Tuesday, December 27, 2016

ओवाळणी

*💥💥 ओवाळणी..💥💥*

ती तिष्ठत दारात उभी होती
कधी येतो माझा दादा
येईल की बाच्या सरणात
जाळला त्यान बा ला दिलेला वादा
बा गेला त्यादिसापासन त्यान
कायमची जवळी केलीय बाटली
म्हणुनच जिवाभावाची बहिण
त्याला आता दुरच वाटली

पण ती माञ वाट पहाते
दर भाऊबीजेला
कदाचित चुकुन येईल तो
अन् आज तो आलाही
चुकुन चुकला तो रस्ता
कदाचित आठवल्या असतील
बहिणीने खाललेल्या खस्ता

तो माञ झिंगलेलाच
बहिणीनं सारं विसरून
आनंदान त्याला घेतलं घरात
छान बसायला पाट
त्यावर भाऊरायाचा थाट
अन् केली ओवाळणी
त्याचा ऊरही भरलेला

खिशात हात घातला तसा
तिनं रोखल त्याला
म्हणाली दादा,
एकच मागते , देशील...?
हे व्यसन सोडण्याची
एकदा शपथ घेशील
वहिणीची कटकट,
लेकरांची फरफट
सारच बंद होईल ...
ऎकशिल ना....

बर्याच दिसाचे दाटलेले
तिनेही सारे खोलले
ऎकुन त्याचेही पाणावलेले डोळे
तिच्याशी बोलले
तसं खिशातली चपटी त्याची
तिथच फुटली
 बहिणीलाही ह्या लाखमोलाची
ओवाळणी भेटली ......॥

*✍शशि.....*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: