Wednesday, December 7, 2016

चलन बदल

💰चलन बदल....💰

काल परवा बापाच्या खिशातल्या नोटा पाहिल्या....
त्याही झाल्यात काळ्या
पण त्या नाही आल्या टेबलाखालुन
वा कुणाच्या पाठीमागुन
त्यासाठी पाठीला गाठीपडस्तोर
राबलाय बाप.....
काळ्या आईला चिरत
टाकत राहिलाय औतामागं धाप...
त्याच सारं अंगच होतं
घामाच्या धारांनी काळंखाप
अन् एकदा का चिटकला तो नोटांना
की होते त्याचीही वाफ

म्हणुन म्हणतो सरकार
माझ्या बा कडं पण
आहे बरं काळा पैसा ....
पण हा नव्हे बरं काही
तुम्ही सांगता तैसा....

आणि हो हाच पैसा ......
जेंव्हा माय ठेवते जपुन
लुगड्याच्या गाठीत
पदराच्या कडेला....
तेंव्हा घामावलेल्या मायच्या कपाळावरल्या कुंकवाचा
त्यालाही मिळतो संग...
अन् मग त्याचाही होतो
लालसर रंग....

बापाच्या पँटीच्या खिशातला काळा पैसा
मायच्या लुगड्यात रंगीत होतो
हाच शे पन्नास रुपड्या
आमच्या जगण्याच संगीत होतो....

असा नोटांचा रंग बदलताना
मी कित्यांदा पाहिलाय...
पण त्याला काय म्हणाव
कधी काही समजलं नाही...
जिंदगीतल्या बदलांपुढ...
बाकी बदलांच गणित उमजलं नाही......

बाकी बदल व्हायलाच पाहिजे बरं
कारण तोच काळा पैसा जर का
तसाच राहिला टिकुन बा च्या खिशात
रातच्याला मग तो जातोच पहा गुत्त्यात....
म्हणुन म्हणतो बदल व्हायलाच हवा
फक्त नोटांच्याच नाही तर माणसांच्याही रंगात....
बाकी चलन बदल
किंवा आणखी काही
काहीही म्हणोत त्याला...
बदलेल्या नोटांपेक्षा
बदललेली माणसं पाहायचीत मला.....

शशिकांत मा. बाबर
📞९१30६२०८३४