतर कळायला लागलं...पण तुझ्या भेटण्यानं आपल्याला तारणहार होण्याची संधी भेटु शकते हे कळलं ...तसं तर लहानपणी काहीही झालं की आज्जी एकच वाक्य बोलायची,"लय नकु बोलुस, तु काय कोण कलेक्टर लागुन गेलास व्हय". तेंव्हा कलेक्टर म्हणजे नागरी सेवा...हे ही माहीत नव्हतं...पण कलेक्टर झाल्यावर तरी आज्जी आपलं ऐकल असं वाटायचं म्हणुन मग कलेक्टर व्हावं असं तेंव्हापासुन वाटायचं..बालमनातल्या माझ्या कल्पनांना पुढे हवा भेटत गेली..अन् मनात आग पेटत गेली...पुढं पुढं अधिकाऱ्यांच्या भाषणांनी ह्या आगीत जणू तेलच ओतलं अन् भडका उडाला...ठरवलं तुला मिळवायचच....

मग ११ वी, १२ वी पास झालो...डिगरी मुक्त विद्यापीठातुन करावी अन् तुझ्यासाठी मेहनत घ्यावी असं वाटलं, पण तु माझीच आहेस असं इथं प्रत्येकाला वाटत असताना तु नक्की कुणा कुणाला भेटणार असंही वाटलं...माझ्या आराधनेत काही कमतरता राहिलीच अन् तु नाही होकार दिला तर काय असं वाटुन मग तुझ्या मागे धावताना मी एक वेगळा रस्ताही तयार ठेवला..तुझ्या मागे धावताना भरकटलो...तुझ्यापर्यंत नाहीच पोहचु शकलो, तर अगदीच विदुर होऊ जगण्यापेक्षा कुणी तरी हवीच आपल्याला म्हणुन तथाकथित प्लान बी चा विचार करुन जसं सगळेच करतात तसं मी बी इंजिनियरिंग केलं..पण डिगरी झाल्यावर तुझं याड उफाळुन आलं अन् सरळ धरला रस्ता तुझ्याकडं येण्याचा...

तुझ्याकडं यायचं म्हणजे सोपं नाहीच बाई, अन् माझ्यासाठी तु एकटी असली तरी तुझ्यासाठी मी एकटा नाहीये...तो कोण शायर म्हणतो तसं,
"वो बेवफा नही, युँही बदनाम था
लाखो चाहने वाले थे, किस किससे वफा करता  ?"

तुझेही चाहते लाखो आहेत...मी एकुणातला एक आहे...एकमेव नाही...पण तुला म्हणुन सांगतो..माझ्यासारखा दुसरा सापडायचा नाही तुला... मी एकटाच माझ्यासारखा आहे... तुला मिळवायला मी कुणाही मध्यस्थाकडे गेलो नाही...फुले वाचले होते... जोतिबांच्या विधानाला माझ्या परिने मी बदलवले अन् स्वतःलाच सांगितले,"तुला ही भेटण्यासाठी कुणा मध्यस्थाची जरूरी नाही". मग काय ? भिडलो ना एकटाच...स्वतःच सारी जमवा जमव केली...होतो तिथेच राहिलो...तु जिथुन लवकर भेटते असे म्हणतात, त्या वळणाकडेही वळलो नाही...मी अन् माझी रुम हेच माझे तुझ्या भक्तीचे स्थान होते...रोज ऊठताना अन् झोपताना सारखा तुझाच विचार‌..मग सुरवात केली...तुला भेटलेल्यांनी मार्ग सांगितला...मी माझे बारकावे शोधले...तुझ्याकडे येण्याच्या काही चोरवाटा शोधल्या अन् चालायला लागलो... पण वाट सोपी नाही...अडखळत आहे...रोज ढेचाळतो...कधीकधी रक्तबंबाळ होतो...पण तरी तुझी ओढ काही कमी होत नाही... आवश्यक ते सारे करण्याची तयारी आहे...हिम्मत हारलो नाही..जिद्द, चिकाटी, परिश्रम, या शब्दांना जगत आलो.... पण खरं सांगु हल्ली मनावर शंकेचे धुके दाटुन येते..चालणे अवघड होऊन जाते... बापाला सांगितले होते, अर्जुनासारखा जातो.. मत्स्यभेद करावा तशी परिक्षा भेदुन जातो ..अन् तुला घेऊनच येतॊ....वर्षामागुन वर्ष सरली... माझ्या डोळ्यासमोरुन तु हटत नाही, पण तु काही केल्या भेटत नाही...

आताशा तर घरात आल्यावरही घरात नसतोच मी.. घरातल्या, घराबाहेरच्या नजरा जणु रोज विचारत असतात, तो सध्या काय करतोय ? तयारी..हा एकच शब्द बोलु शकतो...ते ऐकुन ऐकुन आता त्यांनीही मला वेड्यात काढलय...बस झालं आता सोड तो नाद म्हणत गावातला शेंबडा पोरगा बी मला जगण्याचं तत्वज्ञान शिकवुन जातो आहे... मी काय करु काय नाही काहीच कळत नाही... एक पाऊल पुढे पडते..एखादी पुर्व पास होतो...तुझा चेहरा दिसल्यागत होतो...पण पुढच्याच पावलावर तु भुमिगत होतेस...कळत नाही काय चुकते...माझ्यापेक्षा लहान लेकरं माझ्या मागुन आली...तुला भेटली अन् स्थिरस्थावर झाली देखील...मी अजुनही तळमळतो आहे...तु एकदा सांग ना..तुला मी कळतो आहे का ? बरं तु ही इतकी मोहक आहेस...एकवेळ रंभा, उर्वशी दूर करु शकेल..पण तु हवीच आहेस हा माझा हट्ट आहे की प्रेम काहीच कळत नाही.. आता जरा शांत बसुन विचार करणार आहे..तु मिळवण्याच्या हट्टापायी मी बरेच काही पायी तुडवले आहे...चंद्रच हवा ह्या हट्टापायी चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे कायम दुर्लक्ष करत आलो...आतापर्यंत हुशार होतो आता शहाणा होईल बाई... तुझ्या भेटीपायी नुसतं वय वाढत गेलं असं नाही.. माय बापांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं नक्षीकाम देखील वाढलं...बापाच्या डोक्यावरच्या कर्जाच्या डोंगराची उंची वाढली...आयटीतल्या मित्रांचा बँक बॅलेंस वाढला ..साहजिकच ते पुढे सरकले ..मी तिथेच राहिलो...अन् मैञितला बॅलेंस बिघडला...जबाबदाऱ्या वाढत गेल्या..लोकांचे प्रश्न वाढत गेले... वाढणाऱ्या एका एका अटेंम्प्टने फक्त वय वाढतं असं नाही बाई...म्हणुनच आता स्वतःला सावरले पाहिजे... तुझा हट्ट मला ह्या वाटेवर कितीही घट्ट धरून ठेवत असला तरी आयुष्य अजुन जास्त बिघडण्याआधी मीच वळुन माझी वाट बदलणार आहे .... एक शेवटची विनंती...बाई, तु आयुष्याला वेगळं वळण देतेस असं भाषणात ऐकुन आम्ही आयुष्याला अशा वळणावर घेऊन आलो.... तु सुंदर आहेसच...तुझ्यासारखी तुच...तुझ्यापुढे स्वर्गीय अप्सराही फिक्याच...पण मी पृथ्वीवरचा सामान्य जीव...तेंव्हा तुझ्या वाटेवर येणाऱ्या जीवांना वेळीच सावध करत जा... तु नसेल भेटणार तर तुझ्या सख्या सोबती असतीलच ना खाजगीतल्या...त्यांची तर गाठ पाडून दे... तुझी माझी गाठ बांधलीच गेली नव्हती असं समजुन मी माझ्या भळभळणाऱ्या जखमा घेऊन...असंख्य गाठींना पाठीशी घेऊन तुझा निरोप घेईल...आता फक्त एवढा एक शेवटचा प्रयत्न...भेटलीस तरी बेहत्तर नाही भेटलीस तरी बेहत्तर...!

Friday, April 14, 2023

प्रिय भीमा..


प्रिय भीमा


कसा आहेस ? कुठे आहेस ? असे प्रश्न मला विचारायचे नाहीत..मला माहीत आहे की तु इथेच आमच्या आसपास आहेस...फक्त जरासा अस्वस्थ आहेस.. मग कशासाठी हा लेखनप्रपंच..? तर तुझ्या बर्थ डे चे तसे निमित्त...पण तुझ्याशी बोललं पाहिजे असं बरेच दिवस झाले वाटत होते..आज मुहूर्त लागला (अरे साॅरी.. मुहूर्तावर तुझा विश्वास नव्हताच..पण आम्ही अजुन नाही सोडु शकलो पंचांग ...असो.)

तर पञास कारण की, आज तुझी जयंती.. आमच्या भाषेत बर्थ डे, मग काय ? आमच्या नाक्यावरच्या टपोरी मिञाचा जरी बर्थ डे असला तरी 'बर्थ डे आहे भावाचा' म्हणत आम्ही डिजे लावतोच..तु तर राडा बाॅय...कसाला राडा घातलेला आहेस तु...परके असो नाही तर आपले.. सगळ्यांच्याच विरुद्ध तुला वेळोवेळी लढावे लागले अन् तु खंबीरपणे लढलास देखील...आम्ही तर वाचुनच थक्क होतो...तु ते जगला आहेस..मग काय विषय आहे का ? भावा तुझा बर्थ डे पण जोरात डिजे लावुन झालाच पाहिजे ...नाही, तु नाही म्हणु नकोस..आम्ही डिजेही लावणार अन् बेधुंद होऊन नाचणारही भावा... आता नाचणार म्हणजे लगेच दारु पिऊच असं नाही...नाही म्हणजे आमच्यापैकी काहींचे पाय त्याशिवाय हालतच नाहीत मग त्याला ईलाज नसतो बघ....पण मी तुझ्या बावीस प्रतिज्ञा नीट वाचल्यात...अन् माझ्या पक्क लक्षात आहे रे भावा..तु प्रतिज्ञा दिली होतीस आम्हाला मद्यपान न करण्याची..पण तुझ्याच बर्थ डे दिवशी नेमकी तिचा विसर पडतो बघ आम्हाला...जाऊ दे...पण आम्ही तुझा बर्थ डे करणारच ! तु तुझ्या ज्ञानाने‌ साऱ्या जगात ज्ञानाचा झेंडा लावलास..आम्ही ज्ञानाच्या झेंड्याचं बघु नंतर पण तुझा बर्थ डे म्हटल्यावर तुझा झेंडा माञ अवश्य जागोजागी लावुच !

भीमा, तुला जगानं कोणत्या कोणत्या साच्यात बसवुन बघितलं...कुणी तुला दलिताचा कैवारी म्हटलं, कुणी तुला स्ञियांचा तारणहार म्हटलं ... कुणी तुला बहुजनांचा नेता म्हटलं..कुणी तुला राजकारणी...कुणी ज्ञानाचा धनी..कुणी वकील...कुणी अर्थशास्ञज्ञ..कुणी अजुन काही...पण भीमा तु ह्या कुठल्याच एका साच्यात मावला नाहीस..मावणार ही नाहीस रे भावा...तु विस्तीर्ण आभाळ...आम्ही तुला ढग समजण्याची चुक करत आलो...पण आता कुठे उमजाय लागलय बघ जरा जरा... तु म्हणाला होतास 'शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा'...अरे पण इथं आम्हाला शिकताना संघर्ष करावा लागतो...आमच्या संघटना स्थापन झाल्या पण त्याच्यातही अंतर्गतच संघर्ष जास्त... तुझ्या वाक्याचा नीट अर्थ आम्हाला कळलाच नाही रे अजुन...जरा समजावुन सांग ना प्लिज.

भीमा, तु एका सुभेदाराचा मुलगा होतास, मग तुलाही एखादा जहागिरदार, वतनदार व्हावं असं का नाही वाटलं रे ? उलट तु तर म्हणालास, "महारवतन म्हणजे महारांच्या दारावरचा शेवगा". तुला तर आमच्या सारख्या एसी अभ्यासिकाही उपलब्ध नव्हत्या...तरी एवढा अभ्यास कसा काय केलास बाबा ? किती त्या पदव्या ? कित्येकांचा अर्थ तर आम्हाला अजुनही कळत नाही...आम्ही आपलं मुक्त विद्यापीठातुन डिगरी घेतो..मग अधिकारी व्हायचं म्हणुन एमपीएससी/युपीएससी करायला पुण्याला/दिल्लीला जातो...मान्य आमच्या वाट्याला कुठला सयाजीराव किंवा कुठला शाहू महाराज नाही येत, पण आम्ही मायचं सोनंनाणं..वेळ पडली तर कधी आहे तेवढं रान..ज्यात बापानं जीवाचं रान केलेलं असतं, ते गहाण ठेवुन पैसे जमवतो... तु म्हणायचा ना रे, शासनकर्ती जमात व्हा..आम्ही शासनात जायला अजुनही घाबरतो..तो आपला प्रांतच नाही म्हणत शासनाला फार फार तर टपरीवर शिव्या देत बसु शकतो..पण म्हणुन मग आम्ही शासन नाही तर किमान प्रशासनात जाण्यासाठी प्रयत्न करतो...तरी सगळ्यांच्याच नशिबी कुठं असते बाबा सरकारी नोकरी...(नशिबावर तुझा विश्वास नाही हे मला नको सांगुस आता) आम्ही पाच लोकं तयारीला पुण्यात गेलो..पहिल्या वर्षी कुणीच पास झालं नाही...मग आमच्यातले दोन-तीन जण पुढची पुर्व परिक्षा पास झाले, आम्ही काय जल्लोष केला होता म्हणुन सांगु...तुझ्या पीएचडीचा पण तुला तेवढा आनंद नसल झाला बघ..येवढं आम्ही पुर्व पास होऊन झालो होतो...अन् याच जल्लोषात आम्ही आमची मेन्स घातली रे... पुढे आम्ही दरवर्षी पुर्व पास व्हायचो अन् बापाला सांगायचो यंदा कलेक्टर होणारच...असे पाच-सहा वर्ष गेले...आम्ही कलेक्टर तर सोड कंडक्टर पण नाही होऊ शकलो...काय करावं..? आमचं काय चुकतं, भीमा ?

भीमा, तु अभ्यास केला, तु राजकारण केले, तु शोध लावले, तु संविधान लिहिलस, तु माणसांसाठी जगलास..अन् माणसाला माणुस म्हणुन जगण्याचा अधिकारही मिळवुन दिलास... दलित शब्दाला प्रतिशब्द दिला तेंव्हा तु म्हणाला होतास नामांतराने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत...अरे पण सध्यातर आमचे सगळे प्रश्न सोडुन (सोडवुन नाही..) आम्ही खुशाल नामांतर करतोय..सगळीकडेच... असो. तु मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण त्यापेक्षा जास्त तु माणसातल्या माणसाशी माणसासारखे वागण्यासाठी सर्वांना तयार केलेस...संविधानात मुलभूत हक्क बहाल करताना तु कुठलाच भेदभाव केला नाहीस...तेवढं एक बरंच झालं...तरी तु फक्त दलितांचाच कसा झालास रे ? तु तर रिजर्व्ह बँकेची स्थापना साऱ्या देशासाठीच निर्माण करण्याची शिफारस केली होतीस ना. तु संविधान लिहिले ते ही सगळ्या भारतीयांसाठी. तु तर कायम म्हणायचास, " मी प्रथमतः अन् अंतिमतः भारतीय आहे." मग तु तरीही साऱ्या भारतीयांचा कसा नाही झालास भावा ?

भीमा, तु मनुस्मृति जाळलीस, तु ब्राह्मणविरोधी झालास...पण तुझा विरोध ब्राह्मणाला नाही तर ब्राह्मण्याला होता हे काही अजुनही नीट आम्हाला कळत नाहिये बघ.. तु दलितांसाठी लढलास, तु कामगारांसाठी लढलास, तु महिलांच्या हक्कासाठी लढलास, तु संबंध मानवजातीसाठी अन् मानवमुक्तीसाठी लढलास भावा...अरे, भीमा तुझ्या कतृत्वाला सीमा च नाही बाबा. तु कायद्याचं बोलायचास, आमच्या फायद्याचं बोलायचास...आता तुझ्या नावानं मत मागायला पुढारी येतात आमच्या वाडी/वस्तीत ...पण ते ना कायद्याचं बोलत्यात ना आमच्या फायद्याचं... त्यांची बी चुक नाही म्हणा... पावशेर मटण अन् बाटलीसाठी आम्हीच आमचं अमुल्य मत असं शे पन्नास रुपड्याला इकत असतोय बघ..आम्हीच नीट शिकलो नाही...जे शिकले ते परत महारवाड्यात फिरले नाही...शिकुन मोठी झालेली माणसं आम्हाला ईसरुन गेली... तु आरक्षणाचा हात तात्पुरता हात दिला होतास आम्हाला पण आम्ही अजुनही तिथंच आहोत...आम्ही आरक्षणातून बाहेर पडायला हवे होतो, पण उलट अजुन बाहेरचे पण आरक्षणात ओढले गेले...तात्पुरत्या कुबड्यांचा वापर करताना पाय निकामी तर झाले नाहीत ना आमचे ? खरंच काही कळत नाय रे ...? तुच सांग बाबा.

तुला वाटत असेल तुझ्या बर्थ डे जल्लोषात मी हे काय माझं रडगाणं सांगतोय...पण भावा, आमच्या सारख्या कित्येकांच्या मनात अजुनही बरीच खदखद आहे... कधी वाटतं आम्ही चुकलो...कधी वाटतं आपल्याला चुक काय बरोबर काय हेच कळु दिलं नाही कधी कुणी... तुझ्यासारख्या विस्तिर्ण आभाळात मी म्हणजे भरटकलेल्या तारकासमान....ना कुठली दिशा ना कुठला मुक्काम...घडताना भरकटणारा मी...मला दिशा दाखव ...मला ताकद दे, ह्या मानसिकतेतुन बाहेर पडण्याची..आधी मला बदलण्याची अन् मग माझं जग बदलण्याची...!