Tuesday, December 27, 2016

वेदनेचमहाकाव्य

*💥बापाच्या वेदनेच महाकाव्य..💥*

*बापा,*
तु सहत गेलास वेदना
रानोमाळच्या ढेकळांवर
कितींदा केलास तु अभिषेक रक्ताचा
खचला नाहीस बसला नाहीस
हाकत राहिलास आडव्या उभ्या रेघाड्या
लोकांच्या चढल्यात माड्यावर माड्या
पण तुझ्या दावणीला अजनुही
दारी उभ्या बैलगाड्या .......

*बापा,*
तु सहन केलास
सळसळत हेलकावणारा वारा
सारं क्षणात उध्वस्त करणार्या गारा
माथ्यावर आगीचा डोंब घेउन
झेललास सारा पारा
तरी नशिबाचा अजुन
चालुच आहे मारा........

इतकं कसं रे सहन करतोस
उभ्या उसासारखा तु
आता चिपाटागत दिसतोस
सारा काळवंडलाय चेहरा
कपाळावरल्या घामाने
पुसल्या का तुझ्या नशिबाच्या रेषा....?
का नव्हत्याच तिथे कुठल्या रेषा....?
नाहीतर तुझ्या नशिबीही
आले नसते एवढे भोग..
अन् यावर कविता करण्याचेही योग...

तुझी हिच वेदना ...
धावते आहे माझ्या नसानसातुन
कारण मी पाहिलच नाही ऎकलच नाही ...
तर जगलोय तुझ्या वेदनेचं
महाकाव्य
तुझ्या हातात हात घालुन
म्हणुन आता हिच वेदना
उतरते माझ्याही शब्दांत
कळवळतात शब्दही
जाणवतो त्यांनाही जाळ
उभा राहतो नव्याने सारा जुना काळ...

पण एकच खंत आहे...
सांग बापा कधी तुझ्या वेदनेला अंत आहे...
नुसते दिसतच नाही रानोमाळी
तर पिकांच्या सळसळीतही
श्राव्य आहे तुझं महाकाव्य
त्यापुढे थिटंच आहे माझं काव्य ......

*✍शशिकांत मा. बाबर*
*( युवाव्याख्याते, जालना )*
*९१३०६२०७३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: